संदीप राजगोळकर, कोल्हापूर
11 डिसेंबर : राज्यात पाणीदार जिल्हा म्हणून कोल्हापूर ओळखलं जातं. पण याच जिल्ह्यातल्या डोंगरी भागातल्या गावांमध्ये आजही पाण्याचं दुर्भिक्ष आहे. असंच एक कागल तालुक्यातलं पिराचीपाडी गाव... मात्र हे दुर्भिक्ष दूर करण्यासाठी गावातला एक युवक पुढं आला.. आणि शेकडो एकर जमीन पाण्याखाली आली...
कोल्हापूरच्या कागल तालुक्यातलं जेमतेम 2 हजार लोकसंख्या असलेलं पिराचीवाडी गाव...हमालांचं गाव अशी या गावाची ओळख... याच गावातले दौलती दाभोळे...4 एकर शेती असूनही साखर कारखान्यात पोती उचलायचं काम करायचे.. कारण गावात पाणी नव्हतं. मात्र आता त्यांचे दिवस बदललेत. गावात पाणी आलंय. त्यांना शेतीतून चांगलं उत्पन्न मिळायला सुरुवात झालंय. याचं सगळं श्रेय दौलती देतात ते सुभाष भोसले यांना..
गावातले सगळे शेतकरी सुभाष भोसलेंचं कौतुक करतायत. कारण सुभाष यांनी घर, शेती सोबतच आई आणि पत्नीचे दागिने गहाण ठेऊन गावात पाणी योजना सुरू केली. तब्बल 7 किलोमीटरच्या या योजनेला 3 कोटी रुपये खर्च आला.
या पाण्याच्या मोबदल्यात शेतकरी एकरी 9 टनाचे पैसे सुभाष यांना देतात. गावकऱ्यांनीही राजकारण न करता सुभाष यांना साथ दिली. महिन्याभरापूर्वीच सुभाष भोसले गावचे संरपंचही झाले.
सुभाष यांनी संकल्प केला आणि ओसाड माळरान असलेली पिराचीवाडी हिरवीगार झाली. या पाणी योजनेनं गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं हसू पाहण्यासारखं आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा