मुंबई, ता.16 ऑक्टोबर : #MeToo चळवळीमुळं देशात वादळ निर्माण झालं. चित्रपट, पत्रकारिता, साहित्य,संगीत आणि राजकारण या सर्वच क्षेत्राला या चळवळीनं हादरे बसले. अनेक महिलांनी पुढं येवून आपल्यावर झालेल्या लैंगिक छळाची उघडपणे चर्चा केली. 1980 च्या दशकात महाराष्ट्राच्या राजकारणात असच एक वादळ निर्माण झालं होतं. त्या वादळच्या केंद्रस्थानी होते तत्कालीन उपमुख्यमंत्री रामराव आदिक. जर्मनीच्या दौऱ्यात त्यांनी केलेले जे प्रताप वृत्तपत्रांनी बाहेर आणले त्यामुळं त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यावेळी #MeToo नव्हते मात्र वृत्तपत्रांनी ते प्रकरण लावून धरल्यामुळं त्यांना आपलं पद सोडावं लागलं.
हॅनोव्हरचा हँगोव्हर
गोष्ट आहे 1984 च्या एप्रिल महिन्यातली. त्यावेळी दिग्गज नेते वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या मंत्रिमंडळात ज्येष्ठ नेते बॅरिस्टर रामराव आदिक उपमुख्यमंत्री होते. 'रसिक'पणासाठी त्यांची सर्वत्र ख्याती होती. मात्र उघडपणे त्याची चर्चा कधी होत नव्हती. एका आंतरराष्ट्रीय प्रदर्शनासाठी आदिक जर्मनीच्या दौऱ्यावर गेले होते.
जर्मनीच्या हॅनोव्हर या शहरात त्यांना आंतरराष्ट्रीय प्रदर्शनासाठी जायचं होतं.जर्मनीला जातानाच्या प्रवासादरम्यान विमानात त्यांनी मद्यप्राशन केलं आणि जे घडू नये ते घडलं. त्या घटनेनं महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ निर्माण झालं.
विमानात काय घडलं?
रामराव आदिकांनी विमानात एवढं मद्य प्राशन केलं की त्यांना काही भानच राहिलं नाही. त्या अवस्थेत त्यांनी एक हवाई सुंदरीला नकोसा स्पर्श करत असभ्य वर्तन केलं. महाराष्ट्रासारख्या राज्याचा उपमुख्यमंत्री आणि वजनदार नेत्याच्या या वर्तनाने ती हवाई सुंदरी घाबरून गेली. तिने या प्रकरणाची कुठे वाच्यता केली नाही.
पण टाईम्स ऑफ इंडियाने हे प्रकरण पहिल्यांदा उघडकीस आणलं. त्याकाळी सोशल मीडियाही नव्हता आणि टी.व्ही चा सुद्धा फारसा प्रसार झाला नव्हता. नंतर इतर वृत्तपत्रांनीही हे प्रकरण लावून धरलं.
महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ
रामराम आदीकांचं हे प्रकरण उघड झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ निर्माण झालं. विरोधी पक्षांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. काँग्रेस पक्षावर चौफेर टीका झाली. मात्र मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी आदिकांची पाठराखण केली. या प्रकरणावर सविस्तर निवेदन करू असं आश्वासन त्यांनी विधानसभेत दिलं. वसंतदादांच्या पत्नी आणि ज्येष्ठ नेत्या शालीनीताई पटील यांनी मात्र सांगली इथं झालेल्या जाहीर सभेत आदिकांच्या वर्तनावर टीका केली. पण आदिकांनी काही राजीनामा देण्याची तयारी दाखवली नाही.
वृत्तपत्रांचा दबाव
प्रकरण वाढू लागलं तसं अनेक वृत्तपत्रांनी त्यावरून सरकारला झोडायला सुरूवात केली. आदिकांच्या अनेक कथा बाहेर यायला लागल्या. आदिक हॅनोव्हरला जावूनही प्रदर्शनाला गेलेच नाहीत कारण ते जाण्याच्या स्थितीतच नव्हते असंही स्पष्ट झालं. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यापर्यंत हे प्रकरण गेलं. वृत्तपत्रांचे अग्रलेख येऊ लागले. दबाव वाढू लागला. शेवटी रामराम आदिक यांनी खुलासा करत राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं.
खुलासा आणि राजीनामा
रामराम आदिक यांच्या बचावासाठी त्यावेळच्या 14 मंत्र्यानी पत्रक काढून त्यांची पाठराखण केली. आदिकांनी तसं काही केलंच नाही असा दावाही त्यांनी केला. पण दबावच एवढा होता की आदिकांना राजीनामा देण्याशिवाय पर्याय राहिला नाही. आठ दिवस वृत्तपत्रांनी हे प्रकरण ताणून धरलं आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला.
त्यानंतरच हे प्रकरण शांत झालं. राजीनामा देण्यासोबतच आपण दारू पीणं सोडत असल्याचंही आदिकांनी जाहीर केलं. विमानात जे मद्य दिलं होतं ते भेसळयुक्त होतं त्यामुळं आपल्याला त्रास झाला असं त्यांनी खुलाशात म्हटलं त्यामुळं त्यावरूनही त्यांच्यावर टीकेची झोड उठली.
त्यावेळी ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक माधव गडकरी यांनी 'हॅनोव्हरचा हँगोव्हर' आणि 'वृत्तपत्र शक्तीचा विजय' हे लिहिलेले अग्रलेख प्रचंड गाजले. त्या अग्रलेखात त्यांनी राज्यसरकारचे वाभाडे काढत आदिकांना धारेवर धरलं होतं. आज परराष्ट्रमंत्री एम.जे.अकबर यांच्यावर आरोप होऊनही त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला.
उलट ज्या पत्रकारांनी आरोप केले त्यांच्याविरूद्धच कोर्टात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला. अकबर यांनी उपस्थित केलेला पुराव्याचा तांत्रिकदृष्ट्या बरोबर असला तरी नैतिकता आणि साधनशुचितेचं काय? असा सवाल आता सर्वच माध्यमांमधून सरकारला विचारला जातोय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.