दुबई, 27 ऑक्टोबर: पाकिस्तानच्या क्रिकेट टीमनं मंगळवारी झालेल्या मॅचमध्ये न्यूझीलंडचा (Pakistan vs New Zealand) 5 विकेट्सनं पराभव केला. टीम इंडियानंतर आणखी एका मोठ्या विजयाने हरखून गेलेल्या पाकिस्तानच्या फॅन्सनी सामन्यादरम्यान न्यूझीलंडला ‘Security’ ‘Security’ अशी घोषणाबाजी करत किवींना डिवचले. मात्र, किवींचा कर्णधार केन विल्यमसनच्या (Kane Williamson) मनाचा मोठेपणा बघायला मिळाला. स्लेजिंगनंतरही त्याने पाकिस्तानच्या खेळीचे केले कौतुक केले.
काल झालेल्या सामन्यात शारजाच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत पाकिस्तान संघाने बाजी मारत 5 गडी राखून विजय मिळवत या स्पर्धेतील सलग दुसरा विजय आपल्या नावे केला. पण, वळणाचे पाणी वळणालाच, न्यूझीलंडविरुद्धच्या झालेल्या लढती दरम्यान, पाकिस्तानच्या चाहत्यांनी न्यूझीलंडला ‘Security’ ‘Security’ अशी घोषणाबाजी करत डिवचले.
परंतु त्यांच्या गोष्टीला प्रत्युत्तर न देता किवींचा कर्णधार केन विल्यमसनने पाकिस्तानच्या विजयानंतर संघाच्या उत्कृष्ट खेळीचे कौतुक केले आहे. सामन्यानंतर विल्यमसनने झालेल्या पत्रकार परिषदेत भाष्य केले. तो म्हणाला, शेवटी खूप निराशा झाली. दुर्दैवाने आम्ही काही गोष्टी पूर्ण करू शकलो नाही पण आम्ही एका चांगल्या पाकिस्तान संघाविरुद्ध खेळलो आहोत आणि त्यांचे अभिनंदन. आम्हाला शक्य तितकी सरळ गोलंदाजी करायची होती.
आमच्या काही चुकिच्या शॉटमुळे त्यांना खेळण्याची संधी मिळाली. हा पराभव स्वीकारणे कठीण आहे. दुसऱ्या हाफमध्ये आम्हाला चांगल्या लढतीची अपेक्षा होती. हा एक अतिशय मजबूत पाकिस्तानचा संघ आहे आणि निश्चितपणे पाहण्यासारखा असल्याचे सांगत विल्यमसनने पाकिस्तानचे कौतुक केले.
खेळपट्टीसंदर्भात तो म्हणाला, खेळपट्टीवर सुरुवात करणे खूप कठीण होते. तुम्हाला मोठ्या ओव्हर्ससाठी काही प्रसंगी फटके मारण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण तुमच्याकडे नेहमी डॉट बॉल असतात. संपूर्ण आयपीएलमध्येही असाच अनुभव आला असल्याचे विल्यमसनने यावेळी सांगितले आहे.
या सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर न्यूझीलंड संघाकडून प्रथम फलंदाजी करताना डॅरिल मिशेलने 27आणि डेवोन कॉनवेने देखील 27 धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर न्यूझीलंड संघाला 20 षटक अखेर 8 बाद 134 धावा करण्यात यश आले होते.
या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाकडून मोहम्मद रिझवानने सर्वाधिक 33 आणि आसिफ अलीने नाबाद 27 आणि शोएब मलिकने नाबाद 26 धावांची खेळी करत पाकिस्तान संघाला हा सामना 5 गडी राखून जिंकून दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: New zealand, Pakisatan, T20 cricket, T20 league, T20 world cup