मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Ind vs NZ: या 5 खेळाडूंनी गाजवला न्यूझीलंड दौरा, BCCIच्या 'मिशन टी20 वर्ल्ड कप 2024'साठी संघात फिक्स?

Ind vs NZ: या 5 खेळाडूंनी गाजवला न्यूझीलंड दौरा, BCCIच्या 'मिशन टी20 वर्ल्ड कप 2024'साठी संघात फिक्स?

न्यूझीलंमध्ये टीम इंडियाचा टी20 मालिकाविजय

न्यूझीलंमध्ये टीम इंडियाचा टी20 मालिकाविजय

Ind vs NZ: आगामी टी20 वर्ल्ड कपमध्येही युवा खेळाडूंची नवी फळी तयार करण्यावर बीसीसीआयचा जोर असेल. न्यूझीलंड दौऱ्यात टॉप परफॉर्मन्स देणारे खेळाडू बीसीसीआयच्या 'मिशन टी20 वर्ल्ड कप 2024' साठी अगदी फिट बसू शकतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

नेपियर, 22 नोव्हेंबर: हार्दिक पंड्याच्या टीम इंडियानं न्यूझीलंडमध्ये टी20 मालिका आपल्या नावावर केली. या दौऱ्यात पावसानं गोंधळ घातला. पण तरीही माऊंट माँगानुईचा सामना जिंकून आणि नेपियर टी20 अनिर्णित राखल्यानं भारताला या मालिकेत 1-0 अशी विजयी आघाडी घेता आली. टी20 वर्ल्ड कपमधल्या पराभवानंतर भारतीय संघासमोर न्यूझीलंड दौरा हे मोठं आव्हान होतं. कारण यावेळी रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली यांच्या अनुपस्थितीत टीम इंडिया न्यूझीलंडमध्ये पोहोचली होती. तर वर्ल्ड कप खेळलेला न्यूझीलंडचा संघ कायम होता. पण हार्दिक पंड्याच्या युवा टीमनं कमाल केली आणि यजमान संघाला त्यांच्याच मैदानात पराभवाची धूळ चारली. टी20 वर्ल्ड कपनंतर बीसीसीआयमध्ये बदलाचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे आगामी टी20 वर्ल्ड कपमध्येही युवा खेळाडूंची नवी फळी तयार करण्यावर बीसीसीआयचा जोर असेल. न्यूझीलंड दौऱ्यात टॉप परफॉर्मन्स देणारे खेळाडू बीसीसीआयच्या 'मिशन टी20 वर्ल्ड कप 2024' साठी अगदी फिट बसू शकतात.

1 - सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार यादव सध्या टी20त जगातला नंबर वन बॅट्समन आहे. त्यानं यंदाच्या वर्षात धावांचा अक्षरश: पाऊस पाडला आहे. आशिया कप, वर्ल्ड कप अशा मोठ्या व्यासपीठावरही त्यानं दमदार फलंदाजी केली. न्यूझीलंड दौऱ्यातही त्यानं बे ओव्हलवरच्या टी20त चक्क शतक झळकावलं. यंदाच्या वर्षातलं सूर्यकुमारचं हे दुसरं शतक ठरलं. त्यामुळे आगामी टी20 वर्ल्ड कपसाठी सूर्या टीम इंडियाचा भक्कम शिलेदार आहे.

2- अर्शदीप सिंग

चार महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या 24 वर्षांच्या अर्शदीपनं भारतीय क्रिकेटमध्ये आपली खास छाप पाडली आहे. दिवसेंदिवस त्याच्यातली प्रगल्भता वाढताना दिसत आहे. डावखुऱ्या अर्शदीपनं वर्ल्ड कपमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या. न्यूझीलंड दौऱ्यातल्या नेपियर टी20त तर त्यानं 4 विकेट्स घेऊन सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

3-दीपक हुडा

दीपक हुडा हा टीम इंडियाचा आणखी एक गुणवान ऑल राऊंडर खेळाडू. गेल्या काही टी20 सामन्यात त्यानं लक्षवेधी कामगिरी बजावली आहे. न्यूझीलंड दौऱ्यातल्या दुसऱ्या टी20त त्यानं चार विकेट्स काढून भारताच्या विजयात मोलाचं योगदान दिलं होतं. आगामी काळात संधी दिल्यास दीपक हुडाच्या रुपात भारताला एक चांगला ऑल राऊंडर मिळू शकतो.

4-मोहम्मद सिराज

मोहम्मद सिराज टीम इंडियाच्या टी20 वर्ल्ड कप संघाचा भाग होता. पण ऑस्ट्रेलियात त्याला एकही मॅच खेळण्याची संधी मिळाली नाही. पण हार्दिक पंड्यानं न्यूझीलंड दौऱ्यात दिलेल्या संधीचा त्यानं चांगला फायदा करुन घेतला. नेपियरमध्ये त्यानंही अर्शदीप सिंगसह 4 विकेट घेतल्या.

5- ईशान किशन

सलामीवीर म्हणून ईशान किशनला टीम इंडियाला आपली जागा बनवण्याची चांगली संधी आहे. बे ओव्हलवरच्या टी20त त्यानं भारताला चांगली सुरुवात करुन देताना 36 धावांची खेळी केली होती. त्यामुळे आगामी काळात टी20साठी नियमित ओपनर म्हणून ईशान किशन फिट बसण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - Ind vs NZ: पाऊस पडला, खेळ थांबला... पण तरीही भारत-न्यूझीलंड मॅच झाली 'टाय!' पण हे घडलं कसं?

हार्दिक पंड्याचा 'ग्रेट स्टार्ट'

बीसीसीआयनं न्यूझीलंड दौऱ्यासाठी रोहित शर्मा, विराट कोहली आणि लोकेश राहुलच्या अनुपस्थितीत हार्दिक पंड्याकडे टीम इंडियानं नेतृत्व सोपवलं होतं. या दौऱ्यात वेलिंग्टनची पहिली टी20 पावसामुळे रद्द झाली. पण माऊंट माँगानुईमध्ये टीम इंडियानं यजमानांचा 65 धावांनी धुव्वा उडवला. तर नेपियरचा सामना टाय अवस्थेत संपला. त्यामुळे टी20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडिया पुन्हा फॉर्ममध्ये परतल्याचं चित्र आहे. त्याचबरोबर हार्दिक पंड्याकडे आता नियमितपणे टी20 टीमची जबाबदारी मिळण्याची शक्यता बळावली आहे.

First published:

Tags: Sports, T20 cricket, Team india