• Home
  • »
  • News
  • »
  • special-story
  • »
  • #Mumbai26/11: ...तर ३ वर्षांत सुटका होऊन पाकिस्तानात गेला असता कसाब!

#Mumbai26/11: ...तर ३ वर्षांत सुटका होऊन पाकिस्तानात गेला असता कसाब!

जेव्हा कसाबला फाशी देण्यासाठी घेऊन जात होतो तेव्हा तो मला म्हणाला,'महाले सर तुम्ही जिंकला मी हरलो'

  • Share this:
मुंबईवर झालेल्या २६/११ दहशतवादी हल्याला आज दहा वर्ष पूर्ण झाली. मुंबईवर झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात अजमल कसाब हा जिंवत पकडला गेलेला एकमेव दहशतवादी होता. शेकडो जणांचा बळी घेणाऱ्या कसाबला पकडणे जितके जिकरीचे होते तितकाच लढा न्यायालयातही द्यावा लागला. कसाब हा अत्यंत धुर्त आणि प्रशिक्षण घेऊन आला होता. पण त्याचं हे ढोंग एका तपास अधिकाऱ्याने ८१ दिवस संयमाने चौकशी  करून उघड्यावर पाडले...त्या अधिकाऱ्याचं नाव आहे रमेश महाले... न्यूज१८ लोकमत डॉट कॉमच्या २६/११ विशेष मालिकेत रमेश महाले यांनी त्या ८१ दिवसात कसाब कसा वागला, त्याने किती क्लृपत्या वापरल्या याचा खुलासा केला. मी जेव्हा कसाबला पाहिलं तेव्हा मला विश्वासच बसला नाही की, एवढासा हा पोऱ्या कसा हल्ला करू शकतो. कसाब जेव्हा चौकशीसाठी ताब्यात होता तेव्हा आपण असं काही केलंच नाही अशा आविर्भावात तो वागत होता. त्याने मुंबईसह देशाच्या कानाकोपऱ्याचा अभ्यास केला होता. त्याला मुंबईची संपूर्ण माहिती होती.

#Mumbai26/11 : कसाबशी दोन हात करणारा 'मारुती'!

जेव्हा त्याची चौकशी सुरू केली तेव्हा तो साफ खोट बोलत होता. एखादा माणूस किती खोटं बोलले एक दिवस, दोन दिवस, ६ दिवस पण अखेर कसाब पोपटासारखा खरं बोलला.  परंतु, तो आमच्याकडे खरंही बोलला तरी न्यायालयात तो पलटू शकतो याची पूर्ण खात्री होती. पहिल्यांदा जेव्हा कोर्टात हजर करण्यात आले तेव्हा कसाबने आपला पहिला डाव टाकला. मी अल्पवयीन आहे, माझा खटला या कोर्टात चालू शकत नाही. जुवेनाईल कोर्टात माझी सुनावणी झाली पाहिजे अशी मागणीच केली. मला याची पूर्ण खात्री होती, कसाब असा काही दावा करेल. आम्ही तो अल्पवयीन नाही हे सिद्ध करण्यासाठी आधीच पुरावे गोळा करून ठेवले होते. आणि कोर्टात सिद्ध झालं की कसाब हा अल्पवयीन नाही. आम्ही पहिली लढाई तिथेच जिंकलो होतो. जर आमच्याकडे पुरावे नसते किंवा त्यांच्या डोक्यात काय शिजतंय याचा अंदाज जर अाला नसता तर त्यांची बालसुधारगृहात रवानगी झाली असती आणि ३ महिन्यानंतर त्याला पाकिस्तानात सोडावे लागले असते.

#Mumbai26/11 : कसाबला फासापर्यंत नेणारं Mission X 'या' महिला अधिकाऱ्यानं केलं पूर्ण

...आणि कसाब पैज हरला ८१ दिवसांच्या तपासात आम्ही कसाबच्या विरोधात पुरावे गोळा करू शकलो त्यामुळे न्यायालयाने त्याला दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली. आमची शंभर जणांची टीम अहोरात्र झटली. रक्ताचे पाणी करून ८१ दिवस आम्ही तपास केला. जेव्हा कसाबला फाशी देण्यासाठी घेऊन जात होतो तेव्हा तो मला म्हणाला,'महाले सर तुम्ही जिंकला मी हरलो'. कसाबची जेव्हा चौकशी सुरू होती तेव्हा त्यांने माझ्यासोबत पैज लावली होती. संसदेवर हल्ला करणाऱ्या अफजल गुरूला ८ वर्ष झाली तरी फाशीची शिक्षा झाली नाही. मी चारवर्षात इथून निघून जाईन अशी पैज कसाबने माझ्यासोबत लावली होती. पण चार वर्षाआधीच कसाबचा निकाल लागला. आपण आता फासावर लटकणार हे कळल्यावर कसाबने आपला पराभव स्वीकारला तिथेच माझ्या टीमचा, मुंबई पोलीस, न्यायदैवतेचा विजय झाला.
First published: