जिवाची मुंबई की जीवघेणी मुंबई ?, गेल्या सहा महिन्यात 99 निष्पाप बळी

जिवाची मुंबई की जीवघेणी मुंबई ?, गेल्या सहा महिन्यात 99 निष्पाप बळी

. मुंबईकरांना त्यांच्या आयुष्याच्या एका क्षणाचीही खात्री देता येत नाही अशी भीषण अवस्था आहे. घरातून निघालेला मुंबईकर रात्री घरी परतेल की नाही याचीही खात्री देता येत नाही.

  • Share this:

29 डिसेंबर : मुंबई म्हणजे झगमगाट असा लोकांचा समज आहे. पण गेल्या काही दिवसांतल्या दुर्घटना पाहता मुंबईकरांचा जीव स्वस्त झालाय का असा प्रश्न पडतोय.

मुंबईकराचं आयुष्य मजेदार असल्याचा अख्ख्या जगाचा समज आहे. मुंबईत राहणं म्हणजे जिवाची मुंबई करण्यासारखं...पण हा निव्वळ गैरसमज आहे. मुंबईकरांना त्यांच्या आयुष्याच्या एका क्षणाचीही खात्री देता येत नाही अशी भीषण अवस्था आहे. घरातून निघालेला मुंबईकर रात्री घरी परतेल की नाही याचीही खात्री देता येत नाही. किंवा कामाच्या ठिकाणीही तो सुरक्षित आहे याचीही खात्री देता येत नाही. घरातही त्याला जिवाची खात्री देता येत नाही.

कमला मिलमधील हॉटेल मोजोजमध्येही काही मुंबईकर गुरूवारी रात्री जेवण्यासाठी आले होते. पण इथलं जेवणं त्यांच्या आयुष्यातलं शेवटचं जेवण ठरलं. कमला मिल अग्निकांडात 14 निष्पापांचा बळी गेला.

18 डिसेंबरच्या पहाटेही अंधेरीतल्या साकिनाक्याजवळच्या भानू फरसाण मार्टला लागलेल्या आगीत 12 कामगारांचा बळी गेला. हे कामगार रात्री थकून भागून झोपी गेले होते. कुणाच्या तरी चुकीमुळं या निष्पापांना आपला जीव गमवावा लागला.

29 सप्टेंबरला कामावर निघालेल्या मुंबईकरांसाठीही हा दिवस नेहमीसारखा नव्हता. पाऊस आल्यानं एलफिन्स्टन स्टेशनच्या रेल्वेपुलावर गर्दीचा लोंढा थांबला होता. काहीच क्षणात चेंगराचेंगरी झाली आणि तब्बल 23 मुंबईकरांचा बळी गेला. मुंबईकर जसे घराबाहेर सुरक्षित  नाहीत तसे ते घरातही सुरक्षित नाहीत.

31 ऑगस्टला भेंडी बाजारातली हुसैनी इमारत पहाटेच्या सुमारास कोसळली. या इमारत दुर्घटनेत तब्बल 33 जणांनी जीव गमावला. साखर झोपेत असलेल्या हुसैनी इमारतीतल्या लोकांना बाहेरही पडता आलं नाही.

25 जुलैचा दिवसही घाटकोपरच्या सिद्धीसाई इमारतीच्या रहिवाशांसाठी काळ बनून आला होता. इमारतीच्या तळमजल्यावर सुरु असलेल्या रिनोव्हेशनवेळी केलेल्या चुकीच्या कामामुळे अख्खी इमारत भुईसपाट झाली. यात तब्बल 17 निष्पापांचा बळी गेला. गेल्या सहा महिन्यांत तब्बल 99 मुंबईकरांना जीव गमवावा लागला. या दुर्घटनांमधल्या बळींची संख्या पाहिली तर मुंबईकरांचा जिवाची किंमत राहिली आहे की नाही असाच प्रश्न निर्माण होतो.

दुर्घटनांची मुंबई

28 डिसेंबर 2017 -कमला मिल अग्नितांडव

14 बळी

18 डिसेंबर 2017 -भानू फरसाण मार्ट, साकिनाका

12 बळी

 

29 सप्टेंबर 2017 - एलफिन्स्टन रेल्वे पूल चेंगराचेंगरी

23 बळी

31 ऑगस्ट 2017 -हुसैनी इमारत दुर्घटना, भेंडीबाजार

33 बळी

25 जुलै 2017 -सिद्धी साई इमारत दुर्घटना, घाटकोपर

17 बळी

First published: December 29, 2017, 10:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading