मुंबई, 30 जून : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्यावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) हरल्यानंतर टीका होत आहे. या पराभवामुळे विराटच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. विराट कर्णधार असताना लागोपाठ 3 आयसीसी स्पर्धांमध्ये टीम इंडियाला विजय मिळवता आला नाही. 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल, 2019 वर्ल्ड कप सेमी फायनल आणि आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये टीमला पराभवाचा धक्का लागला. विराट कोहलीच्या या अपयशाबाबत भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने (Aakash Chopra) त्याच्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेयर केला आहे. या व्हिडिओमध्ये आकाश चोप्राने धोनीच्या यशाचं कारण सांगितलं आहे.
एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वात भारताने तीन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या. 2007 टी-20 वर्ल्ड कप, 2011 वर्ल्ड कप आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये धोनी कर्णधार असताना भारताने विजय मिळवला.
'धोनीने खेळाडूंमध्ये विश्वास निर्माण केला आणि त्यांच्यावर भरवसा ठेवला. त्याने टीममध्ये फार बदल केले नाहीत. हेच त्याच्या यशाचं श्रेय होतं. धोनीने कोणत्याच खेळाडूमध्ये असुरक्षितता निर्माण करू दिली नाही,' असं आकाश चोप्रा म्हणाला.
'जर तुम्ही धोनीची टीम बघितलीत तर लीग स्टेजपासून ते नॉक आऊटपर्यंत त्याने टीममध्ये फार बदल केले नाहीत. तो एकच टीम घेऊन संपूर्ण स्पर्धा खेळायचा. त्याच्याकडे असे खेळाडू होते जे नॉक आऊटमध्ये रन करायचे. जेव्हा तुम्ही क्वार्टर फायनल, सेमी फायनल किंवा फायनलमध्ये पोहोचता तेव्हा सगळ्यात कमी चुका करणाऱ्या टीम जिंकू शकतात. जी टीम संपूर्ण स्पर्धेत फार बदल करत नाही, त्यांच्या खेळाडूंमध्ये आत्मविश्वास जास्त असतो,' अशी प्रतिक्रिया आकाश चोप्राने दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, MS Dhoni, Team india, Virat kohli