मुंबई, 30 डिसेंबर : भारताचा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने महाराष्ट्रासाठी असलेलं आपलं प्रेम पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ म्हणजेच एमटीडीसीने (MTDC) ट्विट केलेल्या एका व्हिडिओवर अजिंक्य रहाणेने प्रतिक्रिया दिली आहे. एमटीडीसीने एका बोलू शकता न येणाऱ्या कुटुंबाचा पर्यटनाला आलेल्याचा व्हिडिओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेयर केला आहे. 'भावना व्यक्त करायला भाषेची गरज नाही. आमच्या पाहुण्यांना हसताना बघण्यापेक्षा जास्त आनंद आम्हाला कशाचाही होत नाही. या कुटुंबाचं आदरातिथ्य केल्याबद्दल आम्हाला आनंद आहे,' असं ट्विट एमडीटीसीने केलं. समुद्रकिनाऱ्यावर लाईप जॅकेट घालून हे कुटुंब उभं आहे.
अजिंक्य रहाणेनेही एमटीडीसीचं हे ट्विट रिट्विट केलं. 'पर्यटक आनंद घेत असल्याचं बघून छान वाटलं. महाराष्ट्र पर्यटनासाठी पुन्हा एकदा सुरक्षित करण्यासाठी आणि सगळी काळजी घेण्यासाठी पर्यटन मंडळालाही सलाम,' असं ट्विट अजिंक्य रहाणेने केलं आहे. कोरोनाच्या संकटानंतर महाराष्ट्र सरकार हळू हळू गोष्टी अनलॉक करत आहे, त्यातच आता नाताळच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटकही पुन्हा एकदा पर्यटनासाठी बाहेर पडताना दिसत आहेत.
Lovely to see tourists enjoying their visit and kudos to the tourism department for taking all the necessary precautions to make sure Maharashtra is safe for travel again https://t.co/YLICy687h6
अजिंक्य रहाणेने याआधी कोरोना काळात मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 10 लाख रुपयांची मदत केली होती. तसंच शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही अजिंक्य रहाणे त्याचं मत मांडतो.
मेलबर्नमध्ये झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये अजिंक्य रहाणे भारताच्या विजयाचा (India vs Australia) शिल्पकार ठरला. पहिल्या इनिंगमध्ये शतकी खेळी केल्यानंतर रहाणे दुसऱ्या इनिंगमध्ये 27 रनवर नाबाद राहिला. विराट कोहली (Virat Kohli)च्या अनुपस्थितीमध्ये अजिंक्य रहाणे टीम इंडियाचा कर्णधार होता. पहिल्या टेस्टमध्ये झालेल्या पराभवानंतर दुसऱ्या टेस्टमध्ये अजिंक्य रहाणेने केलेल्या नेतृत्वाचंही सगळीकडून कौतुक होत आहे.