मुंबई, 16 मे : ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू एण्ड्रयू सायमंड्सचं (Andrew Symonds Death) शनिवारी रात्री उशीरा निधन झालं. 46 वर्षांच्या सायमंड्सच्या कारचा क्वीन्सलँडच्या टाउन्सविलेमध्ये अपघात झाला. सायमंड्सच्या मृत्यूनंतर क्रिकेट विश्व आणि त्याच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे, पण आता सायमंड्सच्या बहिणीने त्याच्या मृत्यूवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
डेली मेल डॉट यूकेसोबत बोलताना सायमंड्सच्या बहिणीने केलेल्या वक्तव्यावरून त्याच्या मृत्यूचं गूढ वाढलं आहे. एण्ड्रयू सायमंड्स अपघाताच्या वेळी रात्री सुमसाम रस्त्यावर काय करत होता? हे कुटुंबाला माहिती नाही, असं त्याची बहिण लुईस सायमंड्स म्हणाली आहे. एण्ड्रयू सायमंड्सला पत्नी लॉरा आणि दोन मुलं आहेत.
कार अपघाताच्या ठिकाणचा फोटो

Photo- Dailymail.uk
'एण्ड्रयूने फक्त एक दिवस परत यावं, कारण मला आणि कुटुंबाला त्याच्यासोबत वेळ घालवायचा आहे. अपघात खूप भयानक होता, एण्ड्रयू तिकडे काय करत होता, आम्हाला माहिती नाही. सायमंड्सचे दोन कुत्रे या अपघातामध्ये वाचले,' अशी प्रतिक्रिया सायमंड्सच्या बहिणीने दिली. डेली मेलच्या वृत्तानुसार दोन स्थानिक लोकं बबेथा नेलीमन आणि वायलन टाऊनसन अपघाताच्या काही मिनिटांनंतरच घटनास्थळी दाखल झाले, तिकडे त्यांनी सायमंड्सला रक्ताच्या थारोळ्यात पाहिलं.
घटनास्थळी पोहोचल्यानंतर हे दोघं सायमंड्सजवळ जायचा प्रयत्न करत होते, पण एका कुत्र्याने त्यांना सायमंड्सजवळ जाऊन दिलं नाही. 'त्यातला एक कुत्रा खूपच संवेदनशील होता, त्याला सायमंड्सला अजिबात सोडायचं नव्हतं. आम्ही त्याला रुग्णालयात नेण्यासाठी जवळ जायचा प्रयत्न करत होतो तेव्हा तो आमच्यावर गुरगुरायचा. माझ्या सहकाऱ्याने सायमंड्सला कार बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे त्याला नीट बसवता येईल, पण कारचा चक्काचूर झाला होता,' असं नेलीमन यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.