पुरस्कार वापसी ते 'नॉट इन माय नेम'

दिल्ली नजीकच्या वल्लभगढमध्ये जुनैद या 16 वर्षीय मुस्लिम युवकाची जमावाने हत्या केल्यानंतर दिल्लीस्थित सिनेनिर्माता सबा दिवान यांनी सोशल मीडियावर सुरू केलेली 'नॉट इन माय नेम' ही चळवळ आता चांगलीच जोर धरू लागलीय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 30, 2017 05:50 PM IST

पुरस्कार वापसी ते 'नॉट इन माय नेम'

चंद्रकांत फुंदे, मुंबई

दिल्ली नजीकच्या वल्लभगढमध्ये जुनैद या 16 वर्षीय मुस्लिम युवकाची जमावाने हत्या केल्यानंतर दिल्लीस्थित सिनेनिर्माता सबा दिवान यांनी सोशल मीडियावर सुरू केलेली 'नॉट इन माय नेम' ही चळवळ आता चांगलीच जोर धरू लागलीय. आजही सोशल मीडियावर 'नॉट इन माय नेम' हा हॅश टॅग ट्रेंडिंगमध्ये आहे. लोक फक्त सोशल मीडियावरच राग व्यक्त करून थांबली नाहीत तर बुधवारी देशभरातल्या 12 शहरांमधून या जमावाच्या धार्मिक हिंसाचाराविरोधात जाहीर निदर्शनं करण्यात आली. बलात्काराच्या गुन्ह्याविरोधात जसा कठोर कायदा केला तसाच या मॉब सायकॉलॉजीच्या सामूहिक हिंसाचाराविरूद्धही कठोर कायदा केला जावा, अशी मागणी आता देशभरातून जोर धरू लागलीय. दिल्लीमध्ये आयोजित मोर्चात तर पाच हजारांच्या वर लोक सहभागी झाले होते. मुंबईत शबाना आझमींसारखे सिने कलाकार तर बंगळुरूच्या मोर्चात आवर्जून सहभागी झाले होते. एकूणच जमावाच्या धार्मिक हिंसाचारावरून भारत देशात संवदेनशीलता अजून आहे ही दिलासा देणारी बाब म्हणावी लागेल.

वल्लभनगरमध्ये नेमकं काय घडलं होतं ?

16 वर्षीय जुनैद आणि त्याचे भाऊ ट्रेनमधून जात असताना बसण्याच्या सीटवरून वाद झाला. अशातच जमावातून कुणीतरी त्याच्या मुस्लिम असण्याचा उल्लेख केला आणि हा जमाव आणखीनच हिंसक बनला. जुनैद आणि त्याच्या भावांना जमावाने बेदम मारहाण केली. त्यातच जुनैदचा अंत झाला. थोडक्यात धार्मिक द्वेषातूनच जुनैदला स्वतःचा जीव गमवावा लागलाय. जमावाच्या या हिंसक वृत्तीविरोधात सबा दिवान यांनी फेसबूकवर 'नॉट इन माय नेम' ही पोस्ट टाकली. सोशल मीडियावरून अल्पावधीतच ही पोस्ट देशभरात व्हायरल झाली. देशभरातून जुनैदसाठी लोक रस्त्यावर उतरल्याच बघायला मिळालं. खरंतर इथं प्रश्न फक्त जुनैदचा नाही तर गेल्याच आठवड्यात काश्मीरमध्येही एका पोलीस अधिकाऱ्याला हिंसक जमावाने अशाच पद्धतीने ठेचून मारल्याचा दुर्दैवी प्रकार घडलाय. एकूणच काय हिंसक जमावाला कुठलाही जात वा धर्म नसतो. कोणताही विचारशील माणूस या हिंसक जमावाचा चेहरा होऊ शकत नाही. अशा धार्मिक आणि जातीय द्वेषातून घडलेल्या हिंसेशी आमचा कोणताही संबंध नाही, हे सांगण्यासाठीच सबा दिवान यांनी फेसबुकवरून 'नॉट इन माय नेम' ही पोस्ट टाकली होती. त्यालाच आता एका देशव्यापी चळवळीचं स्वरूप प्राप्त होताना दिसतंय.

हे आताच का घडतंय ?

Loading...

केंद्रात मोदींचं सरकार आल्यापासून कट्टरतावादी हिंदुत्ववाद्यांचा जोर वाढलाय. विशेषतः गो रक्षणाच्या नावाखाली जाणिवपूर्वक मुस्लिम समुदायाला टार्गेट केलं जातंय. उत्तरप्रदेशातल्या दादरीत गोमांस बाळगल्याच्या आरोपावरून अखलाकची झालेली हत्या हे त्यातच द्योतक होतं. विशेषत: भाजपशासित राज्यांमध्ये अशा धार्मिक हिंसाचाराच्या घटना जरा जास्तच वाढत असल्याचं दिसून येतंय. अगदी आकडेवारीत बोलायचं झालं तर 2014सालापासून देशात कथित गोरक्षकांकडून मुस्लिमांवर अत्याचाराच्या 63 घटना घडल्यात.

त्यापैकी 32 हल्ले हे भाजपशासित राज्यांमध्ये झालेत. यामध्ये 28 लोक मारले गेलेत. त्यापैकी 24जण मुस्लिम होते. याशिवाय 124 लोक अशा हल्लांमध्ये जखमी झालेत. सर्वाधिक खेदाची बाब म्हणजे यातले जवळपास 52 टक्के हल्ले हे केवळ गैरसमजातून झाल्याचं तपासाअंती समोर आलंय. राष्ट्रीय स्तरावरील सामूहिक हल्ल्यांची आकडेवारी किती याचा स्पष्ट उल्लेख आढळून आला नसला तरी क्राईम डेटाचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर हे भयावह वास्तव समोर आलंय.

पंतप्रधान मोदींनीही मौन सोडलं  

गो रक्षणाच्या नावाखाली वाढत्या हिंसाचारावर प्रारंभी सोईस्कर मौन बाळगणाऱ्या पंतप्रधानांनाही आता त्याची दखल घ्यावी लागलीय. 'गाईसाठी आपण एकमेकांचा जीव घेणार का?' अशा कठोर शब्दात त्यांनी या तथाकथित गो रक्षकांना फटकारलंय. अर्थात धर्माच्या नावाने उच्छाद मांडणारे पंतप्रधानाचा हा  इशारा कितपत गांभिर्याने घेतात हे पाहावं लागेल. पण 'नॉट इन माय नेम'च्या निमित्ताने देशातला संवेदनशील माणूस पुन्हा जागा होतोय, हेही नसे थोडके. कारण पुरस्कार वापसीच्या चळवळीनंतर देशात प्रथमच जमावाच्या हिंसक वृत्तीविरोधात आवाज उठवला जातोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 30, 2017 05:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...