केंद्रात शिवसेनेचे खासदार जास्त, भाव मात्र जेडीयूला !

केंद्रात शिवसेनेचे खासदार जास्त, भाव मात्र जेडीयूला !

बिहारमध्ये एकत्र सत्ता स्थापल्यानंतर आता जेडीयूला एक केंद्रीय मंत्रिपद आणि एक स्वतंत्र प्रभार असलेलं राज्यमंत्रिपद देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतं

  • Share this:

कौस्तुभ फलटणकर, नवी दिल्ली

27 जुलै : बिहारमध्ये नितीश कुमार यांनी राजकीय भूकंप केला,पण या राजकीय भूकंपाचे धक्के महराष्ट्रात शिवसेनेला बसणार आहेत. कारण एनडीएमध्ये नितीश यांच्या पक्षाला केंद्रात दोन मंत्रिपद आणि एनडीए संयोजक पद देण्याची तयारी भाजपने केली आहे. एनडीएमध्ये भाजपनंतर संख्येत दुसऱ्या नंबरचा पक्ष असलेल्या शिवसेनेला, त्यांच्या वाट्याचे तीन अतिरिक्त मंत्रीपद देणे तर दूर पण लोकसभेत फक्त दोन खासदार असलेल्या पक्षाला दोन मंत्री पद देऊन सेनेला डिवचलंय.

बिहारमध्ये एकत्र सत्ता स्थापल्यानंतर आता जेडीयूला एक केंद्रीय मंत्रिपद आणि एक स्वतंत्र प्रभार असलेलं राज्यमंत्रिपद देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतं. एनडीएला मजबूत करण्यासाठी आणि राज्यसभेतील भाजपची संख्याबळाची बेगमी वाढवण्यासाठीच जेडीयूला केंद्रातील सत्तेत वाटा देण्याचा भाजपने निर्णय घेतल्याचं सुत्रांनी सांगितलं. मात्र केंद्रात 5 खासदारवर एक मंत्रिपद असा फार्म्युला घटक पक्षासाठी निश्चित करण्यात आला होता त्यामुळे शिवसेनेला 2 मंत्रिपद मिळतील असे बोललं जात होतं.

शिवसेनेचे लोकसभेत १८ आणि राज्यसभेत ३ खासदार आहेत. तर जेडीयूचे लोकसभेत २ आणि राज्यसभेत ११ खासदार आहेत. शिवसेनेपेक्षाही कमी खासदार असताना जेडीयूला शिवसेनेपेक्षा एक मंत्रिपद जास्त मिळण्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, जेडीयूला दोन मंत्रिपदं आणि शिवसेनेच्या वाट्याला एक मंत्रिपद ही रचना शिवसेना मान्य करणार का हे पहाणं औत्सुक्याचं आहे.

महाराष्ट्रात सेना भाजपसोबत सत्तेत आहे. अनेक वेळेस शिवसेनेचे नेते खिशात राजीनामा घेऊन फिरत असल्याचं सांगतात पण कितीही अपमान झाला तरी तो देत मात्र नाहीत असं दिसतंय. नितीशकुमारांनी आत्म्याचा आवाज ओळखून लालूंना सोडलं तसं एवढीच अडचण होत असेल तर सेना सत्तेतून बाहेर का पडत नाही असा सवालही विचारला जातोय.

First published: July 27, 2017, 11:31 PM IST

ताज्या बातम्या