S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

IBNलोकमत इम्पॅक्ट : एकाकी खोतजुवाला मिळाली जोगेश्वरीच्या गणेशोत्सव मंडळाची मदत

एका सकाळी या मंडळाचे पंधरा वीस कार्यकर्ते बस घेऊन कालावल खाडीपाशी आले आणि होडीने खाडी पार करत सोबत आणलेली 50 लाईफ जॅकेट्स आणि फ्लोटिंग रिंग्स त्यांनी या लोकांना भेट दिल्या !

Sonali Deshpande | Updated On: Aug 6, 2017 06:44 PM IST

IBNलोकमत इम्पॅक्ट : एकाकी खोतजुवाला मिळाली जोगेश्वरीच्या गणेशोत्सव मंडळाची मदत

दिनेश केळुसकर, रत्नागिरी, 06 आॅगस्ट : पुण्याचे कवी  नितीन कुलकर्णींची एक कविता आहे . केसाच्या अंतरावर . ती वाचा .

केसांच्या अंतरावर कटिंगवाला

पावलाच्या अंतरावर चप्पलवाला


पिशवीच्या अंतरावर भाजीवाला

अंडीलोणीदूधगिर्णी अगदी लागुनलागुन

शाळाकॉलेजंऑफिसंफिफीस अगदी लागुनलागुन

फोनए फॅक्सए कमरेकमरेला पेजरए

कमर्‍याकमर्‍यात कॉम्पुटरए

स्वतःची वाहनं चौकात रिक्षा बस दाराशी स्टॉपए

दोन किलोमीटरवर डेक्कनए

इंटरनेट मॉस्किटोनेट

व्होल्टगार्ड अ‍ॅक्वागार्ड बिल्डिंगगार्डए

मेनडोअरला लोखंडी दार, दर खिडकीला ग्रिलए

चौकात एक चौकीए

चौकीमध्ये पोलीसए ह्याचीसुद्धा खात्रीए

म्हंजे आता, सगळं कसं अगदी, सेफैनाए ?

पूर्व- घराचा प्रवेश, आग्नेय - जळता दिवा

नैऋत्य - शयनगृह, ईशान्य - देवघर

उत्तरेकडे उत्तमांग करून कधीच झोपत नाए

उघड्या दारातून उभी चूल कधीच दिसत नाए

दक्षिणभिंतीवरती एक छिद्रसुद्धा ठेवलेलं नाए

म्हंजे आता, सगळं कसं अगदी, सेफैनाए ?

हाकेच्या अंतरावर अँब्युलन्स

बोंबलायच्या अंतरावर फायरब्रिगेड

शेजारी डोळ्यांचा डॉक्टर, खाली डेंटल

त्याच्याखाली मेंटल

मागे हार्ट समोर ओर्थो पलिकडे न्यूरो.

कालच सगळा चेकप सगळे रिपोर्ट ओक्के.

पाठए गॅस-सिलिंडरसारखी कातडी ताडपत्रीसारखी

बर्गड्या रेल्वेरुळांसारख्या कवटी स्पीडब्रेकरसारखी

लघ्वी थुंकी तर एकदमच मिनरलए

म्हणजे आता, सगळं कसं अगदी, सेफैनाए?

मालवणमधल्या खोतजुवा बेटावर गेलो आणि नितीनजींची ही कविता मला आठवली . पंचवीसेक घरांचा तीस बत्तीस एकराचा हा टापू ! दीड दोनशे माणसं इथे राहतात. मासेमारी , शेती आणि नारळ बागायती हाच काय तो उदरनिर्वाह !  चहुबाजूने पाणी , पाणी आणि पाणीच ! शाळेत जायचं होडीतून. बाजाराला जायचं होडीतून. डॉक्टरकडे होडीतून . शेती करायला जायची होडीतून. गाई म्हशी , शेळ्या मेंढ्या चरायला न्यायच्या होडीतून . वारा असो , पाउस असो , वादळ असो ,  पूर आलेला असो . होडीशिवाय दुसरा पर्यायच नाही ! किती जोखमीचं जगणं हे ! आणि ते ही पिढ्यांनपिढ्यांपासून !

बरं , होडी तरी कसली ? काठीने वल्हवत वल्हवत आपला आणि बसलेल्यांचा तोल सावरत कालावल खाडी पार करायची ! सततची धाकधूक ! एक भीती ! खोतजुवावरचं हे जीवन पाहिलं आणि म्हणूनच नितीनजींची कविता आठवून दोन चित्रं माझ्या डोळ्यासमोर आली. स्वत:चं जगणं अधिक सेफ, आणखी सेफ , त्याच्यापेक्षा आणखी सेफ , आणखी त्याच्यापेक्षा सेफ करायचा अट्टाहास बाळगणारा सर्व सोयी उपलब्ध्द असणारा शहरी सूखवस्तू वर्ग एकीकडे आणि रोज मृत्यूला आमंत्रण देणारी खोतजुवासारख्या बेटावर जगणारी माणसं दुसरीकडे !

