मराठी बातम्या /बातम्या /स्पेशल स्टोरी /

स्वप्नातलं पुस्तकांचं गाव आता प्रत्यक्षात...!

स्वप्नातलं पुस्तकांचं गाव आता प्रत्यक्षात...!

तुषार तपासे, सातारा

22 एप्रिल :  सातारा जिह्यातील भिलार हे गाव आतापर्यंत गोड अशा स्ट्रॉबेरीसाठी आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध होतं. मात्र आता या गावाची ओळख बदलतेय. 'पुस्तकांचं गाव ' म्हणून या गावाकडे आता पाहिले जाणार आहे. बघूया 'पुस्तकांचं गाव' काय आहे ते...

निवांत जागा, भरपूर पुस्तकं, असं अनेकांचं स्वप्न असतं.हे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरतंय ते पुस्तकांच्या गावाच्या रुपानं. पर्यटनाबरोबर वाचन संस्कृती लोकांमध्ये रुजावी यासाठी राज्य मराठी विकास संस्थेच्या मराठी भाषा विभागाने हे पुस्तकांचं गाव उभारलं आहे. हे गाव आहे सातारा जिल्ह्यातल्या पाचगणी, महाबळेश्वरच्या मध्यभागी असलेलं भिलार. या गावातील २५ ठिकाणं निवडण्यात आली असून त्यात पर्यटकांना निवासाची सोय असणारी घरं, लॉजिंग, शाळा यांचा समावेश आहे.

या गावातली 25 ठिकाणं ठाण्यातले प्रसिद्ध चित्रकार सदाशिव कुलकर्णी आणि त्यांच्या टीमनं अतिशय सुरेख अशा पुस्तकाच्या चित्रांनी रंगवली आहेत. गावात आलेल्या पर्यटकांना ते ज्या ठिकाणी थांबणार आहेत त्या  घरांमध्ये, लॉजिंगमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं मिळतील. त्यासाठी राज्य मराठी विकास संस्थेनं तब्बल १५ हजार पुस्तकं, कपाटं, खुर्च्या, टेबल, छत्र्या यांची सोय केली आहे.

पुस्तकांचं गाव ही संकल्पना चांगली आहे. पण, मुळातच वाचन संस्कृती कमी होत चालली आहे. त्यामुळे वाचकांना या गावांपर्यंत आणण्यात ही संकल्पना कितपत यशस्वी होते, यावर तिचं भवितव्य अवलंबून आहे.

First published:

Tags: India, Maharashtra