ते स्वच्छ करतायत समुद्राला!

ते स्वच्छ करतायत समुद्राला!

मच्छिमारांची तुटलेली जाळी ,प्लॅस्टिक आणि इतर कचरा , गोळा करण्याचं काम हे स्कूबा डायव्हर्स करतायत

  • Share this:

दिनेश केळुसकर, 28 मे : मच्छिमारांसाठी समुद्र आई , बाप , आणि सर्वकाही !  म्हणूनच समुद्रावर रोजीरोटी असणाऱ्या आणि मासेमारीतून स्कूबा डायव्हिंगच्या व्यवसायात उतरलेल्या मालवणच्या एका स्कुबा डायव्हिंग ग्रुपने समुद्राला जगवायचं ठरवलंय.

सिंधुदुर्ग किल्ल्याभोवतीच्या समुद्राच्या पोटातला हा कचरा पाहा ! मच्छिमारांची तुटलेली जाळी ,प्लॅस्टिक आणि इतर कचरा , गोळा करण्याचं काम हे स्कूबा डायव्हर्स करतायत  आणि याच जाळ्यात अडकलेलं हे भल मोठं कासव. याची सुटका सुध्दा या डायव्हर्सनी केलीय बघा. इतकंच नाही तर पर्यटकांनी समुद्रात फेकून दिलेल्या दारुच्या बाटल्याही त्यांनी समुद्राच्या पोटातून वर काढल्यायत.. !  हे सगळं कशासाठी ? तर समुद्राला जगवण्यासाठी !

स्कूबा डायव्हर भूषण जुवाटकर सांगतात, 'पर्यटक येतात ते  आपल्यासोबत पाण्याच्या बाटल्या , रॅपर्स , प्लॅस्टिक सगळं पाण्यात टाकतात आणि ते साठून राहतं.मोठ्या बोटी ज्यांची जाळी तुटतात ती खडकाला अडकून राहतात. प्लॅस्टिक ,जाळ्या कचरा असा एक घनकचरा कोरल्सला चिकटून राहतो. कोरलला सूर्पप्रकाश मिळत नाही मग जाळी त्यात प्लॅस्टिक काठ्यात खेकडे, कासव अडकतात. असा एक मृत्यूचा सापळाच तयार होतो. त्याला घोस्ट नेट म्हणतात. आम्ही आमच्या प्रोजेक्टमधून असे घोस्ट नेट काढलेले आहेत आणि हे घोस्ट नेट काढणं ही काळाची गरज आहे.'

मालवणच्या इंडियन स्कूबा डायव्हर्स हे तरुण अलीकडेच मासेमारीकडून  स्कूबा डायव्हिंग व्यवसायाकडे वळलेयत. केवळ इथला  समुद्रच नाही तर पर्यटनाचा केंद्रबिंदू असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याचा परिसरही स्वच्छ ठेवण्याचा विडा या तरुणांनी उचललाय .

स्कूबा डायव्हर जगदीश तोडणकर म्हणतात, 'भविष्यात आम्ही जे आता पर्यटकांना कोरल्स मासे दाखवतो ते भविष्यात प्लॅस्टिकच दाखवावं लागेल .म्हणून आम्ही सात आठ युवक एकत्र आलो, हे वाढत गेलं तर समुद्रात प्लॅस्टिकचा खजिनाच होईल.'

सिंधुदुर्गात येणाऱ्या पर्यटकांची संख्या दरवर्षी वाढतेच आहे. यंदा तर सिंधुदुर्ग किल्ल्याला साडेचारलाख पर्यटकानी भेट दिलीय . त्यामुळे पर्यटकांसोबत येणारा कचराही जास्त वाढलाय .

स्कूबा डायव्हींग आणि स्नॉर्कलिंगचा व्यवसायातून मालवणच्या मच्छीमारानी विकासाची नवी वाट शोधलीय . मालवणमध्ये स्कूबाच्या व्यवसायात जवळपास 55 ग्रुप आहेत . मात्र या एकाच ग्रुपने सध्या तरी आपलं घर म्हणजे समुद्र स्वच्छ ठेवण्याचं काम सुरू केलंय .

समुद्र जर आम्हाला जगवत असेल तर आम्हीही समुद्राला जगवलं पाहिजे, याचं भान या तरुणांना आलं आणि त्यांनी हे अभियान सुरू केलंय . या अभियानाला पर्यटकांनी आणि नागरिकांनीही सहकार्य तर करायला हवंच पण सरकारी यंत्रणानीही या अभियानाला सर्वपरी मदत करायला हवी कारण पर्यावरण शाबूत राहिलं तर माणूस राहील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 28, 2017 09:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading