मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup 2007: विश्वविजयाची 15 वर्ष... वर्ल्ड कप फायनल... ती शेवटची ओव्हर... तो कॅच आणि त्यानंतर घडला इतिहास!

T20 World Cup 2007: विश्वविजयाची 15 वर्ष... वर्ल्ड कप फायनल... ती शेवटची ओव्हर... तो कॅच आणि त्यानंतर घडला इतिहास!

विश्वविजयाची 15 वर्ष

विश्वविजयाची 15 वर्ष

T20 World Cup 2007: या मॅचचं जर स्कोअर कार्ड आजही काढून तुम्ही पाहिलात तर असं दिसेल की शेवटची ओव्हर टाकण्यासाठी धोनीकडे हरभजन सिंगचा पर्याय उपलब्ध होता. कारण भज्जीनं त्या मॅचमध्ये तीनच ओव्हर टाकल्या होत्या. त्याच्याकडे अनुभव होता. पण धोनीनं तसं केलं नाही. त्यानं बॉल दिला तो जोगिंदर शर्माच्या हाती.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

मुंबई, 24 सप्टेंबर: साल 2007... हे वर्ष भारतीय क्रिकेटमध्ये घडलेल्या अनेक बदलांचं साक्षीदार ठरलं. खरं तर 2007 या वर्षाची सुरुवात भारतीय क्रिकेटच्या दृष्टीनं चांगली झाली नाही. 2003 साली वन डे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये हरलेला भारतीय संघ 2007 च्या सुरुवातीला राहुल द्रविडच्या नेतृत्वात वर्ल्ड कपसाठी वेस्ट इंडिजमध्ये दाखल झाला. सचिन, सेहवाग, द्रविड, गांगुली, युवराज असे महारथी त्या संघात होते. पण दुर्दैव असं की साखळी फेरीतच हा संघ गारद झाला आणि करोडो भारतीयांच्या आशा अपेक्षांना सुरुंग लागला. वन डे वर्ल्ड कपच्या इतिहासातील भारतीय संघाची सर्वात खराब कामगिरी असं त्या कामगिरीचं वर्णन केलं गेलं.

पण 2007 मध्ये टी20 क्रिकेटचे वारे एव्हाना वाहू लागले होते. इंग्लंड-ऑस्ट्रेलियात टी20 क्रिकेट बऱ्यापैकी रुजलं होतं. जगभरातले देशही टी20 क्रिकेटकडे वळू लागले होते. त्यामुळे आयसीसीनं त्यावर्षी टी20 वर्ल्ड कप सुरु करण्याची घोषणा केली आणि सप्टेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेत टी20 वर्ल्ड कप घेण्याचं ठरलं. झालं... एका वर्ल्ड कपमध्ये भारतानं लाजिरवाणा पराभव स्वीकारला होता. त्यामुळे निवड समितीला टी20 वर्ल्ड कपसाठी एक चांगला संघ निवडायचा होता. तेव्हा आतासारखं आयपीएल किंवा डोमेस्टिक क्रिकेटमध्ये टी20 स्पर्धांचा जोर नव्हता. त्यामुळे हाताशी मोजकेच पर्याय होते.

धोनीची यंग ब्रिगेड

2007 च्या टी20 वर्ल्ड कप संघनिवडीपूर्वी भारताच्या दिग्गजांनी या स्पर्धेत खेळणार नसल्याचं जाहीर केलं आणि निवड समिती सदस्यांचा पेच आणखी वाढला. सचिन, गांगुली, द्रविड यांनी स्पर्धेतून माघार घेतली. त्यामुळे बीसीसीआयनं रांचीच्या महेंद्रसिंग धोनीच्या हाती टीम इंडियाची कमान सोपवली आणि 15 शिलेदारांना घेऊन धोनीची यंग ब्रिगेड दक्षिण आफ्रिकेत दाखल झाली. या संघात सिनियर म्हणावे असे सेहवाग, गंभीर, युवराज, हरभजन आणि आगरकर असे मोजकेच खेळाडू. बाकी सगळी विशी-पंचविशीतली यंग ब्रिगेड...

धोनीच्या त्या भारतीय संघानं सगळ्याच क्रिकेट पंडितांची मतं फोल ठरवली. कारण भारताकडे तेव्हा टी20 क्रिकेटचा फारसा अनुभव गाठीशी नव्हता. त्यात अख्खा संघ नवीन. त्यामुळे धोनीचा हा संघ फायनल गाठेल असं कुणालाही वाटलं नव्हतं. पण ते प्रत्यक्षात घडलं. दक्षिण आफ्रिकन भूमीवर धोनीच्या भारतीय संघानं पाकिस्तान, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया अशा मातब्बर संघांना हरवून फायनलमध्ये प्रवेश केला.

बॉल आऊट-6 सिक्सर्स अविस्मरणीय

स्पर्धेदरम्यान भारतानं पाकिस्तानला सुरुवातीला हरवलं ते साखळी फेरीत तेही बॉल आऊटवर. भारत आणि पाकिस्तान संघातला तो सामना टाय झाला. तेव्हा आतासारखी सुपर ओव्हरची संकल्पना अस्तित्वात नव्हती. तेव्हा फुटबॉलमधल्या पेनल्टी किकप्रमाणे बॉलआऊटवर विजेता ठरायचा. याच बॉलआऊटमध्ये भारतानं पाकिस्तानला 3-0 अशी मात देत विजय निश्चित केला.

बॉलआऊटनंतर आजही प्रत्येकाच्या अंगावर शहारे आणणारा युवराजच्या सहा सिक्सर्सचा तो पराक्रम. भारत-इंग्लंड सुपर-8 सामन्यात युवीनं इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडचे सहाही बॉल्स बाऊंड्री लाईनच्या बाहेर भिरकावले. आतापर्यंतच्या टी20 क्रिकेटच्या इतिहासातल्या सर्वोत्तम क्षणांमध्ये युवीचे ते सहा सिक्स आजही पहिल्या नंबरवर असतील.

भारत-पाकिस्तान ऐतिहासिक फायनल

पहिल्यावहिल्या टी20 वर्ल्ड कपमधला तो अंतिम सामना आजही क्रिकेट रसिकांच्या मनात कायम आहे. फायनलमध्ये धोनी अँड कंपनीनं गौतम गंभीरच्या 75 धावांच्या खेळीच्या जोरावर पाकिस्तानसमोर 158 धावांचं आव्हान उभं केलं. पण मिसबाह उल हकच्या खेळीनं सामन्याचं पारडं पाकिस्तानकडे झुकवलं. त्या सामन्यात पाकिस्तान सहज जिंकेल अशी स्थिती होती. कारण मिसबाह उल हकटं एका बाजूनं भारतीय गोलंदाजीवरचं आक्रमण सुरु होतं. पण पाकिस्तानी फलंदाजीची एक बाजू मात्र टीम इंडियाच्या जाळ्यात अडकत गेली. अखेर शेवटच्या ओव्हरमध्ये पाकिस्तानसमोर होतं 13 धावांचं आव्हान आणि विकेट होती फक्त एक.

जोगिंदर शर्मावर धोनीचा विश्वास

या मॅचचं जर स्कोअर कार्ड आजही काढून तुम्ही पाहिलात तर असं दिसेल की शेवटची ओव्हर टाकण्यासाठी धोनीकडे हरभजन सिंगचा पर्याय उपलब्ध होता. कारण भज्जीनं त्या मॅचमध्ये तीनच ओव्हर टाकल्या होत्या. त्याच्याकडे अनुभव होता. पण धोनीनं तसं केलं नाही. त्यानं बॉल दिला तो जोगिंदर शर्माच्या हाती. वर्ल्ड कप फायनल... त्यातही निर्णयाक ओव्हर त्यामुळे जोगिंदरवर कमालीचा दबाव होता. त्याच दबावात त्यानं पहिला बॉल वाईड टाकला. पाकिस्तानला जिंकायला हवे आता 6 बॉल 12 रन्स. फक्त दोन सिक्स आणि खेळ संपला. जोगिंदरनं पुढचा बॉल निर्धाव टाकला. पण सामना अजूनही पाकिस्तानच्या हातात होता कारण मिसबाह नावाची तोफ समोर होती. याच तोफेच्या तोंडी जोगिंदरनं पुढचा बॉल दिला आणि मिसबाहनं तो थेट सीमारेषेबाहेर फेकला. पाकिस्तानी चाहते आनंदानं उड्या मारु लागले. आणि भारतीय ड्रेसिंग रुममध्ये मात्र शांतता पसरली.

4 बॉल 6 रन्स... समीकरण सोपं होतं... चारपैकी चारही बॉल मिसबाह स्ट्राईकवर राहिला असता तरी त्यानं त्यापैकी एका बॉलवर सिक्सर नक्कीच मारला असता. पण तसं झालं नाही. कारण जोगिंदरच्या पुढच्या बॉलवर स्कूप करण्याच्या नादात मिसबाहनं शॉर्ट फाईन लेगकडे उभ्या असलेल्या श्रीशांतच्या हातात कॅच दिला. सगळ्यांचं लक्ष त्या कॅचकडे गेलं आणि श्रीशांतनं तो कॅच जेव्हा घेतला तेव्हा केवळ जोहान्सबर्गमध्येच नव्हे तर अख्ख्या देशात सुरु झाला टीम इंडियाच्या विश्वविजयाचा जल्लोष.

विश्वविजयाची 15 वर्ष

आजही जेव्हा भारतीय संघ 2007 च्या वर्ल्ड कपची ती ट्रॉफी उचलतानाचे व्हिडीओ आपण बघतो तेव्हा एक वेगळाच रोमांच जाणवतो. त्याच विश्वविजयाला आज 15 वर्ष पूर्ण झाली आहे. या 15 वर्षात भारतीय क्रिकेट किंबहुना आंतरराष्ट्रीय क्रिकेट बरंच बदललं आहे. त्या टी20 विश्वविजयानंतर भारतात क्रिकेटचा हा छोटा फॉरमॅट चांगलाच रुजला. बीसीसीआयनं टी20च्या जातकुळीतलं आयपीएल नावाचं एक रोपटं लावलं. आज त्याचा वृक्ष झालाय. अनेक स्पर्धा याच फॉरमॅटमध्ये होऊ लागल्या आहेत. पण धोनीच्या संघाची ती जादूई कामगिरी आजही प्रत्येकाच्या मनात, हृदयाच्या एका कप्प्यात कायम आहे.

First published:

Tags: MS Dhoni, Sports, T20 world cup, Team india