सिध्देश म्हात्रे, पनवेल
10 जून : स्वत:चा किराणामालाचा व्यवसाय सोडून पनवेल तालुक्यातल्या तळोजाचे शेतकरी नामदेव पाटील यांनी मत्स्यशेती करण्याचा निर्णय घेतला आणि आज एक यशस्वी व्यावसायिक म्हणून ते समोर आलेत.
तळोजाच्या वळप गावाचे हे आहेत नामदेव पाटील. 15 वर्षांपूर्वी त्यांचं किराणा मालाचं दुकान होतं. पण त्या व्यवसायात त्यांना रस नव्हता. त्यामुळे काहीतरी नवा व्यवसाय करण्याच्या दृष्टीनं त्यांनी मत्स्यशेतीचा कोर्स केला. नंतर गावातलं एक तळं भाड्याने घेऊन मत्सशेतीला सुरुवात केली. सुरवातीला फक्त तीन प्रकारचे मासे घेऊन सुरु झालेली शेती आज 15 प्रकारच्या माशांवर जाऊन पोहोचलीय. या ठिकाणी गोड्या पाण्यातील पापलेट, जिताडा, मोठी कोळंबी, काळा मासा, यासारखे मासे पाटील यांच्या शेतात मिळत असून, ताजी आणि जिवंत मासळी घेण्यासाठी ग्राहक इथं गर्दी करतायत.
नामदेव पाटील यांनी आपल्या मत्स्य शेतीमध्ये अनेक आधुनिक प्रयोग केलेत. नामदेव पाटील हे मत्स्यशेती सोबतच जलकृषी पर्यटन आणि तरुणांना हा व्यवसाय करण्यासाठी मार्गदर्शनही करतात. पाटील यांची ही ताजी मासळी घेण्यासाठी दूर दूर वरुन नागरिक येत असतात. वर्षभरात पाटील कुटुंबियाना मासे विक्रीतून 16 लाखांचं उत्पन्न मिळतंय. यात चार लाखाचा खर्च वगळता त्यांना नफा होतोय.
चव चांगली असावी यासाठी माशांना योग्य खुराक दिला जातो. यात विविध प्रकारची भूट्टी, डाळी, माशांचं खाद्य दिलं जातंय. यामुळे मासे चविष्ट आणि वजनाला जास्त भरतात. त्याच प्रमाणे माश्याना ऑक्सीजन मिळावा यासाठी पाण्याचं रिसायकलिंग करून माशांना ऑक्सीजन पुरवला जातो. यासाठी पाटील यांना फिशरी रिसर्च सेंटर कडून मोलाचे मार्गदर्शन केले जातंय.
काही तरी नवीन करण्याच्या ध्यासातूनच पाटील यांनी मत्सशेती सुरू केली आणि बघता बघता त्यांचा हा प्रमुख व्यवसाय झाला.. त्यामुळे शेतीसोबत मत्सव्यवसाय हा शेतकऱ्यांसाठी उत्तम पर्याय होऊ शकतो. आणि हेच नामदेव पाटील यांनी दाखवून दिलंय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा