मुंबई, 20 मार्च : अफगाणिस्तान क्रिकेट टीमचा कर्णधार असगर अफगाण (Asghar Afghan) याने टी-20 क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम केला आहे. कर्णधार म्हणून असगर अफगाण सर्वाधिक टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच जिंकणारा खेळाडू बनला आहे. कर्णधार म्हणून त्याचा हा 42 वा विजय आहे. याचसोबत त्याने टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीचा (MS Dhoni) 41 विजयांचा रेकॉर्ड मोडला आहे. शनिवारी झालेल्या तिसऱ्या टी-20 मध्ये अफगाणिस्तानने झिम्बाब्वेचा (Zimbabwe vs Afghanistan) 47 रनने पराभव केला आणि सीरिज 3-0ने खिशात टाकली. याआधी दोन्ही टीममध्ये झालेली टेस्ट सीरिज 1-1 ने बरोबरीत सुटली होती.
तिसऱ्या टी-20 मध्ये पहिले बॅटिंग करत अफगाणिस्तानने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 183 रन केले. नजीबुल्लाह झादरानने सर्वाधिक 72 रनची खेळी केली. झादरानने 35 बॉलमध्ये 5 फोर आणि 5 सिक्स लगावले. तर उस्मान गनीने 39 आणि असगर अफगाणने 24 रन केले. या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेने 5 विकेट गमावून 136 रनपर्यंत मजल मारली. रियान बर्लने 39 रन आणि सिकंदर रजाने 41 रन नाबाद केले. करीम जन्नतला दोन विकेट मिळाल्या.
असगर अफगाणच्या नेतृत्वात अफगाणिस्तानला 52 मॅचमध्येच 42 विजय मिळाले, तर धोनीला हा रेकॉर्ड करण्यासाठी 72 मॅच लागल्या. इंग्लंडचा कर्णधार इयन मॉर्गन 33 विजयांसोबत तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार सरफराज अहमदने 20 विजय, वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमीने 27 मॅच जिंकल्या.
असगर अफगाणने कर्णधार असताना सर्वाधिक 12 सामने आयर्लंडविरुद्ध जिंकले. याशिवाय झिम्बाब्वेविरुद्ध 10, युएई-ओमानविरुद्ध 5-5 विजय मिळवले. अफगाणिस्तानला मोठ्या टीमविरुद्ध खेळण्याची संधी क्वचितच मिळते. असगर अफगाणिस्तानचा कर्णधार असताना त्याला इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवता आला नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Afghanistan, Cricket news, MS Dhoni