नांदेड किनवटच्या पाड्यांपर्यंत रस्ताच नाही, आदिवासींसाठी अग्निदिव्य

नांदेड किनवटच्या पाड्यांपर्यंत रस्ताच नाही, आदिवासींसाठी अग्निदिव्य

नांदेडच्या किनवटमध्ये एका आदिवासी पाड्यावरच्या 9 महिन्याच्या गरोदर महिलेला कच्च्या रस्त्यावरून बैलगाडीतून प्रवास करत रुग्णालय गाठावं लागलं.

  • Share this:

मुजीम शेख, 30 जुलै : आजही आदिवासी पाड्यांमधल्यांना पायाभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागतोय. नांदेडच्या किनवटमध्ये एका आदिवासी पाड्यावरच्या 9 महिन्याच्या गरोदर महिलेला कच्च्या रस्त्यावरून बैलगाडीतून प्रवास करत रुग्णालय गाठावं लागलं.

प्रसव वेदना सहन करणारी ही घोगरवाडीतल्या शिवशक्तीनगर पाड्यावरची आदिवासी महिला. इंदु धुर्वे हिला 2 किलोमीटरचा कच्चा रस्ता बैलगाडीतून पार करून  रुग्णालय गाठावं लागलं. किनवट तालुक्यात असे अनेक पाडे, तांडे आहेत जिथल्या गरोदर महिलांना अशाच दिव्यातून रुग्णालय गाठावं लागतं.

इंदुला आधी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं होतं पण तिथे पाण्याची आणि डॉक्टरची सोय नसल्याने तिला खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं. ती आणि तिची मुलगी सुखरूप आहेत. पण काही महिलांची प्रसूती रस्त्यातच झाल्याच्या किंवा रुग्ण रुग्णालयापर्यंत पोचण्याआधीच दगावल्याच्या घटना घडल्या आहेत.

किनवटच्या अनेक पाड्यांपर्यंत पक्के रस्तेच पोचलेले नाहीत. या रस्त्यासाठी तत्कालीन आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी 3 वर्षांत 2 वेळा प्रस्ताव वनविभागाकडे पाठवला. पण मार्गातली 75 हून अधिक झाडं तोडावी लागणार असल्याने वन विभागाने दोन्ही वेळा हा प्रस्ताव फेटाळून लावला. वास्तवाची कल्पना असूनही कायद्याची अडचण असल्याने अधिकारी रस्ता होण्याबाबत शाश्वती देत नाहीत.

तहसीलदार, आदिवासी विभाग आणि वन विभाग कुणीच जर अशा राज्यभरातल्या आदिवासी पाड्यांच्या मूलभूत सुविधांकडे लक्ष दिलं नाही तर आदिवासींचे प्रश्न सुटणार नाहीत. आणि आदिवासींचा खडतर प्रवास सुरुच राहील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 30, 2017 05:58 PM IST

ताज्या बातम्या