#Mumbai26/11 : कसाबशी दोन हात करणारा 'मारुती'!

तितक्यात तो बुटका कसाब उभा राहिला बंदूक उचलली आणि माझ्यावर गोळी झाडली. मी सीटचे बटन दाबून मागे झोपलो..तेवढ्यात एक गोळी माझ्या डोक्याच्या बाजूने सीटमध्ये घुसली.. मी अगदी काही इंचाने वाचलो नाहीतर ती गोळी माझ्या डोक्यात घुसली असती..

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Nov 26, 2018 04:07 PM IST

#Mumbai26/11 : कसाबशी दोन हात करणारा 'मारुती'!

देशाची आर्थिक राजधानी, स्वप्ननगरी, लाखो लोकांना रोजगार देणारी ही मुंबई नगरी.... २६ नोव्हेंबर २००८ रोजी मिसुरडही न फुटलेल्या दहा  पोरांनी मुंबापुरीत युद्ध पुकारलं. या दहशतवादी हल्ल्यात मुंबई आणि मुंबईकरांनी खूप काही गमावलं, कुणाचं छत्र हरपलं तरी  घरातला कर्तापुरूष गमावलं. आज या दहशतवादी हल्ल्यातून मुंबई सावरली असेलही पण दहा वर्षांनंतरही त्या जखमा अजूनही ताज्या आहे.


न्यूज१८ लोकमत.कॉमच्या या विशेष मालिकेत आम्ही भेटलो मारूती फड यांना...मारुती फड हे या हल्ल्याच्या त्या साक्षीदारांपैकी एक आहे जे अजमल कसाब आणि ईस्माईलने मुंबईच्या रस्त्यावर घातलेल्या मृत्यूतांडवातून बचावले होते.ते नुसते बचावले नाही तर त्यांनी या दहशतवाद्यांशी सामना करून आपला जीव मृत्यूच्या दारातून अक्षरश: खेचून आणला.त्यांची ही अंगावर शहारे आणणारी कहाणी त्यांच्या शब्दांत...


मी त्या वेळी वैद्यकीय शिक्षण सचिव भूषण गगराणी यांच्या गाडीवर चालक म्हणून होतो. संध्याकाळी मी घरी आलो.  बायको,मुलासोबत माझं जेवण झालं, गप्पा मारत आम्ही बसलेले होतो. तितक्यात सीएसटी परिसरात गोळीबार झाल्याची बातमी कळाली. टीव्ही लावला वृत्तवाहिन्यांवर मुंबईवर दहशतवादी हल्ला झाल्याच्या बातम्या सुरू होत्या..काही वेळात लाईव्ह हल्ल्याचे दृश्य आम्ही पाहत होतो...अर्ध्या तासांनंतर आमच्या वरिष्ठ सचिवांचा फोन आला, "मारुती आपल्याला मंत्रालयात तातडीने जायचं तर गाडी घेऊन या" असा निरोप मिळाला. परिस्थिती डोळ्यासमोर होती. मंत्रालयात पोहोचणे गरजेच होतं. मी मंत्रालयाकडे जाण्यास निघालो, घरात बायको आणि मुलाने मला अडवलं...मुलाने लिफ्टपर्यंत येईपर्यंत मला न जाण्याचा हट्ट करत होता. मी त्याची समजूत काढून लगेच येतो असं सांगून निघालो.

Loading...

#Mumbai26/11 : कसाबला फासावर पोहोचवणाऱ्या देविकाला भेटायचंय मोदींना!


कसाबने जेव्हा गोळीबार केला होता त्यात मारुती फड यांच्या हाताची बोट छाटली गेली. कंबरेत एक गोळी लागली.

कसाबने जेव्हा गोळीबार केला होता त्यात मारुती फड यांच्या हाताची बोट छाटली गेली. कंबरेत एक गोळी लागली.


कार घेऊन मी घरातून निघालो. त्याच दरम्यान कसाब आणि त्याचा सहकारी सीएसटीमध्ये गोळीबार करून कामा हॉस्पिटल समोरील भिंतीवर उड्या टाकून सेंट झेवियर्स कॉलेजच्या समोरील रस्तावर आले होती. त्याचवेळी मी समोरुन गाडी घेऊन आलो होतो... मी त्यांना पाहिलं पण ते एका अंगाने उभे असल्यामुळे त्यांच्याकडील शस्त्र  मला काही दिसले नाही. मलाही वाटलं ते कॉलजची पोरं आहे. तेवढ्यात तिथून दुचाकीवरुन दोन पोलीस जात होते. त्यांच्यावर त्यांनी गोळीबार केला त्यांच्यावर गोळीबार केल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा माझ्याकडे वळवला.


जशी माझी कार जवळ आली तशी त्याने माझ्यावर गोळीबार सुरू केला. काय घडतं हे मला कळेना.मला कळून चुकलं हेच दहशतवादी आहे..मी त्यांच्या अंगावर गाडी घातली.ते दोघेही फुटपाथच्या पलीकडे पडले. त्यांच्या हातातील गन खाली पडली. फुटपाथवर उंचवटा असल्यामुळे माझी गाडी काही पुढे सरकेना.

#Mumbai26/11: ...आणि त्या धक्क्याने 50 वर्ष व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीनं कायमचीच सोडली मुंबई!


तितक्यात तो बुटका कसाब उभा राहिला बंदूक उचलली आणि माझ्यावर गोळी झाडली. मी सीटचे बटन दाबून मागे झोपलो..तेवढ्यात एक गोळी माझ्या डोक्याच्या बाजूने सीटमध्ये घुसली. मी अगदी काही इंचाने वाचलो नाहीतर ती गोळी माझ्या डोक्यात घुसली असती...पण स्टे़अरिंग पकडलेली होती त्यात एक गोळी माझ्या हाताला लागली. हाताचे मधले बोट तुटून पडले होते. आता दोघेही माझ्यावर  गोळीबार करत होते.मी त्याच अवस्थेत कार रिव्हरर्स मागे घेतली.साधारण पणे ३५ एक मिटर मी मागे आलो. कारच्या डाव्या दरवाज्यातून एक गोळी घुसून माझ्या कंबरेत घुसली. त्यानंतर त्यांनी कारचे डावे टायर फोडले.गाडी जागेवरच थांबली होती.म्हटलं उतरून पळावं पण तितकी हे शक्य नव्हते...तेवढ्यात त्यांनी एक ग्रेनेड कारवर फेकले...सुदैवाने ते कारच्या खालून जात पुढे जाऊन फुटले. मी पुन्हा थोडक्यात वाचलो.पण हा खेळ इथेच संपला नव्हता.ते दोघे कारकडे चालत येत होते.मी म्हटलो आता मेलो. तेवढ्यात काय सुचलं ते देवास ठाऊक,तुटलेल्या बोटातून प्रचंड रक्त निघत होतं. मी डोक्यावर रक्त ओतून घेतलं आणि मरण्याचं सोंग केलं..ते दोघेही कार जवळ आले त्यांनी कारचा दरवाज उघडून पाहिला.बहुदा त्यांना खात्री झाली की मी मेलो. त्यानंतर ते तिथून पुढे निघून गेलो.

#Mumbai26/11:'कसाबने हल्ला केला तेव्हा मी त्याच गाडीत होतो'


जवळपास मी अर्धा तास तसाच निपचिप पडून होतो.मृत्यू दारातून मी वाचलो याचा स्वत: वर विश्वास होत नव्हता.अर्ध्यातासानंतर मोबाईलवरून नगरानी साहेबांना सांगितलं.पोलिसांची गाडी १५ मिनिटात पोहोचली त्यानंतर  मला जी.टी. रुग्णालयात नेण्यात आलं..माझ्यावर हा हल्ला सुरू होता तेव्हा माझी पत्नी राणी आणि मुलगा अभिषेक हे खिडकीतून पाहत होते.


मारुती फड यांच्यावर जिथे हल्ला झाला तिथून त्यांचं घर हे हाकेच्या अंतरावर होतं.ते ज्या इमारतीत राहतात त्यात त्यांचे घर हे अकराव्या मजल्यावर आहे. घराच्या खिडकीतून त्यांचा मुलगा अभिषेक आणि पत्नी हे सगळे पाहत होते.

#Mumbai 26/11- ‘थोडं घाईत आहे… नंतर फोन करतो’ पण तो फोन कधी आलाच नाही


त्यांची पत्नी राणी फड सांगता, खिडकीतून आम्ही पाहत होतो, त्यांच्यावर हल्ला झाला हे पाहुन हादरा बसला होता, काय करावे काय नाही काहीच सुचतं नव्हतं..शेजारी गोळा झाले होते. सगळे जण धीर देत होते. जेव्हा पोलिसांची गाडी खाली आली तेव्हा आम्ही खाली गेलो. त्यांचा जीव वाचला हे पाहून माझ्याही जिवात जीव आला.


या घटनेत फड कुटुंबीय पुढील चारवर्ष दहशतीखाली वावरत होतं. आपल्यासोबत जे काही घडलं यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. बाहेर कुणी फटाके जरी फोडले तर घरात सर्वांचा थरकाप उडायचा. मारुती फड यांच्या हाताला कंबरेला गोळी लागली. काही दिवसांनी ते यातून बरे झाले. पण  तांत्रिक काम करण्यात अडचणी येऊ लागल्यात. विशेष केस म्हणून त्यांची बदली मंत्रालयात करण्यात आली. दहा वर्षांनंतर सगळं काही सुरळीत जरी झालं असलं तरी तो दिवस आठवला तर अंगावर काटा येतो, माझ्या हाताचे बोट मला रोज त्या दिवसाची आठवण करून देतो..ती रात्र आणि तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही असाच तो दिवस...!!


===============

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 26, 2018 03:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...