मराठवाड्यातील सेनेच्या 27 आमदारांनी शिवसंपर्क यात्रेचे वाजवले तीन तेरा

मराठवाड्यातील सेनेच्या 27 आमदारांनी शिवसंपर्क यात्रेचे वाजवले तीन तेरा

मराठवाड्यातल्या 40 आमदारांपैकी 27 आमदारांनी पक्षाच्या शिवसंपर्क यात्रेचे तीन तेरा वाजवले. म्हणजेच 27 आमदार संवाद यात्रेत फिरकलेच नाहीत. ना ते कुठल्या गावात गेले ना ते एखाद्या शेतकऱ्याला भेटले.

  • Share this:

12 मे : रावसाहेब दानवेंनी जे काही तारे तोडले ते आपल्यासमोर आहेत. पण याचा अर्थ असा नाही की इतर पक्षाचे नेतेही शेतकऱ्यांसाठी फार काही करतायत. आता शिवसेनेचच बघा... उद्धव ठाकरेंनी  शिवसंवाद यात्रेची घोषणा केली आणि त्यांच्याच आमदारांनी त्या यात्रेचे तीन तेरा केले.

मुंबईत बसून पक्षप्रमुखांनी शिवसेनेच्या आमदारांना गावागावात जाण्याचा आदेश दिला पण त्या आदेशाचं नेमकं काय झालं त्याची एक झलक उस्मानाबादेत पहायला मिळाली.

हे तरी बरं म्हणायचं. आता पुढची माहिती अशी शिवसेनेच्या मराठवाड्यातल्या 40 आमदारांपैकी 27 आमदारांनी पक्षाच्या शिवसंपर्क यात्रेचे तीन तेरा वाजवले. म्हणजेच 27 आमदार संवाद यात्रेत फिरकलेच नाहीत. ना ते कुठल्या गावात गेले ना ते एखाद्या शेतकऱ्याला भेटले. शिवसैनिकांमधला संभ्रम दूर कसा होणार?

विरोधकांनी संघर्ष यात्रा काढली पण ती तूर उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न हाताळण्यात अपयशी ठरली. त्यानंतर सरकारची संवाद यात्रा आली तर दानवेंची शिवीगाळ दिसली. शिवसेनेचे आमदार नेते तर फिरकलेच नाहीत. बरं सेनेच्या यात्रेत मुंबईतल्या नगरसेवकांनाही पाठवलं होतं. त्यात शेतकऱ्यांचे प्रश्न फार काही या नेत्यांना कळत होतं असं दिसलं नाही. बरं त्यातही काही ठिकाणी मुंबईतल्या नगरसेवकांनाच आमदार म्हणून लोकांच्यासमोर नेलं गेलं.

ओमराजे निंबाळकरांनी आमदार चाबुकस्वारांचा उल्लेख केला. खरं तर ते हजरच नव्हते. त्यांनी मुंबईच्या यशोधर फणसेंनाच चाबुकस्वार म्हणून लोकांच्यासमोर उभं केलं.

मराठवाड्यात शिवसेनेचे 40 आमदार असले तरीसुद्धा जिल्हा परिषद, नगर परिषदा आणि नंतर आलेल्या पालिकांमध्ये फारसं काही यश मिळवू शकले नाहीत. त्याचं कारणही शिवसेनेच्या मंत्री, आमदारांनी प्रचारातून घेतलेला काढता पाय हेच होतं. त्यात ना उद्धव ग्रामीण भागात फिरले ना त्यांचे मंत्री. अशीच स्थिती राहिली तर शिवसेनेसोबतचा लोकच संवाद तोडायला मागंपुढे पहाणार नाहीत.

First published: May 12, 2017, 9:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading