मुंबई, 1 जून : मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) माजी क्रिकेटपटू अमोल मुझुमदार (Amol Muzumdar) याला प्रशिक्षक बनवलं आहे. अमोल मुझुमदारने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 11 हजारपेक्षा जास्त रन केले आहेत, याशिवाय त्याला आंतरराष्ट्रीय टीमसोबत काम करण्याचाही अनुभव आहे. अमोल मुझुमदार याला मुंबई क्रिकेट असोसिएशन वर्षाला 50 लाख रुपये देण्याची शक्यता आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरही या रेसमध्ये होता.
विनोद कांबळी (Vinod Kambli), निलेश कुलकर्णी (Nilesh Kulkarni) आणि जतीन परांजपे (Jatin Paranjpe) यांच्या समितीने प्रशिक्षक होण्यासाठी उत्सुक असलेल्या सगळ्यांच्या मुलाखती घेतल्या. भारताचे माजी ऑलराऊंडर बलविंदर सिंग संधू (Balvinder Singh Sandhu), भारताचे माजी लेग स्पिनर साईराज बहुतुले (Sairaj Bahutule) आणि मुंबईचे माजी प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी (Sulakshan Kulkarni) यांनीही प्रशिक्षक होण्यासाठी अर्ज केला होता, पण अमोल मुझुमदार याची 2021-2022 यावर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबईचा माजी कर्णधार असलेल्या अमोल मुझुमदारच्या नेतृत्वात मुंबईने रणजी ट्रॉफी जिंकली होती. याशिवाय अमोल एनसीएमध्ये होता. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स, नेदरलँड्सची टीम आणि दक्षिण आफ्रिकेच्या टीमसोबत तो बॅटिंग प्रशिक्षक म्हणूनही काम करत होता. याशिवाय अमोल मुझुमदार कॉमेंट्रीही करतो.
सय्यद मुश्ताक अली स्पर्धेमध्ये मुंबईने अमित पागनिस (Amit Pagnis) यांची कोच म्हणून नियुक्ती केली होती, पण टीमच्या खराब कामगिरीनंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला. यानंतर विजय हजारे ट्रॉफीमध्ये रमेश पोवार (Ramesh Powar) मुंबईचा प्रशिक्षक झाला आणि मुंबई चॅम्पियन बनली. रमेश पोवारची आता महिला टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून नेमणूक झाली आहे.
अमोल मुजुमदारने त्याच्या प्रथम श्रेणी क्रिकेटचं पदार्पणही मुंबईकडून केलं. 1993-94 सालच्या मोसमात पहिल्याच सामन्यात त्याने 260 रनची खेळी केली. 2018 पर्यंत हे रेकॉर्ड कायम होतं. अमोल मुझुमदारने 171 सामन्यांमध्ये 48 च्या सरासरीने 11,167 रन केले. पदार्पणाच्या सामन्यात केलेली 260 रनची खेळी त्याच्या करियरमधली सगळ्यात मोठी खेळी होती. अमोल मुझुमदारने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 30 शतकं आणि 60 अर्धशतकं केली, पण त्याला भारताकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. मुंबईशिवाय तो आसाम आणि आंध्र प्रदेशकडूनही खेळला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.