Home /News /special-story /

गणेशोत्सवाचं 'मॅनेजमेंट' : तीन महिने... हजारो हात...असा साकारतोय 'लालबागच्या राजा'चा उत्सव!

गणेशोत्सवाचं 'मॅनेजमेंट' : तीन महिने... हजारो हात...असा साकारतोय 'लालबागच्या राजा'चा उत्सव!

मुंबई आणि पुण्याचा गणेशोत्सव सर्व भारतात प्रसिद्ध आहे. या दोन शहरातल्या काही प्रसिद्ध मंडळांच्या तयारीच्या 'स्पेशल स्टोरी'ज आम्ही घेऊन येतोय खास तुमच्यासाठी. गणेशोत्सवाचं 'मॅनेजमेंट' मधून. पहिलं मंडळ -लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मुंबई

पुढे वाचा ...
अलोट गर्दी, प्रचंड ऊर्जा, ओसंडून वाहणारा उत्साह, ‘त्या’ची फक्त एक झलक पाहण्यासाठी तासं तास रांगेत...तहान भूक विसरून प्रतीक्षा करणारे भाविक , कार्यकर्त्यांची प्रचंड फौज, गल्लीतल्या रिक्षेवाल्यापासून ते बॉलीवूडच्या बादशहापर्यंत आणि चहाच्या टपरीवाल्यापासून ते जगातल्या मोठ मोठ्या कंपन्यांच्या प्रमुखांपर्यंत. नगरसेवकापासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत अशा प्रत्येकाला ज्याचं कायम आकर्षण असतं तो म्हणजे सर्वाचा लाडका ‘लालबागचा राजा’. मुंबई हे जसं बॉलीवूड आणि अर्थकारणासाठी प्रसिद्ध आहे तशीच मुंबईची दुसरी ओळख म्हणजे गणेशोत्सव आणि यात सगळ्यांची धाव असते ती ‘लालबागच्या राजा’कडे. गणेशोत्सवाला आता फक्त एक महिना राहिलाय त्यामुळं मंडळांचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. कार्यकर्त्यांना प्रतिक्षा आहे ती बाप्पांच्या आगमनाची... ‘लालबागच्या राजा’च्या उत्सवाचं हे 85 वं वर्ष आहे. त्यामुळे या वर्षीचा उत्सव कायम स्मरणात राहावा यासाठी मंडळाचे कार्यकर्ते सध्या जीवाचं रान करताहेत. लालबागच्या राज्याच्या दर्शनासाठी येणारे भाविक आणि त्यांच्यासाठीची तयारी बघितली तरी ते किती मोठं व्यवस्थापन असतं हे बघून थक्क व्हायला होतं. 10 दिवसात 2 कोटी माणसं? लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं काम तसं वर्षभरच सुरू असतं. पण गणेशोत्सवाचे 10 दिवस म्हणजे वर्षभराच्या कामाचा कळसाध्याय असतो. दिवस- रात्र, काम धंदे, तहान-भूक असं सगळं विसरून अख्ख लागबागच राजाच्या सेवेत असतं. दरवर्षी भाविकांची संख्या वाढतच जातेय. मागच्या वर्षी 10 दिवसांमध्ये अंदाजे दीड कोटी भाविकांनी दर्शन घेतलं. यावर्षी ही संख्या दोन ते अडीच कोटींपर्यंत जाण्याची शक्यता असल्याचं मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी ‘न्यूज18 लोकमत’शी बोलताना सांगितलं. या भाविकांना त्रास होऊ नये, त्यांना शांततेनं दर्शन घेता यावं यासाठी व्यवस्थापन करणं हे आव्हान असतं. पण हे आव्हान आम्ही संधी म्हणून स्वीकारतो आणि दरवर्षी उत्तम नियोजन करण्याचा प्रयत्न करतो असं त्यांनी सांगितलं. एवढ्या भाविकांसाठी मंडप, पाणी, किमान चहा-नाश्ता, लहान मुलं,स्त्रीया, ज्येष्ठ मंडळी, अतिमहत्वाची माणसं अशा सगळ्यांचं व्यवस्थापन करण्यासाठी  मंडळाकडे पाच हजार कार्यकर्त्यांची फळी आहे. त्याचबरोबर अनेक जण 10 दिवसांमध्ये सेवा देतात. गेल्या अनेक वर्षांपासून पडलेल्या प्रथा, परंपरा, ठरलेली कामं, नियोजन, महापालिकेचं सहकार्य आणि नव्या कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळं बाप्पा आमच्याकडून हे शिवधनुष्य पेलून घेतो अशी इथं काम करणाऱ्या प्रत्येकाची भावना आहे. कार्यकर्त्यांसाठी 'बाप्पा' म्हणजे सर्व काही गणेशोत्सवाची खरी तयारी सुरू होते ती तीन महिने आधी राजाच्या पाऊल पुजनाने. राजाचं पाऊल पुजन म्हणजे मूर्ती तयार