आता तुम्ही म्हणाल की सवयीचं झालय हे त्यांच्या . त्यात काय एव्हढं ? पण सकाळी सातच्या शाळेत जाण्यासाठी पहाटे पाच ला उठून तयार होउन तांबडं फुटताना भेदरत भेदरत होडीत बसणारी लहान लहान मुलं पाहिली की वाटतं केवळ नाईलाज म्हणून मोठी जोखीम घेऊन लावावी लागलेली ही सवय आहे . किती वर्षं झाली ? खूप ! किती निवडणुका झाल्या ? खूप ! किती लोकप्रतिनिधी झाले ? खूप ! पण एक सुसज्ज यांत्रिकी नौका सोडाच किमान पाच दहा लाईफ जॅकेट्सही कुणी याना दिली नाहीत . तशी खूप म्हणजे खूप काही गरीब नाहीत ही माणसं. इथूनच पुण्या मुंबईत जाऊन काही वेल सेटलही झालेत . पण लक्ष कोण देतो ? हल्ली 19 जुलैला सहा माणसाना घेउन नदी पार करणारी होडी उलटली आणि मरता मरता ही माणसं वाचली ! ते सुध्दा ती बुडताना जमीनीवरच्या माणसानी पाहिलं म्हणून ! त्यानी आपल्या होड्या तात्काळ या नदीत घातल्या आणि वाहत वाहत जाणाऱ्या महिलांच्या केसाला धरून ओढत आणलं . काहीजण उलटलेल्याच लाकडी होडीचा आधार घेउन श्वास घेत राहिले . त्यात एक नउ वर्षाचा लहान मुलगाही होता . मग धावले आमदार - बिमदार !  आम्ही तुम्हाला लवकरच सुसज्ज होडी देउ , लाईफ जॅकेट्स देउ , हे गाव पर्यटन आराखड्यात घेतलय , धूप प्रतिबंधक बंधारे बांधू , पायवाटा करून देउ ... वगैरे वगैरे .. पण इतकी वर्षं का नाही झालय हे ? की केवळ सत्तर ऐशी मतदारच आहेत, आले काय नी गेले काय ? काय फरक पडतोय ? असं म्हणून त्यांची फक्त आश्वासनांवर बोळवण केली जातेय ?

नाही म्हणायला या गावात खाडीवरून तारा ओढून वीज पूर्वीच आणण्यात आलीय. नदीतून पाईप लाईन टाकून पिण्याच्या पाण्याचीही हल्ली व्यवस्था करण्यात आलीय. पण ह्या लोकांची दररोजची जोखीम काही कमी होत नाहीय .मी विचारलं, तुम्ही पुनर्वसन का नाही करून घेत ? तर त्यावर त्यांचं उत्तर पटणारंच होतं. तुम्ही जमीन द्याल आम्हाला पण शेती कुठून देणार ? नारळ बागा कुठून देणार ? आम्ही पिकवायचं काय आणि खायचं काय ? त्यापेक्षा आम्हाला किमान सुविधा इथेच द्या नां ! आम्ही कुठे जास्ती मागतोय तुमच्याकडे ?

हे मुद्दाम इथे लिहायचं कारण  की खोतजुवाची ही सगळी परिस्थिती कर्तव्य म्हणून मी आयबीएन लोकमतवर मांडली. लाखो लोकांनी ती पाहिली. त्यातूनच या लोकांची मदत करायला  पुढे आलं  जोगेश्वरीतलं बांद्रेकरवाडी गणेशोत्सव मंडळ . एका सकाळी या मंडळाचे पंधरा वीस कार्यकर्ते बस घेऊन कालावल खाडीपाशी आले आणि होडीने खाडी पार करत सोबत आणलेली 50 लाईफ जॅकेट्स आणि फ्लोटिंग रिंग्स त्यांनी या लोकांना भेट दिल्या ! आयुष्यात पहिल्यांदाच इथली मुलं , महिला , वृध्द हे  लाईफ जॅकेट नावाची गोष्ट ऐकत होते ! मंडळाच्या कार्यकर्त्यानी ही जॅकेट्स कशी वापरायची हे त्याना सांगितलं. मग लहानापासुन मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण ही जॅकेट्स घालून पाहू लागला . प्रत्येकाचा चेहरा एका नव्या अत्मविश्वासाने उजळला .! स्मिता खोत नावाची एक महिला म्हणाली , "आता  किमान आमच्या जिवाला हुरहुर तरी लागणार नाही ओ ! की आमची मुलं पलीकडे व्यवस्थित जातील की नाही ? गेली तर संध्याकाळी परत येतील की नाही ? एव्हढा तरी धीर आता आम्हाला मिळालाय"

हो !  अगदी खरं. प्रतिकूल परिस्थितीत एखाद्याला जगण्यासाठी महत्त्वाकाचा  असतो तो धीर ! कुणीतरी दिलेला ! आम्ही तुझ्यासोबत आहोत हे सांगणारा !  आयबीएन लोकमतने हेच केलंय !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 6, 2017 06:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close