पंकज क्षीरसागर,परभणी
30 मार्च : बोंड अळीच्या संकटानं राज्यातील शेतकऱ्यांना उद्धवस्त केलंय. कापसाचा हंगाम आता संपला असला तरी हंगामकाळात झालेल्या जखमा आता चिघळू लागल्यात. बोंड अळीच्या प्रादुर्भावानं नुकसान झाल्यानं परभणी जिल्ह्यातल्या एका गावात चक्क 6 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केलाय. यात तिघांचा मृत्यू झालाय.
जिल्ह्यातल्या मानवत तालुक्यातल्या मानोली गावात 90 टक्के क्षेत्रावर कापसाची शेती होती. पण यंदा गावातल्या 1300 एकर क्षेत्रावर पिकणाऱ्या 70 टक्के कापसावर बोंड अळ्यांनी डल्ला मारलाय. त्यामुळं गावातल्या निवृत्ती मोरे, वशिष्ठ शिंदे, अमोल सुरवसेंनी विष घेऊन आपली जीवनयात्रा संपवलीय.
तर शेख शागिर, भागवत मांडे आणि राहुल शिंदेंनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांना कसंबसं वाचवलंय. या गावातल्या निवृत्ती मोरेंच्या घरी आम्ही पोहोचल्यानतंर धक्कादायक माहिती समजली. त्यांना 6 एकरात अवघा 3 क्विंटल कापूस हाती आल्यानं त्यांच्यावर 3 लाखांचं कर्ज झालं होतं. ते फेडता येत नसल्यानं मोरेंनी आपली जीवनयात्रा संपवली.
मोरेंप्रमाणं गावातल्या शेख शागिर यांच्या कापसाच्या शेतीचंदेखील नुकसान झालं होतं. त्यांनीही कर्ज न फेडता आल्याच्या भितीनं आत्महत्येचा प्रयत्न केला. पण सुदैवानं ते बचावलेत.
मानोली गावात यंदा 1300 हेक्टरवर कापसाची लागवड झाली होती. पण बोंड अळीच्या प्रादुर्भावानं गावातलं कापसाचं उत्पादन तब्बल 70 टक्क्यांनी घटलंय. अशात गावातल्या जेमतेम 10 टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि 10 टक्के शेतकऱ्यांनाच पिकविम्याची मदत मिळालीय. त्यामुळं गावात प्रचंड निराशेचं वातावरण पसरलंय. अशात बीटी बियाणं कंपन्यांवर सरकारनं कोणतीही ठोस कारवाई न केल्यानं शेतकऱ्यांमध्ये निराशेचं वातावरण पसरलंय.
येत्या हंगामात गावातल्या शेतकऱ्यांकडं पेरणी आणि नवं बियाणं विकत घेण्यासाठीसुद्धा पैसा उरलेला नाही. त्यामुळंच गावात आत्महत्यांचं सत्र सुरू झाल्याची धक्कादायक माहिती पुढं येतेय. विशेष म्हणजे परभणी जिल्ह्यातल्या अनेक गावातली परिस्थिती अशीच आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा