मुंबई, 12 डिसेंबर : वेस्ट इंडिजचा स्फोटक बॅट्समन आंद्रे रसेल (Andre Russell) याला नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल (IPL 2020) स्पर्धेत उत्तम कामगिरी करता आली नाही. आयपीएलमध्ये रसेल कोलकाता नाईट रायडर्सचा(KKR) महत्त्वाचा खेळाडू असून त्याने या संपूर्ण स्पर्धेत आपल्या टीमला निराश केले. सध्या रसेल श्रीलंकेत सुरू असलेल्या लंका प्रीमिअर लीग (LPL 2020) टी-20 क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळत आहे. नुकताच त्याने वेस्ट इंडिजमधील स्थानिक क्रिकेट वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपल्या कामगिरीवर भाष्य केले आहे. लंका प्रिमिअर लीगमध्ये (Lanka Premier League) तो कोलंबो किंग्ससाठी खेळत असून न्यूझीलंड दौऱ्यावर न जाता त्याने या स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला होता.
जमैकामधील स्थानिक स्पोर्ट मॅक्स(Sports Max) या वाहिनीला मुलाखत देताना त्याने आपल्या कामगिरीवर भाष्य केले आहे. यावेळी बोलताना तो म्हणाला, आयपीएलआधी (Indian Premier League) मी माझ्या बॅटिंगला उभ्या राहण्याच्या पद्धतीमध्ये, खेळाच्या तंत्रामध्ये बदल केला, त्याचबरोबर शॉट्स मारण्याची पद्धत देखील बदलली. पण आयपीएलमध्ये मला याचा काहीही फायदा झाला नाही. या सर्व कालावधीत मला खूपच त्रास झाला, तसंच याचा दबाव देखील आल्याचे त्याने मुलाखतीत म्हटले. लवकरच या गोष्टींमधून मी बाहेर पडेन, अशी आशा देखील यावेळी या 32 वर्षीय खेळाडूने व्यक्त केली.
संपूर्ण आयपीएल स्पर्धेच्या काळात तो बायो बबलमध्ये (Bio Bubble) होता. त्यामुळे एका बायो बबलमधून बाहेर पडून पुन्हा त्याच परिस्थितीत जाणे अवघड असल्याचे त्याने म्हटले. या परिस्थितीत जेलमध्ये राहत असल्यासारखं वाटतं, असंही तो म्हणाला. आयपीएलनंतर रसेल काही काळ दुबईमध्येच थांबला होता. त्या ठिकाणी त्याने शानदार पार्टी करत उत्तम वेळ घालवला. तर काहीकाळ तो दुबईमध्ये एकटाच होता.
आयपीएलमध्ये रसेल कोलकातासाठी खूप महत्त्वाचा खेळाडू होता. पण संपूर्ण स्पर्धेत त्याला रन करण्यात अपयश आले. यावर्षी लागलेल्या दुखापतीच्या ग्रहणाने देखील त्याला सोडलं नाही. या संपूर्ण स्पर्धेत त्याने 10 मॅचमध्ये केवळ 117 रन केले. माझ्या खेळाच्या पद्धतीत बदल केल्यानंतर देखील मला या स्पर्धेत अपयश आल्याचे रसेलने म्हटले.