करण्याच्या कामाचा श्रीगणेशा असतो. मूर्तीची सजावट, मंडपाची बांधणी, इतर नियोजन अशी सगळी कामं कार्यकर्त्यांना वाटून दिली जातात. सर्व कार्यकर्ते नोकरी आणि व्यवसाय करणारी असल्याने ते सगळं सांभाळून गरज पडली तर रजा टाकून हे कार्यकर्ते बाप्पांसाठी राबत असतात. लालबाग-परळ हा सगळा जुन्याकाळी चाळींचा भाग होता. आता तीथं टॉवर्स उभी राहात असली तरी अजुनही तिथलं चाळीचं वातावरण टिकून आहे. गणेशोत्सव हा तिथला वर्षातला सर्वात मोठा आणि आनंदाचा सण. इथल्या प्रत्येक घराचं नातं राजाशी जोडलं गेलंय. गेल्या आठ दशकांमध्ये इथल्या तीन पीठ्या याच वातावरणात लहानाच्या मोठ्या झाल्यात. महाउत्सवाचं ‘महामॅनेजमेंट’ सर्वाधिक गर्दी खेचणारा आणि सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र असलेल्या राजाच्या उत्सवाचं व्यवस्थापन करणं हे तेवढच आव्हानात्मक काम आहे. गेल्या 85 वर्षांपासून कामाची रूपरेषा ठरलेली असल्यानं मंडळाकडे  कामाचा आराखडा तयार आहे. दरवर्षी त्यात नव्या गोष्टींची भर पडते. सध्या 35 लोकांची कार्यकारीणी आहे आणि त्यांच्या जोडीला हजारो कार्यकर्ते. विविध कामांसाठी मोठ्या समित्या, उपसमित्या आणि त्यांच्या जोडीला मदतीसाठी कार्यकर्ते. प्रत्येक समितीला कामाची वाटणी केली जाते. त्यांना काय काम करायचं, कुठल्या प्रकारे करायचं, किती दिवसांमध्ये करायचं या सर्वांच्या डेडलाईन्स आखून दिल्या जातात. त्यानुसार सगळेच कामाला लागतात. स्थानिक प्रशासन, बीएमसी, पोलीस, वाहतूकीचं नियोजन, व्हिव्हीआयपींचा प्रोटोकॉल अशा सगळ्या गोष्टींच्या कामाचंही काटेकोर नियोजन फार आधीच केलं जातं. बाप्पांचं काम असल्यानं सर्वच स्तरावर उत्तम सहकार्य मिळतं हा मंडळाचा अनुभव आहे. सहा महिन्यांपूर्वीच ठरतं नियोजन साधारणपणे सहा महिन्यांपूर्वी म्हणजे मे महिन्यात कार्यकारी मंडळाची आमसभा होते. त्या सभेत वर्षभराच्या कामाचा हिशेब सादर केला जातो आणि पुढच्या वर्षीच्या तयारीचं नियोजन केलं जातं. दरवर्षीपेक्षा दीडपट किंवा दुप्पट माणसं जास्त येतील ही गृहीत धरून नियोजन केलं जातं. लालबागचा परिसर हा दाटीवाटी आणि गर्दीचा, चिंचोळ्या गल्ल्या, दुकानांची गर्दी, रहिवासी भाग, छोट्या व्यवसायांचं जाळं, वाहनांची गर्दी अशी परिस्थिती असल्यानं प्रत्येक गोष्ट करताना विशेष काळजी घ्यावी लागते. तीन पिढ्यांपासून बाप्पांना साकारणारं कांबळी कुटूंबीय लालबागच्या गणेशोत्सवाचं सगळ्यात मोठं आकर्षण असतं ती बाप्पांची सुबक मूर्ती. मुंबईतल्या प्रसिद्ध कांबळी आर्ट्सचे मूर्तीकार गेल्या तीन पीढ्यांपासून बाप्पांची मूर्ती घडवत आहेत अशी माहिती कांबळी आर्ट्सचे सुनील कांबळी यांनी दिलीय. गेल्या 85 वर्षांपासून हे काम अव्याहतपणे आणि अतिशय आनंदाने करत आहेत. मधूसुधन कांबळी हे सुनील कांबळी यांचे आजोबा 1935 मध्ये त्यांनी पहिल्यांदा राजाची मूर्ती घडवली. तेव्हापासून सुरू झालेला हा प्रवास आजही कायम आहे. 1932 मध्ये जेव्हा पंचम जॉर्ज मुंबई भेटीवर आले होते त्यावेळी जीपला हत्तीचा आकार देऊन त्यात मेघडंबरी साकारण्यात आली होती. त्या मेघडंबरीत बसून राजाची मिरवणूक काढण्यात आली. त्या जीपच्या सजावटीचं काम मधूसुधन कांबळी यांनी केलं होतं अशी माहिती सुनील यांनी दिलीय. मधूसुधन कांबळी यांनी 1958 पर्यंत राजाची मूर्ती घडवली नंतर व्यंकटेश मधूसुधन कांबळी यांनी 2002 पर्यंत ही धुरा सांभाळली आणि तेव्हापासून रत्नाकर मधूसुधन कांबळी आणि त्यांचे पुत्र संतोष राजीची मूर्ती घडवण्याचं काम करताहेत. दिड महिना आधीपासून हे काम सुरू होतं. 