News18 Lokmat

...तर मला वर्ल्डकप संघात नक्की घेतील : अजिंक्य रहाणे

राजस्थान रॉयल्स या आयपीएल संघाचे कर्णधार असलेल्या रहाणेने सध्या आयपीएलवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 16, 2019 08:57 PM IST

...तर मला वर्ल्डकप संघात नक्की घेतील : अजिंक्य रहाणे

मुंबई, 15 मार्च : अवघ्या दोन महिन्यांवर इंग्लंडमध्ये होणारी वर्ल्डकप स्पर्धा येऊन ठेपली असताना, या स्पर्धेसाठी कोण संघात असतील आणि कोण नाही, हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे. याविषयी मुंबईकर रहाणेने एक सुचक वक्तव्य केले आहे. त्याच्या मते, ''मी जर आगामी आयपीएल स्पर्धेत चांगली कामगिरी केली, तर मला माझे स्थान वर्ल्डकपमध्ये निश्चित होईल. वर्ल्डकपमध्ये सामील होण्याकरीता माझा कोणती वेगळी व्यूहरचना नाही. माझ्यासाठी माझा संघ जिंकून देणे आणि धावा करणे एवढेच महत्वाचे आहे''.

नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या सामन्यात मानहानीकारक पराभव स्विकारल्यानंतर टीम इंडियाच्या मधल्या फळीच्या फलंदाजांच्या प्रश्नांनी पुन्हा तोंड वर काढले. टी-20 आणि वनडे सामन्यात रोहित शर्मा, शिखर धवन आणि विराट कोहली अशा भक्कम वरच्या फळीनंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणार कोण? हा प्रश्न कायमच राहिला. त्यामुळे वर्ल्डकपसाठी संघबांधणी करायची असेल तर, मधली फळी भक्कम असणे गरजेचे आहे. याबाबत सध्या अनेक पर्यांयांचा विचार सुरु आहे. त्यात अजिंक्य रहाणेचेही नाव आघाडीवर आहे.

दरम्यान रहाणेने शेवटचा वनडे सामना 16 फेब्रुवारी 2018ला दक्षिण आफ्रिका विरोधात खेळला होता. म्हणजे जवळजवळ एक वर्ष रहाणे वनडे क्रिकेटपासून लांब आहे. मात्र, सध्या राजस्थान रॉयल्स या आयपीएल संघाचे कर्णधार असलेल्या रहाणेने सध्या आयपीएलवर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे. ''विश्वचषक स्पर्धेबाबत खूप पुढचा विचार करण्यापेक्षा आता मला राजस्थान रॉयल्स संघातील माझ्या कामगिरीचा विचार करणे महत्त्वाचे वाटते'', असे अजिंक्यने नुकतेच स्पष्ट केले. यावर्षीच्या आयपीएलमध्ये राजस्थानचा पहिला सामना २५ मार्चला किंग्ज इलेव्हन पंजाबशी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 16, 2019 08:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...