प्रेम नाही उरलं, म्हणून दारातच पुरलं ?

प्रेम नाही उरलं, म्हणून दारातच पुरलं ?

बायकोवर प्रेम नाही उरले म्हणून तिचे प्रेत थेट प्रेयसीच्याच दारात पुरल्याचा धक्कादायक प्रकार सोलापुरात घडला आहे.

  • Share this:

सागर सुरवसे, प्रतिनिधी

सोलापूर, 16 ऑगस्ट : बायकोवर प्रेम नाही उरले म्हणून तिचे प्रेत थेट प्रेयसीच्याच दारात पुरल्याचा धक्कादायक प्रकार सोलापुरात घडला आहे. एका कथित प्रेमवीर पतीने आपल्या विवाहापश्चात एका अविवाहीत महिलेशी अनैतिक संबंध ठेवले होते. पण या अनैतिक संबंधांमध्ये पत्नीचा अडसर निर्माण झाल्याने त्याने आपल्या प्रेयसीच्या मदतीनेच पत्नीचा काटा काढला. युद्धात आणि प्रेमात सर्वकाही माफ असते असे आपण नेहमीच ऐकतो. पण मुळातच अनैतिक असलेल्या प्रेमामध्ये पोलिसांनी मात्र त्याच्या प्रेमाला माफी दिली नाही. कारण त्याने एका निरपराध महिलेचा खून केला आणि आपल्या प्रेयसीच्या घरातच तिचा मृतदेह पुरुन टाकला. मात्र त्याचा हा प्रयत्न फसला तो त्याच्या चुकीमुळेच....

घरात पत्नी असतानाही मागील दोन वर्षापासून नरहरी श्रीमल याचे प्रेयसी विनोदासोबत चांगलेच सूत जुळले होते. मात्र त्यांच्या या अनैतिक प्रेमसंबंधांना पत्नी प्रवलिकाचा तीव्र विरोध होता. त्यामुळेच वारंवार प्रेमाच्या आड येणाऱ्या पत्नीचा तिचा पती नरहरीनेच खून केला. आपली प्रेयसी विनोदा संदुपटला हिच्या मदतीने हा खून केला. धक्कादायक बाब म्हणजे पती नरहरी श्रीमल आणि त्याची प्रेमिका विनोदा संदुपटला या दोघांनी संगनमताने प्रवलिकाला प्रेयसीची मैत्रिणी अंबाबाई कणकी हिच्या घरात बोलावून तिचा गळा दाबून मारून टाकले आणि ही बाब कोणाला कळू नये म्हणून तिचा मृतदेह प्रेयसी विनोदाच्या घरातच पुरून टाकला. हा प्रकार इथेच थांबत नाही तर आरोपी पती नरहरीने आपल्या सासरी जाऊन आपली बायको बेपत्ता असल्याचे सांगितले.

आपली पत्नी हरवल्याची मिसिंगची तक्रार त्याने एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली. पण या सगळ्या बनावाची खबर पोलिसांना कुठूनतरी लागली. याच माहितीवरुन सहाय्यक पोलिस निरीक्षक इंद्रजित सोनकांबळे यांनी संबंधित घटनेचा तपास सुरु केला. त्यात प्रवलिका श्रीमल हिचा मृतदेह नरहरीची प्रेयसी विनोदाच्या घराच्या कंपाऊंडमध्ये पुरुन ठेवल्याचे आढळून आले. त्यानंतर आरोपी पती नरहरी श्रीमल याला वळसंग पोलिसांनी अटक केली. तसेच त्यांच्यासोबत सह आरोपी असलेली प्रेयसी विनोदा संदुपटला, तिची मैत्रीण अंबाबाई कणकी यांनाही वळसंग पोलिसांनी अटक केली.

असा आहे घटनाक्रम :

शनिवार १२ ऑगस्ट रोजी रात्री १२ च्या सुमारास प्रवलिका श्रीमल हीला तिचा पती नरहरी आणि प्रेयसी विनोदा यांनी अंबाबाई कणकी हिच्या सुंचू विडी घरकूल येथील २५६ क्रमांकाच्या घरी नेले. यावेळी तीला झोपेच्या गोळ्या देण्यात आल्याचा संशय आहे. तिथे मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास पती नरहरीने प्रवलिकाचा गळा दाबला आणि उर्वरीत तीघींनी त्याला मदत केली. त्यानंतर प्रवलिकाचा मुतदेह पाण्याच्या ड्रममध्ये घातला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो मृतदेह नरहरीची प्रेयसी विनोदाच्या घरी नेण्यात आला. तिथे दोन कामगारांच्या मदतीने खड्डा खणून घेण्यात आला. त्याचवेळी त्यांनी एका दुकानदाराकडून दोन पोती खडेमीठ खरेदी केले. लोकांनी याबाबत हटकल्यानंतर घरी कार्यक्रम असल्याचे कारण सांगितले. नेमकी इथेच माशी शिंकली. यामुळे लोकांना संशय बळावला. त्यातूनच या बनावाची घरकुल परिसरात दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली. अशातच मीठ नक्की कशासाठी मागवले हे अनेकांना कळले नाही. यावरुनच पोलिस मित्राच्या मनात पाल चुकचुकली आणि ही बाब पोलिसांच्या लक्षात आणून दिली आणि त्यानुसार तपास सुरू झाला. आणि हे सारं बिंग फुटलं

अंधश्रद्धा आणि अघोरी बळीचा प्रकार?

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार नरहरीची प्रेयसी विनोदा संदुपटला ही विधवा आहे. तीच्या अंगात येत होते. ती या परिसरातील लोकांचे भूत बाधा, करनी, जारन-मारम काढण्याचे काम करत होती. त्याशिवाय तिची मैत्रीण अंबाबाई कणकी ही देखील करनी करण्याचे काम करीत होती. तिच्याच घरात प्रवलिकाचा बळी देण्यात आला. नरहरी हा देखील त्यांच्या जाळ्यात आला होता. तो रात्री अपरात्री उठून विनोदाकडे जात असे. प्रवलिकाला वारंवार झोपेच्या गोळ्या देत असल्याची माहिती कुटुंबातील व्यक्तीनी दिली. शिवाय ज्या रात्री कणकी हीच्या घरी हा खून झाला तिच्या घरात प्रवलिकाला कुंकू लावण्यात आले होते. तिला समोर बसवून कोणतीतरी पूजा करण्यात येत होते. त्यादरम्यान प्रवलिका ही ओरडत होती. मात्र काही काळाने तिचा आवाज बंद झाला. त्यानंतर रविवारी दुपारी अंबाबाई कणकी हीने आपले पूर्ण घर धुवून घेतले.

ही सर्व पार्श्वभूमी पाहता यामध्ये अघोरी विद्येतून प्रवलिकाचा खून झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र पोलिस तपास यादृष्टीने अजून झालेला नाही. त्यामुळे त्याबाबत तपास झाल्यास अनेक गोष्टी समोर येवू शकतात.

कुटुंबाची वाताहत :

नरहरी आणि प्रवलिका यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. आई गेली आणि बापही जेलमध्ये गेला त्यामुळे या लहानग्यांची मात्र वाताहत झाली आहे. बापाच्या अनैतिक प्रेमाची नशा वा अंधश्रध्देचा झिंग यामुळे रस्त्यावर आले ते त्याचे तीन चिमुरडे....

First published: August 16, 2017, 10:12 PM IST

ताज्या बातम्या