बायो-बबलचा बट्ट्याबोळ! IPL 2021 साठी आजचा दिवस D-Day, सर्व सामने मुंबईत होणार?

बायो-बबलचा बट्ट्याबोळ! IPL 2021 साठी आजचा दिवस D-Day, सर्व सामने मुंबईत होणार?

IPL 2021 बाबत लवकरच मोठा निर्णय BCCI कडून घेतला जाऊ शकतो. या हंगामातील स्पर्धेपुढे कोरोनाचं संकट वाढल्याने बीसीसीआयने हा निर्णय घेण्याची तयारी सुरू केली आहे

  • Share this:

मुंबई, 04 मे: देशामध्ये कोरोनाची दुसरी लाट (Corona Second Wave) थैमान घालत असतानाच बायो-बबलच्या (Bio Bubble) सुरक्षेमध्ये देशातील काही मोजक्या शहरांमध्ये इंडियन प्रीमिअर लीग (IPL 2021) क्रिकेट सामने होत आहेत. मात्र कोलकाता नाइट राइडर्स आणि चेन्नईच्या टीमधील खेळाडू आणि सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळल्यानं बायो-बबल्सचा फुगा फुटल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळं 3 मे रोजी होणारा कोलकाता नाइट राइडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामना पुढे ढकलण्यात आला आहे. दरम्यान या हंगामाच्या अर्धे सामने झाले आहेत. मात्र उर्वरीत सामने मुंबईत आयोजित करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. आजच याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. यासाठी अहमदाबाद तसंच दिल्लीतून सर्व खेळाडूंसह सर्व यंत्रणा मुंबईला हलवण्यात येऊ शकते.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय (BCCI) शुक्रवार, 7 मेपर्यंत दिल्ली आणि अहमदाबादमधील संपूर्ण यंत्रसामग्री मुंबईतील वानखेडे आणि डी.वाय.पाटील स्टेडियमवर हलवण्याच्या कामाला लागले आहे. खेळाडूंची सोय मुंबईत करण्यासाठी हॉटेल्स निश्चित करणे, विमानांची सोय करणे, मैदाने तयार करणं, नवीन बायो बबल तयार करणे, ग्रीन झोन तयार करणं यासाठी बीसीसीआय आणि फ्रँचायझीजनी युद्धपातळीवर काम सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. असं असलं तरीही हॉटेल्स आणि मैदाने सॅनिटाइझ करणं आदी तयारीसाठी वेळ लागल्यास ही मुदत पुढं जाऊ शकते.

ही सगळी यंत्रणा हलवण्यासाठी प्रचंड मोठ्या वाहतूक व्यवस्थेची गरज असून, पुन्हा बायो बबल फुटू नये यासाठी काळजी घेणं आव्हानात्मक असल्याचं बीसीसीआयनं म्हटलं आहे. पूर्व नियोजनानुसार, अंतिम टप्प्यासाठी अहमदाबाद इथं येण्यापूर्वी क्रिकेट संघ दिल्ली आणि अहमदाबाद इथून कोलकाता आणि बेंगळूरू इथं रवाना होणार होते. पण कोरोनाच्या वाढत्या संकटामुळं सर्व फ्रँचायझीजनी कोलकाता आणि बेंगळूरू इथं जाण्यास नकार दिला. दिल्लीतही कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्यानं तिथंही जाण्यास त्यांनी नकार दिला आहे. दिल्लीत दररोज 20 हजार रुग्ण सापडत आहेत. त्यामानानं मुंबईत रुग्णसंख्या घटत असून, रविवारी 3672 रुग्णांची नोंद झाली. या पार्श्वभूमीवर आयपीएल मुंबईत हलवण्याचा निर्णय घेण्यात येऊ शकतो. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा करून उर्वरीत सामन्यांसाठी मुंबईत परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. सुरक्षा नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीसह याला मान्यता देण्यात आली आहे.

(हे वाचा-IPL 2021: आणखी एक सामना होणार रद्द?कोरोनामुळे RR विरोधात खेळण्यास CSK तयार नाही)

दक्षिण मुंबईतील वानखेडे आणि ब्रेबॉर्न स्टेडियम तर नवी मुंबईतील डी.वाय.पाटील पाटील स्टेडियम पुढील 72 तासांत सामन्यासाठी तयार करावी लागणार असून, आयपीएलच्या पहिल्या तीन आठवड्यांमध्ये वानखेडे स्टेडियमचा वापर करण्यात आला होता; पण ब्रेबॉर्न आणि डी.वाय.पाटील स्टेडियमवर दीर्घकाळ सामने झालेले नाहीत. ही स्टेडियम्स कमीत कमी वेळेत तयार करणं, हॉटेल बुकिंग आणि विमान प्रवास ही बीसीसीआय समोरची सर्वांत मोठी आव्हानं आहेत. हॉटेलांबाबत थोडी काळजी आहे, कारण दक्षिण मुंबईत काही कोविड सेंटर्स आहेत,असं बीसीसीआयच्या सूत्रांनी म्हटलं आहे.

विमान प्रवासाचे नियोजन ही व्यवस्थित करण्याची गरज असून विमानतळांवरील प्रवेश आणि बाहेर पडण्याची द्वारेही चिंतेची बाब आहे. अनेक फ्रँचायझींनी विमानतळ टर्मिनलमुळे बायो-बबल फुटण्याचा धोका व्यक्त केला आहे, असंही सूत्रांनी म्हटलं आहे.

दरम्यान, बीसीसीआयनं सोमवारी मुंबईतील विविध हॉटेल्सशी सुरक्षित बायो-बबलच्या दृष्टीनं एकापेक्षा अधिक फ्रँचायझींची एकाच हॉटेलमध्ये सोय करण्याबाबत चर्चा केली. या सगळया प्रक्रियेला उशीर झाल्यास बीसीसीआय सामन्यांचे वेळापत्रक बदलून डबल-हेडर करण्याबाबत विचार करत आहे. तर उत्पन्नात अडथळा निर्माण करणारे डबल-हेडर टाळण्यासाठी ब्रॉडकास्टर्स स्टार आयपीएल जूनपर्यंत पुढं ढकलण्याची विनंती करण्याची शक्यता आहे.मात्र या स्पर्धेची सांगता लवकर व्हावी अशी आयपीएल अधिकाऱ्यांची इच्छा आहे. त्यामुळे आता पुढे काय होईल, हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.

बायो-बबल्स म्हणजे काय?

बायो-बबल्स ही एक संकल्पना असून यामध्ये सॅनिटाइज करण्यात आलेल्या एखाद्या ठराविक परिसरामध्ये किंवा ठिकाणावर ठरवून दिलेल्या व्यक्तींना प्रवेश दिला जातो. विशेष म्हणजे बायो-बबल्समध्ये प्रवेश देण्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची करोना चाचणी निगेटिव्ह असणं बंधनकारक असतं. बायो-बबलमधील जागा या एखाद्या आयसोलेशन सेंटरसारख्याच असता. अगदीच मोजक्या व्यक्तींना तेथे प्रवेश असतो. बाहेरच्या जगाशी केवळ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या व्यक्तींचा संपर्क असतो. एकदा का बायो-बबल्समधील व्यक्तीला बाधा झाली ती त्या बबल्समध्ये असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला बाहेर जाता येत नाही किंवा नव्या व्यक्तीला त्या परिसरामध्ये प्रवेश दिला जात नाही.अनेक कठोर नियमांचे पालन करावे लागते.

First published: May 4, 2021, 11:31 AM IST

ताज्या बातम्या