जो नियम खडसेंना लागू झाला, तो महाजनांना होईल का ?

जो नियम खडसेंना लागू झाला, तो महाजनांना होईल का ?

दाऊद कनेक्शनच्या आरोपावरून जर एकनाथ खडसेंना घरी जावं लागतं तर मग तोच नियम लावत गिरीश महाजनांनी मंत्रिपद का सोडू नये असा सवाल आता विचारला जातोय

  • Share this:

25 मे : दाऊद कनेक्शनच्या आरोपावरून जर एकनाथ खडसेंना घरी जावं लागतं तर मग तोच नियम लावत गिरीश महाजनांनी मंत्रिपद का सोडू नये असा सवाल आता विचारला जातोय. वाद आहे तो नाशिकमध्ये पार पडलेल्या एका लग्नाचा.

गिरीश महाजन कशामुळे अडचणीत?

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमच्या नातलगाच्या लग्नाला गिरीश महाजनांनी हजेरी लावलीय. दाऊदच्या पत्नीच्या बहिणीच्या मुलीचं हे लग्न होतं. त्या लग्नावर आयबीचीही नजर होती. नाशिकचे मुस्लिम धर्मगुरू असलेल्या शहर ए खतिबच्या निमंत्रणावरून महाजन लग्नाला हजर होते. मुलगी कोण आहे, तिचं दाऊदशी नातं काय याची काहीही माहिती नव्हती असा दावा महाजनांनी केलाय. पोलीसांनी ह्या लग्नाची चौकशी केलीय. कोणत्याही चौकशीला तयार असल्याचं महाजनांनी सांगितलंय.

महाजनांनी राजीनामा द्यावा का?

गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे हे दोन्ही नेते जळगावचेच. खडसेंना मंत्रिपद गमवावं लागलं कारण त्यांच्यावर दाऊदशी बोलल्याचा आरोप झाला जो नंतर चौकशीत खोटा निघाला. पण मंत्रिपद सोडून त्यांची चौकशी केली गेली. तोच नियम मग गिरीश महाजनांना का लावू नये असा सवाल उपस्थित होतोच.

मुलीचं दाऊद कनेक्शन काय आहे?

ज्या मुलीचं लग्न झालंय ती दाऊदची भाची आहे. म्हणजे दाऊदच्या बायकोच्या सख्ख्या बहिणीची मुलगी. मुलीचा बाप जग्गी कोकणी हा नाशिकचा कुख्यात बुकी असल्याचीही चर्चा आहे. त्यानं कालच्या लग्नावर पाच कोटी रूपये खर्च केल्याचंही कळतं. त्यामुळेच एवढ्या वादग्रस्त लग्नाला हजेरी लावताना गिरीश महाजनांना काही माहिती नसेल यावर विश्वास ठेवणं अवघड आहे.

पोलिसांची चौकशी कशासाठी?

ह्याच वादग्रस्त लग्नाला 10 पोलीस अधिकारीही हजर होते. त्यात एक एसीपी, 3 पीआय, 4 एपीआय आणि 2 सब इन्सपेक्टरचा समावेश आहे. त्या सगळ्यांची नाशिक पोलिसांकडून चौकशी होतेय. ह्या अधिकाऱ्यांमध्ये सचिन गोरे, मधूकर कड, सोमनाथ तांबे, संजय देशमुख, समशेरखान पठाण अशा अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तुम्ही लग्नाला कसे काय गेला होतात, जाण्याचा उद्देश काय होता, असे सवाल चौकशीत पोलीसांना विचारले गेलेत.

इतर नेत्यांचं काय?

याच लग्नाला भाजपचे इतर नेते, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, देवयानी फरांदे हेही हजर होते. एवढंच नाही तर नाशिकचे महापौर, उपमहापौर, यांच्यासह अनेक नगरसेवकही लग्नाला हजर होते. पोलिसांची ज्या कारणांसाठी चौकशी झालीय त्याच कारणांसाठी नेत्यांची, मंत्र्यांची का नाही असाही सवाल निर्माण होतोच.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 25, 2017 07:59 PM IST

ताज्या बातम्या