30 जानेवारी : धर्मा पाटील प्रकरणी सरकारने जमीन अधिग्रहणाचा खुलासा केलाय हा धांदात खोटा, बोगस आणि लबाडीचा आहे असा लेटरबाॅम्ब टाकत भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी सरकारचे वाभाडे काढले आहे.
शासनाच्या वेगवेगळ्या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहण करताना शासनातील अधिकारी फार मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करतात. शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारून आपल्या दलालामार्फत अक्षरश: लूट करीत आहे. धर्मा पाटील यांच्या प्रकरणामुळे जमीन अधिग्रहण कार्यालयातील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश झालाय असं पत्र अनिल गोटे यांनी सरकारला लिहिलंय.
पत्रात ते पुढे म्हणतात, जमीन अधिग्रहण कार्यालयाबाहेर आणि कार्यालयात सुद्धा दलालांचा सुळसुळाट झाला. या दलालांच्या मध्यस्थीशिवाय शेतकऱ्यांना दाद मिळत नाही. या दलालांमध्ये राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असून एकदा यांचे मुखवटे फाडून खरा चेहरा जनतेसमोर आला पाहिजे असंही गोटे म्हणाले.
84 वर्षांचे धर्मा पाटील वयोवृद्ध शेतकरी होते. त्यांची बागायत शेती आणि आंब्याची 400 झाडे असताना 7/12 च्या उताऱ्यावर त्याची नोंद होती. पण जमीन मोबद्दला म्हणून फक्त 2 लाख 18 हजार रुपये मिळाले. मात्र, त्यांच्याच बांधाला लागून असलेल्या शेतकऱ्याला 1 कोटी 90 लाखांची भरपाई मिळाली. यातील 90 लाख रुपये हे दलालांना मिळाले. पण धर्मा पाटील यांनी कोणत्याही दलालाला मध्यस्थी केलं नाही. त्यामुळे त्यांच्या पदरी निराशा आली. या नैराश्यातून त्यांनी मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केलाय असा खुलासाही गोटे यांनी केला.
जमिनीचे अधिग्रहण करताना बाजारभावाप्रमाणे 4 पट नुकसान दिले पाहिजे असा कायदा असताना सुद्धा महसूल अधिकाऱ्यांनी नेमलेले मधले दलाल सरकारला बदनाम करत आहे. जमिनीला भाव न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर सरकारने कठोर कारवाई करावी अशी मागणीही अनिल गोटेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. तसंच अशा या अधिकाऱ्यांनी आधीचे सरकार घालवे तसं आपलं सरकारही घालवतील असा इशाराही गोटे यांनी दिला.
अनिल गोटेंचं पत्र
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dharama patil, Mla anil gote