14 फुटांची सिंहासनावर बसलेली अतिशय देखणी अशी ही मूर्ती असते. मूर्तीसाठी लागणारी प्रत्येक वस्तू ही अतिशय उच्च दर्जाचीच वापरली जाते. दरवर्षी मूर्तीच्या मागची प्रभावळ ही थीमवर आधारीत असते. गणपतीचा एक हात आर्शीवाद देणारा, एक हात मांडीवर, वरच्या एका हातात शस्त्र आणि दसऱ्या हातात चक्र असते. राजाला साजेसा मुकूट भरजरी पितांबर आणि गळ्यात मोहक हार घाललेली राजाची मूर्ती ही भक्ताला भारावून टाकणारी असते. राजाचं दर्शन घेतल्यानंतर भक्तांच्या चेहेऱ्यावर जो आनंद असतो तो आनंद पाहिला की सर्व थकवा निघून जातो. तो आनंद हीच आमची संपत्ती आणि मोठं भांडवल असल्याची भावना संतोष कांबळी यांनी व्यक्त केली. राजाचा मांडव हेच कार्यकर्त्यांचं घर उत्सवाच्या तयारीसाठी कार्यकर्ते तीन महिन्यांपासून राबत असतात. तर उत्सवाच्या दहा दिवसांमध्ये राजाचा मांडव हेच कार्यकर्त्यांचं घर असतं. सकाळी ऑफीस रात्री नियोजनाच्या बैठका मिळाली तर थोडीशी झोप आणि सकाळी पुन्हा कामावर असा कार्यकर्त्यांचा दिवस असतो. पण गणेशोत्सवाची ओढच एवढी तीव्र असते की झोप आणि आरामाचं फार काही वाटतच नाही अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केलीय. उत्सवाच्या दहा दिवसांमध्ये तर सर्वच जण रजा टाकतात. रजा मिळाली नाही तर काम सोडण्याचीही  त्यांची तयारी असते. फक्त दर्शनासाठी विदेशातून येणारे अनेक भक्त आहेत. मागच्या वर्षी एक भाविक थेट नूयॉर्कहून राजाच्या दर्शनाला आला होता. तो विमानतळावर आला. हॉटेलमध्ये स्नान केलं. थेट मंडपात आला दर्शन घेतलं आणि पुन्हा थेट विमानतळावरून न्यूयॉर्क. अशा भक्तांसाठी कार्यकर्ते मदतीला असतात. ही भक्ती पाहून कार्यकर्त्यांमध्येही उत्साह संचारतो. चोवीस तास दर्शन आणि व्हीव्हीआयपींचा राबता  राजाच्या दर्शनासाठी चार रांगा असतात. एक मुखदर्शनाची दुसरी चरणस्पर्धाची तर तिसरी नवसाची. आणि एक स्पेशल रांग असते ती अतिमहत्वाच्या व्यक्तिंसाठी. राज्यपाल, मुख्यमंत्री, मोठ्या कंपन्यांचे अध्यक्ष, बॉलीवूडचे सितारे अशा सर्वच क्षेत्रातल्या लोकांचा दहा दिवसांमध्ये राबता असतो. दर्शनाला यायच्या आधी सर्वजण मंडळाकडे फोन करून दर्शनाची वेळ ठरवून घेतात. गर्दी प्रचंड असल्याने राजाचं दर्शन कधीही बंद केलं जात नाही. फक्त आरतीची 10 ते 15 मिनिटं सोडली तर दर्शन सतत सुरू असतं. त्यामुळे व्हीव्हीआयपींसाठी दर्शन बंद केलं जातं असं जे म्हटलं जातं त्यात काहीही तथ्य नाही असा खुलासाही मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी केला. आता हायटेक जमाना असल्यानं फोन, व्हॉट्सअप, इंटरनेट आणि इतर सोयींमुळं सगळी कामं ऑनलाईन करण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे. उत्सव हेच मॅनेजमेंट स्कूल राजाच्या दर्शनासाठी  गर्दीच एवढी मोठी असते की कितीही सुविधा केल्या तरी त्या अपुऱ्याच पडतात. शेवटी लोक येतात ते त्यांच्या समाधानासाठी लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी त्यांचं आणि भक्ताचं थेट नातं आहे. हे नातं टिकवून ठेवणं आणि वाढवणं हेच काम मंडळ करतं...म्हणजे बाप्पा आमच्याकडून करवून घेतो हीच मंडळाची भावना आहे. इथं जे शिकायला मिळतं ते कुठल्याच व्यवस्थापनाच्या विद्यापीठामध्ये मिळणार नाही हे मात्र अगदी खरं आहे.      
First published:

Tags: Ganeshostave, Ganpati, Lalbaghcha raja, Lalbaugcha raja, Management, Mumbai ganeshostave, गणपतीची तयारी, गणेशोत्सव, लालबागचा गणपती, लालबागचा राजा

पुढील बातम्या