शांतता राखा, सरकारचा अभ्यास चालू आहे !

शांतता राखा, सरकारचा अभ्यास चालू आहे !

आज अडीच वर्षांनंतर यातला एक प्रश्न सुटू शकलेला नाही. या ज्वलंत प्रश्नावर माध्यमांकडून विचारणा झाली की सरकारकडून फक्त एकच ठेवणीतलं उत्तर दिलं जातंय. आणि ते म्हणजे अभ्यास चालू आहे

  • Share this:

26 एप्रिल : राज्यातलं भाजपचं सरकार हे खरंतर...मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, शेतकरी आत्महत्या, या ज्वलंत प्रश्नांवर तत्कालीन आघाडी सरकारविरोधात रान उठवूनच सत्तेत आलं. पण आज अडीच वर्षांनंतर यातला एक प्रश्न सुटू शकलेला नाही. या ज्वलंत प्रश्नावर माध्यमांकडून विचारणा झाली की सरकारकडून फक्त एकच ठेवणीतलं उत्तर दिलं जातंय. आणि ते म्हणजे अभ्यास चालू आहे....पाहुयात आपलं मायबाप सरकार सध्या नेमक्या कोणकोणत्या गंभीर विषय फक्त अभ्यासच करतंय ते....

'कर्जमाफी कधी करणार ?, देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर, "अभ्यास चालू आहे"

योगी आदित्यनाथांनी उत्तरप्रदेशात कर्जमाफी केल्यानंतर आपल्या मुख्यमंत्र्यांनी दिलेलं हे उत्तर. महाराष्ट्रातही कर्ज बेबाकी करावी म्हणून शेतकरी रस्त्यावर उतरले. विरोधकांनी सभागृह डोक्यावर घेतलं. दरम्यान उत्तर प्रदेशात नवीन सरकार आलं. पहिल्याच कॅबिनेटमध्ये त्यांनी शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं. आपले मुख्यमंत्री म्हणाले, थांबा, आम्ही कर्जमाफीच्याविरोधात नाही पण उत्तर प्रदेश मॉडेलचा अभ्यास सुरू आहे.

तूर खरेदी

गेल्या तीन महिन्यांपासून राज्यात तूर तुंबलीय. आठवड्याभरापासून राज्यातला शेतकरी रस्त्यावर आहे. मुख्यमंत्री दिल्लीत गेले, त्यांनी पासवानांची भेट घेतली, पंतप्रधानांना भेटले, राज्यातल्या तुंबलेल्या तुरीचं काय करायचं याची चाचपणी केली. दिल्लीनं सांगितलं, तुमच्या तुरीचं तुम्हीच ठरवा. मुख्यमंत्री म्हणाले 22 तारखेपर्यंतचीच तूर घेऊ. कदाचित मुख्यमंत्र्यांचा अभ्यास कमी पडला.

मराठा आरक्षण

विसरला असाल तर थोडसं आठवण करून देतोत. मराठा मोर्च्यांनी फडणवीसांची खुर्ची डळमळीत झालीय अशी चर्चा जोरदार रंगली. प्रत्यक्षात त्यांनी नंतर आलेली प्रत्येक निवडणूक जिंकली. त्यांनीही मग मराठ्यांसाठी शिष्यवृत्ती वगैरे मलमपट्टी लावली. प्रत्यक्षात आरक्षणाचा असलेला मोठा मुद्दा अजून जशास तसा आहे. शेवटच्या वेळेस सरकार त्यावर बोललं, त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणाले, तामिळनाडूच्या आरक्षण मॉडेलचा अभ्यास सुरु आहे.

धनगर आरक्षण

मराठा मोर्च्यांनंतर धनगर आरक्षणासाठीही तेवढाच राजकीय धूमाकुळ उठला. खरं फडणवीस सरकार सत्तेवरच आलं ते धनगर आरक्षणाचं आश्वासन देऊन. प्रत्यक्षात त्यावर काहीही झालेलं नसल्याचं धनगर नेत्यांना वाटतं. बरं हा मुद्दा मोदींच्या दरबारातही गेला. त्यांनीही फडणवीसांना कानपिचक्या दिल्याचं कळतंय. जर मराठा आरक्षणावर अभ्यास सुरु असेल तर धनगर आरक्षणासाठी मुख्यमंत्री नेमका कशाचा अभ्यास करत असतील आणि ते खरंच प्रत्यक्षात येईल का हे सांगणं कठीण आहे.

मुस्लिम आरक्षण- अभ्यासाची गरजच नाही

काही विषय असेही असतील ज्यात मुख्यमंत्र्यांना कसल्याच अभ्यासाची गरज नाही. तो विषय आहे अर्थातच मुस्लिम आरक्षण. जसे आरक्षणासाठी मराठ्यांचे मोर्चे निघाले, धनगरांचे निघाले तसे मुसलमानांचेही निघाले. पण ज्यावेळेसही मुख्यमंत्र्यांना याबाबत छेडलं त्यावेळेस ते म्हणाले असा कुठलाही प्रस्ताव नाही. चला कुठला तरी प्रश्न आहे जो विषय म्हणून मुख्यमंत्र्यांसाठी संपलाय.

First published: April 26, 2017, 9:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading