गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट : प्रबोधनाचा संपन्न वारसा जपणारा ‘केसरीवाड्याचा गणपती’

गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट : प्रबोधनाचा संपन्न वारसा जपणारा ‘केसरीवाड्याचा गणपती’

मुंबई आणि पुण्याचा गणेशोत्सव सर्व भारतात प्रसिद्ध आहे. या दोन शहरातल्या काही प्रसिद्ध मंडळांच्या तयारीच्या 'स्पेशल स्टोरी'ज आम्ही घेऊन येतोय खास तुमच्यासाठी. आज आहे पुण्याचा मानाचा लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेला केसरीवाड्याचा गणपती.

  • Share this:

महाराष्ट्राचा महाउत्सव म्हणजे ‘गणेशोत्सव’. या उत्सवानं महाराष्ट्राची आणि देशाचीही सीमा केव्हाच ओलांडली. आता जगभर पसरलेले भारतीय लोक गणेशोत्सव दणक्यात साजरा करतात. पुण्याने देशाला अनेक गोष्टी दिल्यात. स्वातंत्र्यपूर्व काळात देशाच्या विचारविश्वाला दिशा दिली. प्रबोधनाची संपन्न परंपरा दिली. या परंपरेतलं अग्रणी नाव म्हणजे लोकमान्य टिळक. असंतोषाचे जनक. दुभंगलेला,विखुरलेला, समाज एकत्र आणण्यासाठी टिळकांनी गणशोत्सवाचा साधन म्हणून वापर केला. त्यांच्याच दूरदृष्टीमुळं आणि प्रयत्नांमुळं गणेशोत्सवाला आजचं भव्य रूप प्राप्त झालं. गेल्या 125 वर्षांपासून केसरीवाडा गणेशोत्सवाने हीच प्रबोधनाची संपन्न परंपरा जपली आहे.

संपन्न ऐतिहासिक वारसा

लोकमान्य टिळकांनी 1894 मध्ये विंचुरकरवाड्यात गणपतीची स्थापना केली. गणेशोत्सवाच्या निमित्तानं लोकांना एकत्र करणं, त्यांचं प्रबोधन करणं, गुलामगिरीची कारणं समजावून सांगणं आणि आपल्या सांस्कृतिक वारशाची ओळख करून देणं असे विविध उपक्रम ते राबवू लागले. लोकांनाही ह उत्सव भावला आणि हळू हळू त्याचं महत्व वाढू लागलं. 1905 मध्ये त्यावेळच्या गायकवाड वाड्यात म्हणजेच नंतरच्या केसरीवाड्यात टिळकांचा गणेशोत्सव सुरू झाला. यावेळी सर्वात मोठं आकर्षण होतं ते टिळकांच्या व्याख्यानांचं. गणेशोत्सवाच्या निमित्तानं लोक टिळक वाड्यात येवू लागले. विविध उपक्रमात सहभागी होऊ लागले. टिळकांसाठी गणेशोत्सव हे फक्त निमित्त होतं. त्यांना लोकांची मनं जोडायची होती. लोकांना गुलामीची जाणीव करून द्यायची होती. गुलामिची मानसिकता बदलायची होती. ब्रिटीश भारतात का आले? त्यांना भारतात काय पाहिजे? लोकांचे हक्क काय आहेत? काय करायला पाहिजे? स्वराज्य म्हणजे काय? हे टिळक लोकांना सांगू लागले. असंतोष वाढू लागला, धग जाणवू लागली. प्रबोधनाची ठिणगी याच केसरी वाड्यात पडली आणि नंतर या ठिणगीमुळे पडलेल्या वणव्याने सर्व देश आपल्या कवेत घेतला.

प्रबोधनाची परंपरा जपणारी चवथी पिढी

टिळकांनी सुरू केलेल्या केसरीवाडा गणेशोत्सवाचं स्वरूप गेल्या 125 वर्षात अमुलाग्र बदललं पण प्रबोधनाची उज्ज्वल परंपरा मात्र या मंडळानं जपली आहे. कुठलाही बडेजाव न करता साधेपणानेच मात्र उत्साहाने हा उत्सव साजरा केला जातो. लोकमान्यांचे पणतू डॉ. दिपक टिळक आणि त्यांचे पुत्र रोहित टिळक हा वारसा आता पुढं चालवत आहेत. या उत्सवासाठी हे मंडळ कुणाकडूनही देणगी घेत नाही तर केसरीच्या निधीतूनच हा उत्सव साजरा केला जातो. इतर मंडळाकडून नियोजन केलं जातं ते देखाव्यांचं आणि रोषणाईचं मात्र केसरीवाड्यातला गणेशोत्सवात नियोजन होतं ते दहा दिवसांमध्ये होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं. गणेशोत्सवाच्या दोन महिने आधीपासून या नियोजनाला सुरूवात होते. विश्वस्तांच्या बैठकीत आराखडा सादर केला जातो आणि कार्यक्रमाला अंतिम रूप दिलं जातं.

सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

गणेशोत्सवाच्या काळात केसरीवाड्यात व्याख्यानं, सांस्कृतिक कार्यक्रम, गाण्यांच्या मैफिली, कविता संमेलनं असे विविध कार्यक्रम सादर होतात. या कार्यक्रमांना ज्येष्ठ, दिग्गज कलाकारांना जसं निमंत्रित केलं जातं तसच नवोदित कलाकारांनाही आवर्जुन बोलावलं जातं. पंडित भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, अरविंद गजेंद्रगडकर, प्रभा अत्रे यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांनी आपली कला केसरीवाड्यात सादर केलीय. तर प्राचार्य राम शेवाळकरांपासून ते प्रार्चाय शिवाजीराव भोसलेंपर्यंत अनेक दिग्गजांनी आपल्या व्याख्यानांनी प्रबोधनाची परंपरा समृद्ध केलीय. केवळ महाराष्ट्रातलेच नाही तर देशातल्या अनेक विख्यात कलाकारांनी आणि मान्यवरांनी केसरीवाड्यात हजेरी लावलीय. या उत्सवाला लोकमान्यांचा वारसा लाभल्यानं केसरीवाड्यात येणं म्हणजे लोकमान्यांचा आशीर्वाद मिळाल्याची भावना इथं येणाऱ्या प्रत्येकाची असते. दररोज संध्याकाळी 6 वाजता सुरू होणारे कार्यक्रम रात्री 10 वाजेपर्यंत सुरू असतात. चोखंदळ पुणेकरांचा या सर्व कार्यक्रमांना भरभरून प्रतिसाद असतो.

सुबक आणि प्रसन्न मूर्ती

केसरीवाड्यातल्या गणपतीची मूर्ती अत्यंत सुबक, रेखीव आणि प्रसन्न आहे. गेली अनेक दशकं या मूर्तीच्या स्वरूपात काहीही बदल झालेला नाही. शनिवार पेठेतले गोखले हे मूर्तिकार श्रींची मूर्ती साकारतात. मध्यम उंचीची आसनस्थ मूर्ती भाविकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरली आहे.

परंपरेचं भान आणि संस्कृतीचा मान

केसरीवाड्यातला गणेशोत्सवाला थेट टिळकांचा वारसा असल्याने उत्सवाचं मांगल्य जपण्यात आलं आहे. नाच, गाणी, झगमगाट, बटबटीतपणा, या सगळ्या गोष्टींना उत्सवात कधीच स्थान देण्यात आलं नाही. साधीच पण अभिरूचीसंपन्न सजावट राहील हे कटाक्षानं पाहिलं जातं. सजावट ही पर्यावरण पुरक राहिल याचीही काळजी घेतली जाते. केसरीवाड्याचा गणपती हा पुण्यातल्या मानाच्या गपतीत असल्याने या मंडळाला खास मानाचं स्थान आहे त्यामुळं गणेशोत्सवासाठी पुण्यात येणारे देश विदेशातले भाविक आवर्जुन केसरीवाड्यात येत असतात. गणेशोत्सवाच्या काळात दिवसभर भाविकांची रिघ असते ती गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आणि लोकमांन्यांचा परिसस्पर्श अनुभवण्यासाठी.

मिरवणूकीत मानाचं स्थान

टिळकांचा वारसा आणि मानाचा गणपती असल्यानं केसरीवाड्याच्या गणपतीला विसर्जन मिरवणूकीतही मानाचं स्थान असतं. मानाचे पहिले पाच गणपती हे मिरवणूकीत अग्रभागी असतात. केसरीवाड्याचा गणपती हा स्थापनेच्या वेळी आणि विसर्जनाच्या वेळी हा पालखीतूनच आणला जातो आणि विसर्जनासाठी नेला जातो. पालखीसोबत मिरवणूकीत ढोल ताशा, पारंपरिक वाद्य आणि भजनी मंडळ असतं. अशा मंगल वातावरणात बाप्पांना निरोप दिला जातो.

लोकमान्य टिळकांचा प्रबोधनाचा वारसा जपणारा, संस्कृती आणि परंपरेचं भान राखत उत्सव साजरा करणाऱ्या केसरीवाडा गणेशोत्सवानं सर्वच गणेश मंडळांसाठी नवा आदर्श घालून दिलाय.

 

First published: September 13, 2018, 7:35 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading