• Home
  • »
  • News
  • »
  • special-story
  • »
  • प्रकाश मेहतांच्या वादाची 'अंदर की बात' !

प्रकाश मेहतांच्या वादाची 'अंदर की बात' !

एसआरए घोटाळ्यामुळे वादात सापडलेले मंत्री प्रकाश मेहता नेमके कशामुळे अडचणीत सापडलेत. याबाबतचा हा विशेष वृत्तांत...

  • Share this:
रफिक मुल्ला, विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र सरकारचे वादात अडकलेले प्रकाश मेहता हे 13 वे मंत्री ठरलेत. गृहनिर्माण मंत्र्यांचा कारभार वादात आला तो नेमका झोपडपट्टी पुनर्विकास योजनेतली असंख्य भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर आल्याच्या पार्श्वभूमीवर, हा योगायोग म्हणावा की मेहतांच्या विरोधकांचे नेमके राजकीय 'टायमिंग' हे काही काळाने स्पष्ट होईलच. सध्या तरी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता अडचणीत आलेत हे नक्की आता मुख्यमंत्रीच त्यांच्या 'किस्मत का फैसला' करणार आहेत.. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या अंगलट आलेले प्रकरण नेमके काय आहे आणि मुख्यमंत्र्यांची यामध्ये काय भूमिका आहे हा प्रश्न विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात गेले काही दिवस विचारला जातोय. ताडदेव येथील एमपी मिल कंपाऊंडमधील 'एसआरए' योजना खरे तर पूर्ण झाली होती. मात्र राज्य सरकरने निर्णय घेतला की झोपडपट्टी धारकांना 225 ऐवजी 269 चौरस मीटर आकाराचे घर देण्यात यावे. त्यामुळे या योजनेला सुद्धा हा नियम लागू झाला आणि 2009 मध्ये नवीन नियमानुसार या योजनेला 2.5 ऐवजी 3 चटई क्षेत्र मिळाले, विकासकाने ते वापरण्यासाठी लाभधारकांना बाल्कनी काढून देण्याचे ठरले, बांधकाम सुरू झाले मात्र काही राहिवाशांनी या बांधकामाला विरोध केला, त्यामुळे विकासकाने नवीन प्रस्ताव बनवला की जे चटई क्षेत्र मिळाले आहे ते आम्ही वेगळे गाळे बांधण्यास वापरतो, सरकारने ते ताब्यात घावेत आणि प्रकल्प बाधित लोकांच्या पुनर्वनासाठी वापरावेत, असा प्रस्ताव एसआरए विभागाला नव्याने सादर केला गेला. विशेष म्हणजे हाच तातडीचा प्रस्ताव एसआरएचे तत्कालीन कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील यांनी देखील तातडीने मंजूर करून गृहनिर्माण विभागाकडे पाठवला, मंत्री प्रकाश मेहता यांनीही त्याला मंजुरी दिली, पण हीच मंजुरी देताना विकास नियमावलीला डावलण्यात आले, याबाबत अधिकाऱ्यांनी शंका उपस्थित करताच गृह निर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी या प्रस्तावाबाबत मुख्यमंत्र्यांना म्हणजेच नगरविकास विभागाच्या प्रमुखांना अवगत करण्यात आले आहे, असे तोंडी उत्तर दिले. मात्र संबंधीत अधिकाऱ्यांने स्वतःवर काही बालंट येऊ नये, म्हणून हा प्रस्ताव मंजूर करतानाच्या नोंदीमध्ये, मुख्यमंत्र्यांना याबाबत अवगत करण्यात आले आहे, असा स्पष्ट उल्लेख केला. याच वादग्रस्त शेऱ्यामुळे खऱ्याअर्थाने प्रकाश मेहता पुरते अडचणीत आलेत. बरं ते एकटेच अडचणीत आले नाहीतर त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही संकटात टाकलंय. आपलं नाव वापरून मेहतांनी एसआरएचा प्रखल्प नियमबाह्य पद्धतीने मंजूर करून घेतल्याचं मुख्यमंत्र्यांच्या कानावर जातात त्यांनी सर्वप्रथम हा प्रस्तावच रद्द करून टाकला आणि तात्काळ प्रकाश मेहताना त्यांच्या दालनात खुलासा करण्यासाठी हजर राहण्याचे आदेश दिले. या वादग्रस्त शेऱ्यावरून मुख्यमंत्री प्रकाश मेहतांवर इतके भडकले होते की तीन वर्षात पहिल्यांदाच त्यांचा आवाज थेट दालनाबाहेर ऐकू आला होता. अशी खात्रीलायक माहिती मंत्रालयातले कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी खासगीत बोलताना दिलीय. विरोधकांनी नेमकं हेच वादग्रस्त एसआरए प्रकरण उचलून प्रकाश मेहतांच्या राजीनाम्याची मागणी अतिशय आक्रमक लावून धरलीय. किंबहुना प्रकाश मेहतांचं हे प्रकरण म्हणजे बाहुबली पार्ट - 2 चा ट्रेलर असल्याची चर्चाही विधीमंडळ परिसरात रंगलीय. खरंतर दोन विकासकांच्या अंतर्गत वादातून हे प्रकरण बाहेर आलंय. पण त्यामुळेच प्रकाश मेहता चांगलेच अडचणीत आलेत. पाहुयात आता मुख्यमंत्री त्यांच्याबाबत नेमका काय निर्णय घेतात ते.
First published: