मनोज जयस्वाल, वाशिम, 24 आॅगस्ट : भाबडं, पोळलेलं मन परमेश्वर नावाच्या शक्तीशी स्वत:ला जोडू पाहातं. आता सगळा भार त्याच्यावर असं म्हणून रोजच्या युद्धाला सज्ज होण्याची आमची मानसिकता आहे. विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरील वाशीम जिल्ह्यातल्या आडगावातल्या लोकांनीही देवाच्या भेटीसाठी धावा सुरु केलाय. शेतीत राम राहिला नाही असं म्हणतात पण देव नक्की दिसू लागलाय.
देवाचा धावा करणाऱ्या माणसांना देव कधी, कुठे आणि कसा भेटेल याचा नेम नाही. विदर्भ- मराठवाड्याच्या सीमेवरील वाशीम जिल्ह्यातल्या आडगावातल्या लोकांसाठी तो जमिनीतून अवतरलाय. यत्र-तत्र सर्वत्र ज्याचं अस्तित्व आहे अशा देवाचा धावा करणाऱ्या या माणसांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. त्याचं कारणही तसंच आहे...ऐन श्रावणी सोमवारी शेतात महादेवाची पिंड अवतरलीय.
शेतात अवतरेल्या या पिंडीत कुणाला महादेव... कुणाला पार्वती...कुणाला कासव दिसला तर काहीजणांना सापही...आता एकाच ठिकाणी एवढं सगळं दिसू लागल्यावर हा दैवी चमत्कार म्हणून खपला नसेल तरच नवल...
मग काय चमत्कार चमत्काराची हाकाटी पिटली गेली आणि मग दणादण नारळं फुटू लागली...अगरबत्या पेटू लागल्या... भोळ्या शंकराच्या भेटीसाठी भोळे भक्त धावू लागले... नतमस्तक होवू लागले.. वातावरण अगदी भक्तीमय होऊन गेलं..जणू गावाचा भाग्योदय झाल्याची भावना...
नदीकाठावर हिंदू संस्कृती उदयाला आली. तिथं हजारो मंदिरं आहेत. पण तरीही माणसं त्याला अनेक ठिकाणी शोधत राहातात. कधी भिंतीवरच्या प्रतिकृतीत... कधी कुठल्या फळात...अगदी झाडातही तो दिसू लागतो...त्याचं महात्म्य भोळ्या भाबड्या भक्तांसाठी अफाट असतं...कारण त्याला चमत्काराचं कोंदण असतं...शेवटी चमत्कारालाच नमस्कार करण्याची आपल्याकडे रीत आहे.
-----------------------------
बर्थडे स्पेशल : करमाळा ते बॉलिवूड...एका 'सैराट'काराचा प्रवास
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा