पंढरपुरातील दर्शनरांग इतिहास जमा होणार ? तिरुपतीच्या धर्तीवर टोकनद्वारे मिळणार दर्शन

पंढरपुरातील दर्शनरांग इतिहास जमा होणार ? तिरुपतीच्या धर्तीवर टोकनद्वारे मिळणार दर्शन

सावळ्या विठठ्लाचे दर्शन तत्पर आणि सुलभ होण्याच्या दृष्टीने तिरुपती बालाजी देवस्थानच्या धर्तीवर टोकन दर्शन व्यवस्था सुरु करणार असल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

  • Share this:

सुनील उंबरे, प्रतिनिधी

पंढरपूर, ७ सप्टेंबर : सावळ्या विठठ्लाचे दर्शन तत्पर आणि सुलभ होण्याच्या दृष्टीने तिरुपती बालाजी देवस्थानच्या धर्तीवर टोकन दर्शन व्यवस्था सुरु करणार असल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. देवस्थानचे पावित्र्य, पारदर्शक कारभार आणि भाविकांसह पंढरपूरकरांच्या सेवासुविधांना आपण प्राधान्य देवून श्री विठ्ठल रुखुमाईचे हे पंढरपूर देवस्थान देशात अग्रगण्य करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

डॉ भोसले यांच्या अध्यक्षतेखाली संत तुकाराम भवन येथे आज समितीची तिसरी बैठक पार पडली या बैठकीच्या अजेंड्यावर ३४ विषय घेण्यात आले होते. त्यात प्राधान्याने दर्शन व्यवस्था, स्वच्छता, अन्नछत्र, लाडू प्रसाद, आरोग्य सुविधा, भक्तनिवास, संत विद्यापीठ, स्कायवॉक आदी विषयावर सकारात्मक चर्चा झाली.

श्री विठ्ठलाच्या अद्यावत दर्शन व्यवस्थेविषयी अधिक माहिती देताना डॉ. भोसले म्हणाले, तिरुपती बालाजी आणि वैष्णवदेवी देवस्थानने भाविकांना सुलभ आणि तत्पर दर्शनाची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. या धर्तीवर श्री विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाची व्यवस्था सुरु केल्यास वारकरी भाविकांना दिलासा मिळेल. या उद्दात्त हेतूने या दोन्ही देवस्थानसह शिर्डी, तुळजापूर येथील दर्शन व्यवस्थेचा आढावा घेतला आणि येत्या कार्तिकी वारीपूर्वी हि व्यवस्था सुरु होईल, असा विश्वास डॉ भोसले यांनी व्यक्त केला.

यापूर्वी पंढरीच्या विठठल रखुमाईचे दर्शन म्हणजे भक्तांसाठी एक दिव्य परीक्षा होती. ऊन, वारा आणि पाऊस आदी नैसर्गिक संकटांचा सामना करीत वयोवृद्ध भाविकांना पंचवीस ते तीस तास तिष्ठावे लागत असे. आता भक्तांची ही सत्वपरीक्षा या अद्यावत सुविधेमुळे कालबाह्य होईल, असा दावा मंदिर समितीने केलाय.

दर्शन व्यवस्थेबरोबर आजच्या बैठकीत आणखी एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला तो म्हणजे स्वच्छतेच्या बाबतीत, पंढरपूरचे पावित्र्य जपायचे असेल तर प्राधान्याने श्री विठ्ठल मंदिर, मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग आणि चंद्रभागा नदीचा परिसर स्वच्छ आणि सुंदर असायला अशी भूमिका डॉ. भोसले यांनी मांडली यावर सदस्यांमध्ये एकमत होऊन या सर्व परिसराच्या स्वच्छतेसाठी मंदिर समितीच्यावतीने खाजगी संस्थेला स्वच्छतेची जबाबदारी सोपविण्याचा महत्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला. लवकरच या स्वच्छतेच्या कामासाठी टेंडर काढणार असल्याचे डॉ भोसले यांनी स्पष्ट केले. या बैठकीस मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी संजय तेली, मंदिर समितीचे सदस्य हभप गहिनीनाथ महाराज औसेकर, डॉ दिनेश कदम, संभाजी शिंदे, सचिन अधटराव, शकुंतला नडगिरे, साधना भोसले आदी उपस्थित होते.

बैठकीतील इतर महत्वाचे निर्णय...

लाडू प्रसाद - भाविकांसाठी उपलब्ध करून दिला जाणारा लाडू प्रसाद मंदिर समितीच्या कर्मचाऱ्याकडून तयार केला जातो. यापुढे हा प्रसाद तज्ञ असलेल्या खाजगी संस्थेकडून करण्याचा निर्णय...लवकरच टेंडर काढणार

आरोग्य सुविधा - शासनाच्या मालकीचे १०० खाटांचे पंढरपूरमध्ये रुग्णालय आहे. हे रुग्णालय मंदिर समितीच्या माध्यमातून चालविण्याचा मानस आहे. तसा प्रस्ताव शासनाला देणार असून या आरोग्य सुविधेच्या माध्यमातून स्थानिक पंढरपूरकर आणि वारकरी भाविकांना अल्पदरात लाभ मिळेल.

संत विद्यापीठ - महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाची ६ एकर जागा रिक्त आहे या जागेवर संत विद्यापीठ, अन्नछत्र आणि भक्तनिवास उभा करण्याचा संकल्प आहे. या बाबत शासनाशी बोलणी झालेली आहे. हि जागा भाडेतत्वावर घेऊन विकसित केली जाईल.

याशिवाय भक्तांनी देवीला दिलेली साडीचोळी विक्री न करता ती भाविकांना मोफत वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.

आमदार राम कदम यांची दांडी...

मंदिर समितीच्या सदस्यपदी भाजपचे मुंबईस्थित आमदार राम कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्ती केल्यापासून कदम यांनी तिन्ही बैठकांना दांडी मारली आहे.

पंढरपूर मंदिर समितीचे दर्शन पासेस अशा प्रकारे असतील...

First published: September 7, 2017, 8:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading