S M L

राजकीय फ्रेंडशिप डे

पण राजकारण आणि सत्तेच्या पलीकडेही राजकीय नेते दुर्मिळच पाहायला मिळतात. (सत्तेसाठीचे मित्र वगळून) आज जगभरात फ्रेंडशिप दिवस साजरा होतोय अशाच राजकीय नेत्यांच्या मैत्रीची ही खास सफर...

Chittatosh Khandekar | Updated On: Aug 7, 2017 02:45 PM IST

राजकीय फ्रेंडशिप डे

सचिन साळवे, मुंबई

राजकारण म्हटलं की, इथं सगळं काही आलं. टीका असो, आरोप असो किंवा हल्ले असो, इथं सारं काही नेहमीचं असतं. एकमेकांना पाण्यात पाहणारे, एकमेकांवर कधीही टीकेची संधी न सोडणारे राजकीय नेते हे नेहमीचेच. पण राजकारण आणि सत्तेच्या पलीकडेही राजकीय नेते दुर्मिळच पाहायला मिळतात. (सत्तेसाठीचे मित्र वगळून) आज जगभरात फ्रेंडशिप दिवस साजरा होतोय. अशाच राजकीय नेत्यांच्या मैत्रीची ही खास सफर...

बाळासाहेब ठाकरे - प्रमोद महाजन

भारतीय राजकारणातलं जाज्वल्य व्यक्तिमत्व म्हणजे 'बाळासाहेब ठाकरे'. ते नेहमी म्हणायचे राजकारण राजकारणाच्या जागी आणि मैत्री मैत्रीच्या जागी. त्यामुळेच विरोधी पक्षातही बाळासाहेबांचे खास मित्र होते, त्यापैकी एक म्हणजे भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते प्रमोद महाजन. बाळासाहेब आणि प्रमोद महाजन यांनी एकत्र येऊन युतीची मोट बांधली. या युतीच्या काळात भाजप आणि सेनेला सत्तेची चव चाखता आली.

Loading...

बाळासाहेब ठाकरे - गोपीनाथ मुंडे

 

प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर 'मातोश्री'चा शब्द राखला तो गोपीनाथ मुंडे यांनी. प्रमोद महाजनांच्या निधनानंतर सेनेशी संवाद कोण साधणार असा प्रश्न निर्माण झाला होता. पण गोपीनाथ मुंडेंनी बाळासाहेबांशी चांगलं सूत जुळवलं. त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांना युतीतलं 'एटीएम' म्हटलं जायचं.

बाळासाहेब ठाकरे -  शरद पवार

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार. दोन पक्षप्रमुखांची मैत्री राज्याच्या राजकारणातलं वेगळेपण. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर कडाडून टीकाही केलीय. पण राजकारणापलीकडे जाऊन बाळासाहेब आणि शरद पवारांची मैत्री अजोड होती. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये प्रणव मुखर्जींसह शरद पवार जेव्हा मातोश्रीवर पोहोचले तेव्हा सगळ्यांच्या भुवया उंचावल्या.

बाळासाहेबांनी शरद पवारांचा गालगुच्चा घेतलेला फोटो तर चांगलाच गाजला होता. शरद पवारांच्या राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात बाळासाहेबांनी मित्रासारखी पाठराखण केली होती.

 

गोपीनाथ मुंडे -  विलासराव देशमुख

मराठवाड्याच्या राजकारणातले हे दोन दिग्गज नेते. एक सत्ताधारी काँग्रेसचे मुख्यमंत्री तर दुसरे विरोधी पक्षनेते भाजप पक्षाचे. पण दोन्ही नेत्यांची मैत्री घट्ट होती. महाराष्ट्राच्या राजकारणातली ही खास जोडी होती. कधी विलासराव गोपीनाथ मुंडेंच्या घरी जाऊन सहजेवणाचा आनंद घ्यायचे तर कधी मुंडेही लातुरात आल्यावर 'गडी'वर जाऊन भेट घ्यायचे. सत्तेतले कट्टर विरोधी असले तरीही या दिग्गज नेत्यांची जोडी जय-वीरूसारखीच होती अशी पुष्टी खुद्द विलासराव द्यायचे.

विलासराव देशमुख - सुशीलकुमार शिंदे

काँग्रेस पक्षातला हा राजहंसांचा जोडा. विलासराव या व्यक्तिमत्त्वाबद्दल कोणत्याही राजकीय पक्षाच्या माणसाला कधीही राग आला नाही. महाराष्ट्राने ज्या दोन नेत्यांवर सर्व बाजूंनी मनस्वी प्रेम केले, त्यात विलासराव एक आणि सुशीलकुमार शिंदे हे दोन. या दोघांचे सूर जुळायचे आणि दोघं एकमेकांना सांभाळूनही घ्यायचे.

शरद पवार - नरेंद्र मोदी

'शरद पवारांचा सल्ला घेतो' अशी स्पष्ट कबुली देऊन मोदी यांनी पवारांसोबत मैत्रीची दोर घट्ट विणली. खरं तर शरद पवारांनी विरोधक म्हणून मोदींवर सडकून टीका केली आणि मोदींनीही बारामती पवारमुक्त करण्याची टीका केली होती. पण राजकारण काही असलं तरी पवार - मोदींची मैत्री काही वेगळीच आहे. स्वत: मोदी यांनी बारामती गाठून पवारांच्या घरी सहभोजनाचा आनंद घेतला. दिल्लीतही राजकीय आणीबाणीच्या वेळी मोदी पवारांना आवर्जून बोलावतात.

नरेंद्र मोदी - नितीश कुमार

अलीकडेच ही जोडी पुन्हा एकत्र आली. सत्तेच्या समीकरणासाठी जरी एकत्र आले असले तरी एकेकाळी दोन्ही नेते चांगले मित्र होते. या जोडीने एकत्र येऊन बिहारच्या राजकारणात सत्तेचं फळ चाखलंय.

नारायण राणे - छगन भुजबळ

हे दोन्ही एकेकाळचे सेनेचे तडफदार नेते. सेनेत असताना दोन्ही नेत्यांनी बाळासाहेबांची ढाल बनून राज्यातलं राजकारण दणाणून सोडलं. कालांतराने सेनेतून बाहेर पडल्यानंतर राणे काँग्रेसमध्ये दाखल झाले आणि भुजबळ राष्ट्रवादीत. पण तरीही दोन्ही नेते चांगले मित्र म्हणून वावरले.

सध्याच्या राजकारणात पाहिलं तर मैत्रीचं नातं जपणारी काही मोजकीच नेते मंडळी पाहण्यास मिळतात. पण ज्या प्रकारे बॉलिवूडचा ९० चा काळ होता तसाच या नेत्यांचा हा त्यांच्या काळातला मैत्री पर्वाचा बहारदार  काळ होता....

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 6, 2017 09:51 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close