मुंबई, 15 डिसेंबर : भारताच्या टेस्ट टीमचा कर्णधार विराट कोहली आणि वनडे, टी-20 टीमचा कर्णधार रोहित शर्मा (Virat Kohli Rohit Sharma rift) यांच्यात वाद सुरू असल्याच्या चर्चा सुरू आहेत. वनडे टीमचं कर्णधारपद काढून घेतल्यामुळे विराट कोहली नाराज झाल्याचं बोललं जातं होतं. या मुद्द्यावर आता थेट केंद्रीय क्रीडा मंत्री आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खेळापेक्षा कोणीही मोठा नाही, असं अनुराग ठाकूर म्हणाले आहेत. अनुराग ठाकूर यांचे छोटे भाऊ अरुण धूमळ सध्या बीसीसीआयचे कोषाध्यक्ष आहेत.
खेळ सगळ्यात मोठा आहे, खेळापेक्षा कोणीही मोठा नाही. कोणत्या खेळात कोणत्या खेळाडूंमध्ये काय चाललं आहे, हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. हे संबंधित संस्थेचं काम आहे, त्यांनी माहिती दिली तर चांगलं होईल, असं अनुराग ठाकूर एएनआयशी बोलताना म्हणाले.
कोणतेही वाद नाहीत
दरम्यान विराट कोहलीने आपल्यात आणि रोहित शर्मामध्ये कोणतेही वाद नसल्याचं स्पष्ट केलं आहे. 'माझ्या आणि रोहित शर्मामध्ये काहीही वाद नाही, मागच्या दोन वर्षांपासून मी हे सांगून थकलो आहे, वैतागलो आहे.' अशी उद्वीग्न प्रतिक्रिया विराट कोहलीने दिली. सोबतच माझी कोणतीही हरकत किंवा निर्णय टीमला खाली दाखवणारा नसेल. टीमला योग्य दिशेने घेऊन जाणं, हीच माझी जबाबदारी असेल. रोहित एक सक्षम कर्णधार आहे, तसंच राहुल द्रविड उत्कृष्ट मॅनेजर आहे. वनडे आणि टी-20 मध्ये माझं शंभर टक्के समर्थन त्यांना आहे, असं विराट म्हणाला.
आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये विराट कोहलीने टी-20 कॅप्टन्सीबाबत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने सांगितलेला दावाच खोडून काढला. विराटला टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडू नकोस असं सांगण्यात आलं होतं, पण तो निर्णयावर ठाम होता. निवड समितीला टी-20 आणि वनडे टीमसाठी एकच कर्णधार हवा होता, असं गांगुली म्हणाला होता. विराट कोहलीने मात्र त्याच्या पत्रकार परिषदेत वेगळंच सांगितलं. टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडल्यानंतर माझं या मुद्द्यावर बीसीसीआयशी कोणतंही बोलणं झालं नाही. मला कधीही टी-20 टीमचं नेतृत्व सोडू नकोस, असं सांगण्यात आलं नाही, असं स्पष्टीकरण विराट कोहलीने दिलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rohit sharma, Team india, Virat kohli