मुंबई, 6 ऑगस्ट : फुटबॉल विश्वात गेल्या काही महिन्यांपासून ज्या बातमीची चर्चा होती, त्यावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. अर्जेंटीनाचा जगप्रसिद्ध खेळाडू लियोनेल मेस्सी (Lionel Messi) आणि स्पेनच्या बार्सिलोना फुटबॉल क्लब यांचं नात संपुष्टात आलं आहे. मेस्सी गेल्या 21 वर्षांपासून बार्सिलोना क्लबचा सदस्य आहे. आता मेस्सीसोबत नवा करार करण्यात येणार नाही, असं बार्सिलोना क्लबच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे मेस्सी पहिल्यांदाच एका वेगळ्या क्लबकडून व्यावसायिक फुटबॉल खेळताना दिसेल.
का संपले नाते?
मेस्सीचा बार्सिलोना क्लबसोबतचा करार जून महिन्यातच समाप्त झाला होता. त्यानंतरही तो पुन्हा एकदा नव्या अटींसह करार करेल असा फुटबॉल फॅन्सचा अंदाज होता. दोन्ही पक्षांमध्ये चर्चा आणि सहमतीचे प्रयत्न काही दिवसांपूर्वीपर्यंत सुरु होते. अखेर गुरुवारी रात्री बार्सिलोनानं क्लबनं पत्रक काढत हे नातं संपल्याची अधिकृत घोषणा केली.
'एफसी बार्सिलोना आणि मेस्सी या दोन्ही पक्षांनी करार करण्याचा प्रयत्न केला. मात्र स्पॅनिश लीगमधील नियम आणि आर्थिक गोष्टींमुळे हे शक्य झाले नाही. त्यामुळे मेस्सी आता बार्सिलोना क्लबसोबत नसेल. क्लब आणि खेळाडू दोघांचीही इच्छा पूर्ण झाली नाही याचा आम्हाला खेद आहे.' मेस्सीच्या योगदानाबद्दल बार्सिलोनानं आभार मानले असून त्याला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
LATEST NEWS | Leo #Messi will not continue with FC Barcelona
— FC Barcelona (@FCBarcelona) August 5, 2021
बार्सिलोनावर कर्जाचा डोंगर
फुटबॉल विश्वातील बलाढ्य क्लब असलेल्या बार्सिलोनावर सध्या कर्जाचा डोंगर आहे. या क्लबवर सध्या जवळपास 8 हजार कोटींचे कर्ज आहे. कर्जचाच्या ओझ्याखाली दबलेल्या या क्लबला मेस्सी सारखा महागडा खेळाडू परडवणार नव्हता. मेस्सीनं 2017 साली केलेल्या करारानुसार त्याला 5 वर्षांमध्ये 550 मिलियन युरो मिळाले होते.
IND vs ENG : विराट-अँडरसनच्या पहिल्या लढतीत अनुभवी क्रिकेटपटूची सरशी! पाहा VIDEO
मेस्सीनं नवा करार करण्यासाठी त्याच्या मानधनात 50 टक्के कपात करण्याची तयारी दाखवली होती. तरही त्याचे मानधन इतर खेळाडूंपेक्षा कितीतरी जास्त होते. त्यामुळेच या दोघांमधील करार पुढे जाऊ शकला नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.