08 जून : राज्यात शेतकऱ्यांचा संप सुरू आहे. पण या संपकाळातच ठिकठिकाणी तब्बल सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात.
"मी शेतकरी आहे, माझं नाव धनाजी चंद्रकांत जाधव... मी आत्महत्या करत आहे. योगीराज, युवराज यांच्यावर लक्ष देणे. माझं प्रेत माझ्या गावात घेऊन जाणे आणि जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत नाहीत तोपर्यंत मला जाळायचं नाही. दिगू तात्या, मला जाळू नका, जोपर्यंत माझं किंवा माझ्या मित्राचं कर्ज माफ होत नाही.
तुमचा मित्र
धनाजी जाधव"
मुख्यमंत्री आल्याशिवाय आणि कर्जमाफी झाल्याशिवाय मला जाळू नका, असं लिहित करमाळा तालुक्यातल्या धनाजी जाधव नावाच्या कर्जबारी शेतकऱ्यानं मृत्युला कवटाळलं. अडीच एकर कोरडवाहू शेती असणाऱ्या धनाजीवर लाखो रुपयांचं कर्ज होतं. मुख्यमंत्र्यांना जाणं शक्य नव्हतं. पण त्यांनी फोनवरून धनाजीच्या भावाचं सांत्वन केलं आणि आर्थिक मदतीची हमीही दिली.
केवळ धनाजीच नाही तर संपाच्या काळात आणखी पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात.
- ईश्वर इंगळे
ब्राह्मणवाडा, तालुका - कारंजा, जिल्हा - वर्धा
शेती कसायला पैसे नव्हते, जमीन पड राहण्याच्या भीतीने आत्महत्या
- ईश्वर मदनकर
खोलमारा, तालुका - लाखांदूर, जिल्हा - भंडारा
कर्जाला कंटाळून आत्महत्या
65 हजारांचं ग्रामीण बँकेचं कर्ज आणि इतर खाजगी कर्ज
- गोरख कोकणे
वाकी खुर्द, तालुका - चांदवड, जिल्हा - नाशिक
कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या
जिल्हा बँकेचं दीड लाखाचं कर्ज तर खाजगी कर्जही दीड लाखाचं
- सुभाष शिंगाडे
चिलारेवाडी, तालुका - माण, जिल्हा - सातारा
कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या
3 लाखांचं कर्ज थकलं होतं
- अशोक चकणे
वडगाव पिंगळा, तालुका - सिन्नर, जिल्हा - नाशिक
कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या
वडिलांच्या नावावर सोसायटीचं कर्ज थकल्यानं आत्महत्या
गेल्यावर्षी पिकपाणी चांगलं झालंय. पण बळीराज्याच्या डोक्यावरच्या कर्जाचा भार हलका झालेला नाहीय. निराशाच्या गर्तेत सापडलेला शेतकरी मृत्यूला कवटाळतोय. हे चित्र पुढारलेल्या महाराष्ट्रासाठी चांगलं नाही, याचा सरकारनं जरूर विचार करायला हवा.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा