दिनेश केळुसकर,सिंधुदुर्ग
07 जून : मान्सून रखडला असला तरी तळकोकणात आजपासून मिरग सुरू झालाय. पीक चांगलं येऊ दे म्हणून मिरगाच्या दिवशी शेताला रखवालीचा कोंबडा अर्पण करून तो शिजवून खाण्याची परंपरा सिंधुदुर्गात आहे. चला तर आमच्यासोबत मिरगाच्या कोंब्याची चव घ्यायला !
नेहमी हिरवं असणारं कोकण मान्सूनपूर्व पावसाने टवटवीत झालंय. वातावरणात छान गारवा आहे. कारण आता मिरग इलो हा ! म्हणूनच हे शेतकरी गावठी कोंबडा घेऊन निघालेयत आपल्या शेतात. मिरगाच्या दिवशी शेताला रखवालीचा कोंबडा द्यायची ही प्रथा. आता हा रखवालीचा कोंबडा म्हणजे नक्की काय हे ऐका !
कारिवडेचे शेतकरी विष्णू तळवणेकर सांगतात, "सालाबाद प्रमाणे वर्षाक, ढोरावासराक, मुलाबाळाक, शेतात फिरणाऱ्याक देवाची येक रखवाली हेच्यासाटी कोंबो दितव. कोंबो नी नारळ. अवगतनीक काजळ कून्कू ब्रामनाक पानाचो विडो ! असा करून सांगणा करतव. तेच्यामुळा सबंद वर्षभर आमका तेची रखवाली मेळता शेत चांगला पिकताम्हनान आमी सालाबादप्रमाने रितीरिवाजाप्रमाने ह्यो कोंबो दितव .!"
मिरग म्हणजे आमचो गावटी मानसाचो राजा आसा कदी लागता तेची वाट बगीत आसतव तरव्याची सुरुवात आमी मिरगापासून करतव तेच्यासाटी आमी कोन्बो दितव रकवाली दितव.
मिरगाच्या रखवालीचा हा कोंबडा कापायचा तर आहेच पण गाऱ्हाणं झाल्याशिवाय नाही. म्हणूनच कोंबडा कापण्याची तयारी झाली की गाऱ्हाण्याला सुरुवात होते. "बा देवा मेरेकरा माज्या शेताच्यारकवालदारा .. आज ह्यो तुका नारळ कोंबो ठेवलेलो हा तो मान्य करून घे रानटी डुकर म्हना..गवे म्हना हेंच्यापासून सरक्षण कर... आनी तुजो मिरग यंदा मजेत करून घी रे म्हाराजा..!"
गाऱ्हाणं झालं की, मग घरातली चूल पेटते आणि सुरू होते मिरगाचा कोंबडा शिजवण्याची लगबग... मग काय ! नुसत्या वासानेच तोंडाला पाणी सुटतं..
संध्याकाळ झाली की मिरगाच्या दिवशी प्रत्येक घरात हा वास दरवळू लागतो आणि सांगतो की मिरग सुरू झालाय.
घरातली पोरंटोरं, मोठी माणसं सगळेच मग या सागुतीवर ताव मारायला बैठक मारून बसतात. रात्र वाढू लागलेली असते. बाहेर पाउस सुरू झालेला असतो आणि अख्खं गाव मिरगाच्या कोंबड्याची चव घेण्यात मशगुल असतं.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा