राणेंच्या पॅनलने घेतली चक्क सेनेची मदत अन् भाजपचा केला पराभव

राणेंच्या पॅनलने घेतली चक्क सेनेची मदत अन् भाजपचा केला पराभव

सिंधुदुर्गातल्या बांदा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राणेंचं समर्थ विकास पॅनल आणि शिवसेना एकत्र आले आणि त्यांनी गेल्या वीस वर्षापासून भाजपचं एकहाती वर्चस्व असलेली बांदा ग्रामपंचायत भाजपकडून हिरावून घेतली.

  • Share this:

 दिनेश केळुसकर,सिंधिदुर्ग

17 आॅक्टोबर : खरं तर नारायण राणे आणि शिवसेना यांच्यात विळी भोपळ्याचं सख्य ! पण सिंधुदुर्गातल्या बांदा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राणेंच समर्थ विकास पॅनल आणि शिवसेना एकत्र आले आणि त्यांनी गेल्या वीस वर्षापासून भाजपचं एकहाती वर्चस्व असलेली बांदा ग्रामपंचायत भाजपकडून हिरावून घेतली. सरपंच पद राखण्यात मात्र भाजपला यश आलंय.

सिंधुदुर्गातल्या बांदा गावात सुरू असलेला हा एकत्र जल्लोष आहे राणेंच्या समर्थ विकास पॅनलचा, शिवसेनेचा आणि मुळ काँग्रेसचा ! हो .. ! हे तिघेही एकत्र आले आणि गेली वीस वर्ष भाजपच्या ताब्यात असलेली सावंतवाडी तालुक्यातली एकमेव बांदा ग्रामपंचायत त्यानी भाजपकडून हिरावून घेतली. भाजपने सरपंचपद मात्र राखलंय पण ते ही अडीच वर्षांनी हिरावून घेऊ असं आत्ताच राणे समर्थक सांगतायत.

भाजपच्या सरपंचाने अजून कार्यभारही स्वीकारला नाही तोवर त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याची रणनीती सुरू झालीये. पण अडीच वर्षांत परिस्थिती खूप बदललेली असेल असा भाजपचा दावा आहे.

नारायण राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष एनडीएत सामिल  शिवसेना एनडीएचा घटक आणि भाजप तर एनडीएचा मूळ घटक म्हणजे ही ग्रामपंचायत एनडीएची झालीय असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही.

ग्रामपंचायत निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढवल्या जात नाहीत. हे खरं आहे. पण या निवडणुकात पक्षीय राजकारणच असतं हेही नाकारून चालणार नाही. बांद्यावरच्या अबाधित सत्तेवरुन भाजपाला खाली खेचण्यात हेच गावपातळीवरचं राजकारण यशस्वी झालंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 17, 2017 09:47 PM IST

ताज्या बातम्या