मुंबई, 6 जानेवारी : भारतीय टीमचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) याला सौम्य हृदयविकाराचा झटका आला. यानंतर सौरव गांगुली करत असलेल्या फॉर्च्यून तेलाच्या टीव्हीवरच्या जाहिरातीचं प्रसारण तात्पुरतं थांबवण्यात आलं आहे. असं असलं तरी सौरव गांगुली कंपनीचा ब्रॅण्ड ऍम्बेसेडर म्हणून कायम राहिल आणि ही जाहिरात लवकरच पुन्हा प्रसारित होईल, असं कंपनीने स्पष्ट केलं आहे.
गांगुलीला मागच्या आठवड्यात हृदयविकाराचा धक्का आला होता, त्यानंतर त्याच्यावर एन्जियोप्लास्टी करण्यात आली. गांगुलीच्या तब्येतीबाबत सोशल मीडियावर खूप चर्चा रंगल्या आणि काहींनी यावरून फॉर्च्यूनच्या जाहिरातीवरही टीका केली.
गांगुली अडाणी विल्मर समुहाच्या राईस ब्रान कुकिंग ऑईलची जाहिरात करतो. गांगुलीची तब्येत आता स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. अडाणी विल्मरचे उपमुख्य कार्याधिकारी (डेप्युटी सीईओ) अंगुश मल्लिक पीटीआयशी बोलताना म्हणाले, 'आम्ही सौरव गांगुलीसोबत काम करत राहू. तो आमचा ब्रॅण्ड ऍम्बेसेडर म्हणून कायम राहिल. आम्ही फक्त टीव्हीच्या जाहिराती तात्पुरत्या थांबवल्या आहेत. तोपर्यंत पुन्हा सौरवबरोबर बसून आम्ही गोष्टी ठरवू. ही घटना खूप दुर्दैवी आहे. कोणासोबतही असं होऊ शकतं. राईस ब्रान तेल जगातल्या सर्वाधिक आरोग्यदायी तेलापैकी एक आहे. या तेलात नैसर्गिक एंटीऑक्सिडेंट आहे.'
लोकप्रिय हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर देवी शेट्टी यांनी गांगुलीवर उपचार करणाऱ्या 13 डॉक्टरांच्या टीमची भेट घेतली. या डॉक्टरांना भेटल्यावर शेट्टी म्हणाले, 'गांगुली लवकरच फिट होईल आणि त्याचं हृदय 20 वर्षांचा असतान जसं होतं, तसंच चालेल. गांगुलीच्या हृदयाला कोणताही धोका नाही. भविष्यातही या दुखण्याचा कोणताही परिणाम होणार नाही. तो सामान्य आयुष्य जगू शकतो.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.