उत्तरप्रदेश कर्जमाफीचा फुगा फुटला! अवघी 10 रूपयांची कर्जमाफी देऊन बळीराजाची कुचेष्टा

उत्तरप्रदेश कर्जमाफीचा फुगा फुटला! अवघी 10 रूपयांची कर्जमाफी देऊन बळीराजाची कुचेष्टा

महाराष्ट्रात कर्जमाफीवरून सावळा गोंधळ सुरू असतानाच तिकडे योगी आदित्यनाथांनी उत्तरप्रदेशात केलेल्या कर्जमाफीचाही फुगा फुटलाय. तिथं कुणाला 10 रुपये तर कुणाला 38 रूपयांची कर्जमाफी झाल्याची धक्कादायक बाब समोर आलीय.

  • Share this:

हमीदपूर, उत्तरप्रदेश, 12 सप्टेंबर : महाराष्ट्रात कर्जमाफीवरून सावळा गोंधळ सुरू असतानाच तिकडे योगी आदित्यनाथांनी उत्तरप्रदेशात केलेल्या कर्जमाफीचाही फुगा फुटलाय. तिथं कुणाला 10 रुपये तर कुणाला 38 रूपयांची कर्जमाफी झाल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. विशेष म्हणजे उत्तरप्रदेश सरकारने संभारंभपूर्वक कार्यक्रमातच फुटकळ कर्जमाफीची प्रमाणपत्रं वाटून स्वतःची पाट थोपटून घेतलीय. हमीदपूर जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्र हाती घेताच राज्यातल्या शेतकऱ्यांना सरसकट 1 लाखांपर्यंतची कर्जमाफी दिली होती. त्याचीच अंमलबजावणी आता राज्यात सुरू आहे. हमीदपूरमध्येही पालकमंत्री मन्नू कोरी यांच्याहस्ते शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रमाणपत्रं वाटण्यात आली. पण हीच प्रमाणपत्र हातात पडताच काही शेतकऱ्यांचे अक्षरशः डोळेच पांढरे झाले. कारण त्यांना मिळालेली कर्जमाफीची रक्कम अतिशय फुटकळ स्वरूपाची होती. कुणाला 10 रुपये, कुणाला 38 रुपये, कुणाला 221 रुपये काहींना सर्वाधिक म्हणजे अवघी 4 हजार रुपयांची कर्जमाफी झाल्याचं समोर आलंय.

ही अशी फुटकळ स्वरूपाची कर्जमाफी पाहून अनेकांना असंही वाटेल की कदाचित त्यांची कर्जाची रक्कमच तेवढी असेल, पण तसंही नाहीये. शांतीदेवी यांनी एक लाखाचं कर्ज घेतलं होतं. पण त्यांना कर्जमाफी मिळालीय अवघी 10.36 रुपयांची ! युनूस खान यांच्यावर 60 हजारांचं कर्ज असतानाही त्यांना अवघी 38 रुपयांची कर्जमाफी मिळालीय. युनूस खानसारख्याच असंख्य शेतकऱ्यांचीही उत्तरप्रदेश सरकारने अशाच पद्धतीने अवघी 38 रुपयांची कर्जमाफी देऊन शब्दशः कुचेष्टा केलीय.

कर्जमाफीच्या नावाखाली फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकी असती तर आपण समजू शकतो की काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक झाली असेल पण तसंही नाहीये. कन्नोजमध्ये 62 हजारांचं कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना अवघी 315 रुपयांची कर्जमाफी झालीय. बाराबंकी भागातही अशाच पद्धतीने शेतकऱ्यांना अवघी 12 ते 24 रुपयांची कर्जमाफी झालीय.

दरम्यान, उत्तरप्रदेश सरकारने मात्र, ही प्रिटिंग मिस्टेक असल्याचा दावा करत चौकशीचं पोकळ आश्वासन दिलंय. खरंतर महाराष्ट्रातही उत्तरप्रदेशातल्या कर्जमाफीनंतरच कर्जमाफीची घोषणा झालीय. पण अजूनही सरकार ऑनलाईन की ऑफलाईनच्या गोंधळात अडकून पडलंय. त्यामुळे उद्या समजा पुढे जाऊन महाराष्ट्रातही अशाच पद्धतीने शेतकऱ्यांची कर्जमाफीच्या नावाखाली घोर फसवणूक झाली तर अजिबात आश्चर्य वाटून घेऊ नका.

(न्यूज 18)

First published: September 12, 2017, 6:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading