2022 वर्ष भारतासाठी धोक्याचं, लाखो भारतीयांवर बेरोजगारीची कोसळणार कुऱ्हाड?

2022 वर्ष भारतासाठी धोक्याचं, लाखो भारतीयांवर बेरोजगारीची कोसळणार कुऱ्हाड?

'आर्टिफिशियल इंटेलिजन्स'च्या शिरकावामुळं भारतात 2022 पर्यंत महत्त्वाच्या क्षेत्रातल्या रोजगाराच्या संधी घटण्याची दाट शक्यता आहे.

  • Share this:

मुंबई, 30 मार्च : रोजगाराच्या संधीवरून देशात राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जाताहेत. मात्र हे राजकारण बाजूला ठेवून भारतीय रोजगाराचं नेमकं भविष्य काय असणार आहे, यासंदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या संस्थांनी अहवाल सादर केलाय. आपल्या सगळ्यांच्याच डोळ्यात अंजन घालणाऱ्या त्या अहवालावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

भारत... तंत्रज्ञानाला हाताशी धरून जागतिक महासत्तेच्या स्पर्धेत आगेकूच करणारा प्रमुख दावेदार...मात्र तंत्रज्ञानाशी केलेली ही दोस्ती भविष्यात घातक तर ठरणार नाही ना ?अशी भीती आता डोकं वर काढू लागलीय.

आणि त्यामागचं कारण म्हणजे नासकॉम, फिक्की यासारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या आणि अमेरिकेतल्या एचएफएस सारख्या संशोधन संस्थांनी वर्तवलेलं भाकीत..

'आर्टिफिशियल इंटेलिजन्स'च्या शिरकावामुळं भारतात 2022 पर्यंत  महत्त्वाच्या क्षेत्रातल्या रोजगाराच्या संधी घटण्याची दाट शक्यता आहे.

भारतातल्या रोजगाराचं भविष्य

2022 पर्यंत अकुशल कामगार, आयटी, बीपीओ या क्षेत्रात

35 टक्के रोजगार घटण्याची शक्यता आहे

2016 पर्यंत भारतातल्या अकुशल कामगारांची संख्या जवळपास 24 लाखाच्या घरात आहे

2022 पर्यंत अकुशल कामगारांचा आकडा 17 लाखापर्यंच घटण्याची दाट शक्यता आहे

बँकिंग क्षेत्रातल्या कॅशिअर, डेटा एन्ट्री ऑपरेटर, अंडररायटर या सारखी कामं देखील माणसांऐवजी आर्टिफिशियल इन्टेलिजन्स तंत्राद्वारे केली जातील.

याशिवाय आधुनिकरणाचा फटका वेल्डर,पेन्टर, प्रेस ऑपरेटर या वर्गाला देखील मोठ्या प्रमाणावर बसू शकतो.

अहवालात वर्तवलेल्या अंदाजाचं जिवंत उदाहरण पाहायचं असेल तर अमेरिकेच्या अॅमेझॉनच्या सुपरमार्केटमध्ये डोकवायला हवं... जिथं तुम्हाला एकही कर्मचारी दिसणार नाही.

नासकॉमचं भाकीतही यापेक्षा वेगळं नाहीय. भारताच्या आयटी क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या 39 लाख कर्मचाऱ्यांपैकी

40 टक्के कर्मचाऱ्यांना, त्यांच्या कौशल्यात अमूलाग्र बदल करावे लागणार आहेत. अन्यथा त्यांच्यावर बेरोजगारीचं संकट घोंगावू शकतं.

खरं तर सर्वांनाच चिंतेत घालणारी ही आकडेवारी आणि हे निष्कर्ष...मात्र त्यातही आशेचा किरण म्हणजे, हेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स रोजगाराच्या मोठ्या संधीही उपलब्ध करू शकतं.

संगणकाचा शोध म्हणजे अनेकांच्या पोटावर पाय असं भाकीत वर्तवण्यात आलं होतं. मात्र, आज या संगणकानं रोजगाराच्या अब्जावधी संधी उपलब्ध करून दिल्यात.

2022 उजडण्यासाठी अजून 4 वर्षांचा कालावधी बाकी आहे. या 4 वर्षांत काळाची पावलं ओळखून तरूणांनी, सरकारनं आणि औद्योगिक क्षेत्रानं योग्य ती पावलं उचलणं गरजेचं आहे. कारण, धोक्याची घंटा वाजल्यानंतर रडत बसण्यापेक्षा तीला सामोरं जाण्यासाठी तयारी करणं केव्हाही चांगलं.

First published: March 30, 2018, 9:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading