मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Jhulan Goswami: 'चकदा एक्स्प्रेस'ला लॉर्ड्सवर विजयी निरोप, 20 वर्षांच्या कारकीर्दीची अखेर

Jhulan Goswami: 'चकदा एक्स्प्रेस'ला लॉर्ड्सवर विजयी निरोप, 20 वर्षांच्या कारकीर्दीची अखेर

झुलन गोस्वामी हरमनप्रीत कौरसह

झुलन गोस्वामी हरमनप्रीत कौरसह

Jhulan Goswami: लॉर्ड्सवर अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळून झुलन गोस्वामीनं आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची सांगता केली. गेली दोन दशकं भारतीय क्रिकेटसाठी झुलननं दिलेलं योगदान फार मोठं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

लंडन, 24 सप्टेंबर: इंग्लंडविरुद्धची लॉर्ड्स वन डे जिंकून हरमनप्रीत कौरच्या टीम इंडियानं मालिका 3-0 अशी खिशात घातली. हा मालिकाविजय भारतीय संघासाठी खास ठरला. कारण या विजयासह भारताची महान गोलंदाज झुलन गोस्वामीला भारतीय संघानं विजयी निरोप दिला. अशा प्रकारे झुलन गोस्वामीच्या 20 वर्षांच्या कारकीर्दीची सांगता झाली. सामना संपल्यानंतर संघातली प्रत्येक खेळाडू भावूक झाली होती. या सामन्यात भारतानं स्मृती मानधना (50) आणि दिप्ती शर्माच्या (68) अर्धशतकानंतरही भारतानं इंग्लंडसमोर 170 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. पण भारताच्या प्रभावी आक्रमणासमोर इंग्लंडचा डाव 153 धावातच आटोपला. भारताच्या रेणुका सिंगनं चार विकेट काढून या विजयात मोलाचं योगदान दिलं.

भारताकडून पहिल्यांदाच इंग्लंडला व्हाईटवॉश

महिला क्रिकेटच्या आजवरच्या इतिहासात भारतीय संघानं इंग्लंडला त्यांच्याच मैदानात वन डे मालिकेत व्हाईटवॉश देण्याची ही पहिलीच वेळ ठरली. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतानं हा पराक्रम गाजवला. भारतानं या मालिकेतील तीनही वन डे जिंकून निर्विवाद वर्चस्व गाजवलं. महत्वाचं म्हणजे कर्णधार हरमनप्रीत कौर मालिकावीर पुरस्काराचीही मानकरी ठरली.

अखेरच्या सामन्यात सुपर स्पेल

आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची सांगता करणाऱ्या झुलननं आपल्या अखेरच्या सामन्यात 10 ओव्हरचा कोटा पूर्ण केला. तिनं या दहा ओव्हर्समध्ये तीन ओव्हर्स मेडन टाकताना दहा रन्स देत 2 विकेट्सही काढल्या. त्यामुळे वन डे क्रिकेटमध्ये  तिनं आपल्या विकेट्सची संख्या 255 वर नेऊन ठेवली.

हेही वाचा - Cricket Laws: नियम बदलला तरी त्याच नियमावरुन पुन्हा राडा... भारताच्या विजयानंतर नवी कॉन्ट्रोवर्सी

सर्वाधिक विकेट टेकर झुलन गोस्वामी

वन डेसह महिलांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्सचा विक्रम झुलन गोस्वामीच्याच नावावर आहे. तिनं 204 वन डे सामन्यात 255 विकेट्स घेतल्या आहेत. तर तर एकूण 284 आंतरराष्ट्रीय सामन्यात एकूम 355 विकेट्स झुलनच्या खात्यात जमा आहे. तिनं भारताकडून 12 कसोटी आणि 68 टी20 सामन्यात प्रतिनिधित्व केलं होतं.

First published: