चेन्नई, 25 मे : मुंबई इंडियन्सने आयपीएल 2023 मध्ये जबरदस्त पुनरागमन केलं आहे. चेन्नईत झालेल्या एलिमिनेटर सामन्यात मुंबईने लखनऊ सुपर जायंट्सला 81 धावांनी धूळ चारली. यासह क्वालिफायर 2 मध्ये जागा मिळवली आहे. आता त्यांचा सामना गुजरात टायटन्ससोबत होणार आहे. मुंबईला विजेतेपदाचा षटकार मारण्यासाठी गुजरातला हरवून चेन्नईला फायनलमध्ये हरवावं लागेल.
मुंबईच्या विजयाचा शिल्पकार आकाश मधवाल होता. टिच्चून मारा करत आकाश मधवालने 3.3 षटकात 5 धावा देत 5 गडी बाद घेतले. आयपीएल इतिहासात अनकॅप्ड खेळाडूने केलेली ही सर्वोत्तम गोलंदाजी ठरली. मुंबई इंडियन्सने दिलेल्या १८३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊची स्थिती 3 बाद 78 अशी होती. पण यानंतर लखनऊचे फलंदाज एका पाठोपाठ एक बाद होत गेले आणि संघाचा डाव 101 धावात संपुष्टात आला. या सामन्यात 5 विकेट घेणारा आकाश मधवाल प्लेअर ऑफ द मॅच ठरला.
सामन्यात विजयानंतर आकाश मधवाल म्हणाला की, मी सतत सराव करत होतो आणि संधीची वाट बघत होतो. मी इंजिनिअरिंग केलं तेव्हापासून टेनिस बॉल क्रिकेट खेळत आहे. कारण मला हे आवडतं. यॉर्करबाबत बोलताना आकाश म्हणाला की, इंजिनिअर्सना एक सवय असते की ते लवकर शिकतात. मीसुद्धा याचा खूप सराव करतो आणि जेव्हा संधी मिळाली तेव्हा मैदानावर ते करून दाखवलं.
आकाशने म्हटलं की, मला स्वत:चा अभिमान आहे. मी आणखी चांगलं करून दाखवण्याचा प्रयत्न करेन. जसप्रीत बुमराहची स्वत:ची जागा आहे. मला संघाने संधी दिली. मला मिळालेली ही जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करतोय. माझ्यासाठी निकोलस पूरनची विकेट बेस्ट होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2023