मुंबई, 21 जानेवारी : सय्यद मुश्ताक अली टी 20 (Syed Mushtaq Ali T20) स्पर्धेमधील लाजिरवाण्या कामगिरीनंतर मुंबई (Mumbai) क्रिकेट टीमचे मुख्य प्रशिक्षक अमित पागनीस (Amit Pagnis) यांनी राजीनामा दिला आहे. अमित पागनीस यांची डिसेंबर महिन्यातच या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. अवघ्या महिनाभरात आणि फक्त एका स्पर्धेनंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सध्या सुरू असलेल्या मुश्ताक अली स्पर्धेत मुंबईचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आलं आहे.
“मुश्ताक अली स्पर्धेतील खराब कामगिरीची जबाबदारी स्वीकारून मी राजीनामा देत आहे. त्याचबरोबर तयारीसाठी वेळ न मिळाल्याचा मोठा फटका टीमला बसला हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे. आम्हाला टीम म्हणून एकत्र सराव करण्याची फारशी संधी मिळाली नव्हती.’’ असं पागनीस यांनी ‘टाईम्स ऑफ इंडिया’ शी बोलताना सांगितलं.
मुंबईची खराब कामगिरी
देशांतर्गत स्पर्धेतील बलाढ्य मुंबईची सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतील कामगिरी निराशाजनक झाली. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेच्या नॉक आऊटमध्ये जाण्यासाठीचं मुंबईचं आव्हान आधीच संपुष्टात आलं. दिल्ली, केरळ, हरयाणा आणि पुदुच्चेरी या टीमविरुद्ध मुंबईचा पराभव झाला. शेवटच्या साखळी सामन्यात मुंबईनं आंध्र प्रदेशाचा पाच विकेट्सनं पराभव करत स्पर्धेतील एकमेव विजय मिळवला.
सूर्यकुमार यादव (SuryaKumar Yadav) याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईच्या टीममध्ये यशस्वी जैस्वाल, आदित्य तरे, सर्फराज खान, शिवम दुबे हे देशांतर्गत आणि IPL स्पर्धा गाजवणारे खेळाडू होते. मुंबईच्या अनुभवी टीमला केरळ, पुदुच्चेरी यासारख्या दुबळ्या टीमनंही पराभूत केलं.
लालचंद राजपूत (Lalchand Rajput) यांच्यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) सुधारणा समितीनं पागनीस यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. आता पुन्हा एकादा या समितीला आगामी स्पर्धांसाठी नवी नियुक्ती करावी लागणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket