#Mumbai26/11 : 10 वर्षानंतरही यांचे रक्ताने माखलेले कपडे मी उघडून पाहते!

#Mumbai26/11 : 10 वर्षानंतरही यांचे रक्ताने माखलेले कपडे मी उघडून पाहते!

सिताराम साखरे आणि त्यांचं कुटुंबीय त्या रात्री तब्बल 26 वर्षांमध्ये पहिल्यांदा रेल्वेनं प्रवास करणार होतं. एकूण 14 जण रेल्वेनं सोलापूरला लग्नासाठी निघाले होते.

  • Share this:

मुंबई, 26 नोव्हेंबर : 26/11च्या त्या रात्रीला आज 10 वर्षं पूर्ण झाली आहेत. ती रात्र... ज्यावेळी सुपरफास्ट मुंबई सुन्न झाली. फटाक्यांसारख्या गोळ्या झाडल्या गेल्या आणि त्यात अनेक घरं उद्ध्वस्त झाली. याच रक्ताच्या थारोळ्यात गोवंडीतल्या साखरे कुटुंबीयांनी त्यांच्या घरचा कर्ता पुरुष गमावला.

"मी मेल्याशिवाय ती रात्र विसरू शकणार नाही. त्या काळ्या रात्रीनंतर मला अजूनही गावी जाण्याची हिम्मत होत नाही", असं गंगुबाई सीताराम साखरे म्हणतात. गंगुबाई साखरे यांनी त्या रात्री आपला पती गमावला. या हल्ल्यात त्यांच्या 18 वर्षाच्या मुलालाही गोळी लागली. पण मुलाने तिथून पळ काढला. त्यामुळे तो थोडक्यात बचावला. 10 वर्षांपूर्वीची ती काळरात्र गंगूबाई आणि त्यांचा मुलगा गणेश यांच्या डोळ्यासमोरून जात नाही.

त्या रात्री रक्ताने माखलेले कपडे, माझ्या साड्या, रक्ताने माखलेली बॅग अजूनही तशीच ठेवली आहे, असं त्या म्हणाल्या. माझी मुलं आहेत, पण मला आजही यांची कमी जाणवते... आपल्या दिवंगत पतीबद्दल बोलताना गंगबाई भावुक होतात. "ते मला भेटायला येतील असंच मला वारंवार वाटतं. तो सगळा प्रसंग डोळ्यांत अश्रूंबरोबर पुन्हा पुन्हा उभा राहतो."

सुरुवातीला मला गोळी लागली हे समजलंच नाही...!

सीताराम साखरे आणि त्यांचं कुटुंब त्या रात्री तब्बल 26 वर्षांत पहिल्यांदाच रेल्वेनं प्रवास करून गावी जाणार होते. एकूण 14 जण रेल्वेनं सोलापूरला एका लग्नासाठी निघाले होते. पहिल्यांदा रेल्वेनं मस्त झोपून आपण कसे गावी जाणार अशी गंमत त्यांची रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर सुरू होती.

"इतक्यात असं काही झालं की, क्षणात गडबड उडाली. फटाक्यांसारखे आवाज झाले. प्लॅटफॉर्मवर शॉकसर्किट झालं असावं, असं वाटलं... पण बाबांकडे पाहिलं आणि खरा प्रकार लक्षात आला. क्षणात भीतीची शिरशिरी उठली. डोकं गरगरलं. बाबांना गोळी लागली होती....", सीताराम सारखे यांचा मुलगा गणेश सांगतो.

"बाबांना गोळी लागली होती, पण तरीही त्यांनी सगळ्यांना खाली बसवलं. पण जेव्हा त्यांनी मला जवळ घेतलं तेव्हा लक्षात आलं की, मला देखील गोळी चाटून गेली होती आणि रक्त येत होतं.

मी कसातरी तिथून पळालो आणि बाहेर पोस्ट ऑफिसजवळ आलो. तिथून जे.जे. हॉस्पिटलमध्ये मला अॅडमिट केलं गेलं. तिथे मला मलमपट्टी केली. त्यानंतर पुढच्या 15 मिनिटांत मी धावत पुन्हा सीएसटी स्थानकाबाहेर आलो. पण तेव्हा मला कोणीच आतमध्ये जाऊ देईना. मी हतबल होऊन स्टेशनबाहेर ताटकळत होतो. आतमध्ये गोळीबाराचा सुरूच होता. काय करावं कळत नव्हतं. काही वेळात एक हातगाडी बाहेर आली. त्यावर 2-3 लोकांचे मृतदेह ठेवलेले होतं. त्यातला एक मृतदेह माझ्या बाबांचा होता...."

गणेश त्या रात्रीचा प्रसंग सांगतो आणि आज १० वर्षांनंतरसुद्धा अंगावर काटे उभे राहतात. तो सांगतो, "बाबांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. त्यांना जिवंत करण्याचा खूप प्रयत्न केला पण तोपर्यंत त्या गोळीने त्यांचा घात केला होता. आज 10 वर्षं झाली. मला ओरडणारा आवाज मी कायमचा गमावला."

मी आणि माझे बाबा....

"घरात मी सगळ्यांत मोठा. पण मी टवाळक्या करायचो, त्यामुळे बाबा मला चपलेने मारायचे. पण ते गेल्यानंतर मी कधी मोठा झालो हे मला कळलंच नाही. आज सगळ्या कुटुंबाची जबाबदारी घेताना माझे बाबा प्रत्येक क्षणी माझ्यासोबत असतात", अशी भावना गणेशने व्यक्त केली.

आजही नवऱ्याचे ते रक्ताचे कपडे मी उघडून पाहते...

"मला कायम वाटतं की, माझा नवरा माझ्यासोबत आहे. CSTला जाताना नेलेली ती बॅग अजूनही तशीच आहेत. गोळी लागून ते त्या बॅगेवर पडले आणि त्यांचं रक्त त्या बॅगेतल्या सगळ्या कपड्यांना लागलं. आजही ती बॅग तशीच आहे. त्यांचे ते रक्ताने माखलेले कपडे पाहिले की, ते आजही माझ्यासोबत आहेत असंच वाटतं. ते कपडे मी कधीच धुणार नाही", असं गंगूबाई यांनी ठरवलं आहे.

बरं इतकंच नाही, तर त्या दिवसानंतर गंगूबाई पुन्हा कधीच गावी गेल्या नाहीत. "तरी यांच्यासाठी मी CST स्टेशनला मात्र जाते", त्या सांगतात. प्रत्येक वर्षी २६ नोव्हेंबरला साखरे कुटुंबीय स्थानकाबाहेर रक्तदान करण्यासाठी जातात आणि असा प्रसंग पुन्हा कधीच कुणावर येऊ नये अशी प्रार्थना करतात.

 

First published: November 26, 2018, 6:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading