मराठी बातम्या /बातम्या /स्पेशल स्टोरी /#Mumbai26/11: ...आणि त्या धक्क्याने 50 वर्ष व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीनं कायमचीच सोडली मुंबई!

#Mumbai26/11: ...आणि त्या धक्क्याने 50 वर्ष व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीनं कायमचीच सोडली मुंबई!

26/11 च्या हल्ल्याला 10 वर्ष झाल्यानंतर नक्की काय परिस्थिती आहे, हे जाणून घेताना 'वेब न्यूज18 लोकमत'च्या लक्षात आलं की, मुंबईवरचा दहशतवादी हल्ला हा केवळ मुंबईतल्या त्या 10 ठिकाणांवर झालेला नव्हता. तर त्याचा आघात देशभरातल्या असंख्य मनांवर झाला होता. काही मनं यातून सावरली तर काही कायमची विस्कटली...!

26/11 च्या हल्ल्याला 10 वर्ष झाल्यानंतर नक्की काय परिस्थिती आहे, हे जाणून घेताना 'वेब न्यूज18 लोकमत'च्या लक्षात आलं की, मुंबईवरचा दहशतवादी हल्ला हा केवळ मुंबईतल्या त्या 10 ठिकाणांवर झालेला नव्हता. तर त्याचा आघात देशभरातल्या असंख्य मनांवर झाला होता. काही मनं यातून सावरली तर काही कायमची विस्कटली...!

26/11 च्या हल्ल्याला 10 वर्ष झाल्यानंतर नक्की काय परिस्थिती आहे, हे जाणून घेताना 'वेब न्यूज18 लोकमत'च्या लक्षात आलं की, मुंबईवरचा दहशतवादी हल्ला हा केवळ मुंबईतल्या त्या 10 ठिकाणांवर झालेला नव्हता. तर त्याचा आघात देशभरातल्या असंख्य मनांवर झाला होता. काही मनं यातून सावरली तर काही कायमची विस्कटली...!

पुढे वाचा ...

    26/11 ची ती रात्र वेगानं धावणाऱ्या मुंबईला थांबवणारी… अनेकांची आयुष्य त्यात उद्ध्वस्त झाली. अनेकांच्या आयुष्याला वेगळं वळण लागलं. रमजान अली अशांपैकीच एक. त्या रात्रीचा प्रसंग ते आयुष्यात विसरणार नाहीत.

    कॅफे लिओपोल्ड या मुंबईच्या प्रसिद्ध कुलाबा कॉजवे भागातल्या हॉटेलच्या समोर पानटपरी चालवणारे एक सामान्य गृहस्थ.... रमजान अली. त्यांच्या आयुष्यात नेमकं काय घडलं ते आता दहा वर्षांनंतर त्या भागात फिरत असताना आमच्या लक्षात आलं.

    दहा वर्षांपूर्वी २६ नोव्हेंबरच्या त्या रात्री समुद्रमार्गे आलेले 10 दहशतवादी मुंबईतील विविध ठिकाणी पांगले आणि निष्पापांच्या रक्ताचा सडा पडू लागला.

    त्यातले दोन दहशवादी कुलाबा कॉजवेच्या दिशेनं आले. इथल्या लिओपोल्ड कॅफेवर त्यांनी हल्ला चढवला. दहशतवादी हातातल्या AK 47 रायफलीतून बेभानपणे गोळ्यांचा वर्षाव करत होते. अशातच एक गोळी सुटली ती लिओपोल्ड कॅफेच्या समोरच असणाऱ्या एका पानटपरीच्या दिशेने...

    'रमजान अली पान शॉप' असं या छोट्या पानटपरीचं नाव. रमजान अली हे सत्तरीतले गृहस्थ तिथे 55 वर्षांपासून व्यवसाय करत असत. रमजान अली मूळचे उत्तर प्रदेशचे. एवढ्या वर्षांत मुंबईनं त्यांना आपलंसं केलं होतं. गाव तर ते विसरलेच होते. मुंबई हेच त्यांचं विश्व झालं होतं. पण 26/11 च्या रात्री त्यांनी जे पाहिलं त्यानंतर सगळंच बदलून गेलं.

    हल्लेखोरांनी रमजान अली यांच्या पानटपरीच्या बरोबर समोर असलेल्या लिओपोल्ड कॅफेला लक्ष्य केलं. एकामागोमाग एक बरसणाऱ्या बंदुकीच्या गोळ्या आणि त्या गोळ्या ज्यांच्यावर झाडल्या जात होत्या त्या निष्पाप नागरिकांच्या किंचाळ्या ऐकताच पानटपरीवर असणाऱ्या रमजान अली यांनी जीव वाचवण्यासाठी शेजारच्या बिल्डिंगमध्ये धाव घेतली.

    रमजान अली बिल्डिंगमधील सुरक्षित ठिकाणी लपून बसले तेव्हा बाहेर मृत्यूचं तांडव सुरू होतं. असा रक्तपात केल्यानंतर त्या क्रूर दहशतवाद्यांचं चित्त शांत झालं असावं आणि ते तेथून निघून गेले.

    सुमारे दोन तासानंतर रमजान अली बिल्डिंगमधून बाहेर आले. तेव्हा त्यांच्या पानटपरीच्या समोर लिओपोल्डमध्ये मृतदेहांचा खच पडलेला दिसला. लोक अजूनही भीतीच्या छायेतून बाहेर आले नव्हते. अली हेदेखील प्रचंड घाबरलेले होते. अशातच त्यांची नजर आपल्या पानटपरीवर गेली आणि त्यांच्या काळजात धस्स झालं. कारण दहशतवाद्यांच्या बंदुकीतील एक गोळी त्यांच्या पानटपरीच्याही आरपार गेली होती. जर आपण वेळीच इथून पळालो नसतो तर...

    (रमजान अली यांनी मुंबई सोडल्यानंतर त्यांची पानटपरी चालवणारा शकील)

    (रमजान अली यांनी मुंबई सोडल्यानंतर त्यांची पानटपरी चालवणारा शकील)

    मृत्यूच्या त्या केवळ विचारानेच त्यांचा थरकाप उडाला. स्वत:पेक्षाही मुंबई नावाच्या शहरावर जास्त विश्वास करणाऱ्या रमजान अली यांच्या मनात पहिल्यांदाच असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. या भयंकर घटनेचे घाव अली यांच्या मनात खोलपर्यंत गेले आणि मुंबईत 55 वर्षं व्यवसाय करणाऱ्या रमजान अली यांनी मनावर दगड ठेवून मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला.

    त्या भयंकर घटनेनंतर पानटपरीचा व्यवसाय करणारे रमजान अली उत्तर प्रदेशातल्या प्रतापगड जिल्ह्यातल्या आपल्या छोट्याशा गावी गेले ते कायमचेच. 26/11च्या या भयावह घटनेचा त्यांनी इतका धसका घेतला की ते पुन्हा मुंबईत कधीच परतले नाहीत.

    रमजान अली यांनी मुंबई सोडल्यानंतर शकील हा त्यांचा गाववाला ही पानटपरी सांभाळतो. 26/11चा हा सगळा घटनाक्रम दहा वर्षांनंतर आम्हाला सांगताना शकीलचे डोळे पाणावले.

    ‘तुमच्याही मनात आता काही असुरक्षिततेची भावना आहे का?’ आम्ही त्याला विचारलं. या प्रश्नाच्या उत्तरादाखल शकीलनं ‘नाही’ अशी मान डोलावली खरी; पण त्याच्या डोळ्यातली भीतीची भावना लपत नव्हती.... चेहऱ्यावर उसनं हसू दिसत असली तरी!

    रमजान अली यांची गोष्ट जाणून घेतल्यानंतर कळलं... मुंबईवरचा दहशतवादी हल्ला हा केवळ मुंबईतल्या त्या 10 ठिकाणांवर झालेला नव्हता. तर त्याचा आघात देशभरातल्या असंख्य मनांवर झाला होता. काही मनं यातून सावरली तर काही कायमची विस्कटली...!

    #Mumbai26/11 : कसाबला फासापर्यंत नेणारं Mission X 'या' महिला अधिकाऱ्यानं केलं पूर्ण

    First published:
    top videos

      Tags: Mumbai, Terrorist attack