कौस्तुभ फलटणकर,दिल्ली
19 जून : राष्ट्रपतीपदासाठी भाजपनं दिलेला दलित चेहरा अनपेक्षित नाही. कारण एखादा राजकीय पक्ष एखाद्या नेत्याची एवढ्या मोठ्या पोस्टसाठी उमेदवारी जाहीर करतो त्यावेळेस त्यात राजकीय आडाखे असणारच.
राष्ट्रपतीपदासाठी भाजपचा उमेदवार कोण असेल याचा सस्पेन्स अखेर अमित शहांनी संपवला. सध्या बिहारचे राज्यपाल असलेल्या राम नाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा करण्यात आलीय. कोविंद यांचं नाव तसं म्हटलं तर अपेक्षीत आहे, म्हटलं तर अनपेक्षीत. कारण देशातली राजकीय स्थिती पाहिली तर भाजपला दलित चेहरा देणं अपरिहार्य होतं. त्यातच भाजपकडे मोठ्या दलित चेहऱ्यांची कमतरता राहिलीय. त्यामुळे रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा केली गेलीय.
रामनाथ कोविंद हे मुळचे उत्तर प्रदेशचे, कानपूरमधल्या परौखमध्ये त्यांचा जन्म झाला. ते पेशानं वकील आहेत. कानपूर विद्यापीठाचे ते विद्यार्थी राहिलेत. एवढंच नाही तर त्यांनी दिल्ली हायकोर्टात वकिलीही केलीय.
कोण आहेत राम नाथ कोविंद?
.............................................
राम नाथ कोविंद हे सध्या
बिहारचे राज्यपाल
भाजपच्या दलित मोर्चाचे
माजी राष्ट्रीय अध्यक्ष
राम नाथ कोविंद हे उत्तर प्रदेशातून
राज्यसभेवर 2 वेळेस खासदारही राहिले
अखिल भारतीय कोळी संघटनेचेही
कोविंद अध्यक्ष आहेत
1991 सालापासून ते भारतीय जनता
पार्टीशी जोडले गेले
भाजपाचं राष्ट्रीय प्रवक्तेपदावरही कोविंद
यांनी काम केलं
काँग्रेस आणि विरोधकांनी सध्या तरी कोविंद यांच्या नावावर सावध भूमिका घेतलीय.
राम नाथ कोविंद हे दलित समाजातून येतात. आगामी काळात गुजरात, मध्यप्रदेश अशा मोठ्या राज्यांमध्ये निवडणुका होऊ घातल्यात जिथं दलित मतं महत्वाची आहेत. त्यामुळेच दलित चेहराच का हे पहाणेही महत्वाचं आहे.
राष्ट्रपतीपदासाठी दलित चेहरा का?
...........................................
दलित चेहरा दिल्यामुळे 2019 साली
होणाऱ्या लोकसभेला मदत होईल
दलित चेहरा दिल्यामुळे काँग्रेस, नितीश,
लालूंना विरोध करणं अवघड जाईल
मोदी सरकारची दलितविरोधी प्रतिमा
पुसण्यास मदत होईल
आरएसएसलाही मान्य होईल असा चेहरा,
हिंदुत्ववाद्यांचाही विरोध मावळेल
गुजरात, मध्यप्रदेशसारख्या मोठ्या राज्यात
निवडणुका, तिथंही दलित मतदार महत्वाचे
भाजपनं दलित उमेदवार दिल्यामुळे
मायावती वगैरेंच्या व्होटबँकला धक्का
रामनाथ कोविंद यांच्या नावावर एकमत होणार का किंवा एकमत नाही झालं तर मग यूपीए, डावे तसंच इतर विरोधी पक्ष कुणाला उतरवणार हे पहाणं औत्सुक्याचं आहे. त्यात काँग्रेसकडे हवी तेवढी मतं नाहीत पण यूपीए, डावे, असे सगळे एक झाले तर निवडणुकीत रंगत येऊ शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, NDA, Ramnath kovind, दलित, भाजप