SPECIAL : या ज्येष्ठ नेत्यामुळे शरद पवारांना मिळाली पहिल्यांदा मंत्री पदाची संधी

SPECIAL : या ज्येष्ठ नेत्यामुळे शरद पवारांना मिळाली पहिल्यांदा मंत्री पदाची संधी

'आपल्याला नवं नेतृत्व तयार करायचं आहे. मात्र ती दृष्टी यात दिसत नाही. नव्या लोकांना संधी मिळायला पाहिजे.'

  • Share this:

मुंबई 27 मार्च : महाराष्ट्राचं राजकारण शरद पवारांभोवती कायम फिरत असतं. संसदीय राजकारणात पवार ५० वर्षांपेक्षा जास्त वर्षांपासून सक्रिय आहेत. सामान्य कार्यकर्ता ते मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि लोकमान्य नेता हा त्यांचा प्रवास अतिशय लक्षवेधी आहे. प्रशासनावर घट्ट पकड असलेला नेता अशी शरद पवारांची ख्याती आहे. १९७२ मध्ये त्यांना पहिल्यांदा मंत्रीपदाची संधी मिळाली आणि मिळालेल्या या संधीचं शरद पवारांनी सोनं केलं.

१९७२ च्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला प्रचंड बहुमत मिळालं. २७० पैकी काँग्रेसला २२२ जागा मिळाल्या. इतर सर्व पक्षांचा धुव्वा उडाला. एकूण मतांपैकी ५६.३७ टक्के मतं एकट्या काँग्रेसला पडली होती. या यशाच्या शिल्पकार होत्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी.

इंदिरा गांधींच नेतृत्व

१९७१ च्या युद्धात भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. पाकिस्तानचं विभाजन होऊन बांगलादेशची निर्मिती झाली होती. मुक्ती वाहिनीच्या मदतीसाठी इंदिरा गांधी यांनी भारताचं सैन्य पाठवून पाकिस्तानला अद्दल घडवली होती. त्यामुळे इंदिरा गांधी यांचा करिष्मा होता. देशात त्यांची लाट होती. याचा फायदा काँग्रेसला झाला होता.

महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाची धुरा पुन्हा वसंतराव नाईक यांच्याकडे आली होती. त्या निवडणुकीत पवार आमदार म्हणून निवडून आले होते. त्यावेळी आपण पहिल्यांदा मंत्री कसे झालो आणि ती संधी कुणा नेत्यामुळे मिळाली याची पडद्यामागची कहाणी शरद पवारांनी ‘लोक माझे सांगाती...’या राजकीय आत्मकथेत सांगितली आहे.

...आणि यशवंतरावांनी शब्द टाकाला

मुख्यमंत्री असलेल्या वसंतराव नाईक यांनी आपल्या मंत्रीमंडळाची यादी तयार केली आणि मान्यतेसाठी ते दिल्लीत पंतप्रधान इंदिरा गांधी यांना भेटले. त्यांची मान्यता मिळाल्यानंतर ते त्यावेळी केंद्रात मंत्री असलेल्या यशवंतराव चव्हाण यांनाही भेटले. नाईकसाहेबांनी त्यांना मंत्रिमंडळाची यादी दाखवली. त्यावर नजर टाकल्यावर यशवंतराव चव्हाण अस्वस्थ झाले.

यात शरद पवारांचं नाव नाही का? असा प्रश्न त्यांनी नाईकांना विचारला.  आपल्याला नवं नेतृत्व तयार करायचं आहे. मात्र ती दृष्टी यात दिसत नाही. नव्या लोकांना संधी मिळायला पाहिजे असं सांगत यशवंतराव चव्हाणांनी वसंतराव नाईकांना शरद पवारांचा त्या यादीत समावेश करायला सांगितला. ती नवी यादी घेऊन नाईक साहेब पुन्हा इंदिरा गांधींकडे गेले. त्या नव्या यादीला मंजूरी घेतली आणि मुंबईत परत आले आणि पहिल्यांदा शरद पवार महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री झाले.

वसंतराव नाईक यांचा विश्वास

त्यानंतरच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी तुम्हाला कोणतं खातं हवं? असा प्रश्न पवारांना विचारला त्यावर तो तुमचा अधिकार आहे असं उत्तर पवारांनी त्यांना दिलं. त्यानंतर वसंतराव नाईक यांनी त्यांच्याकडे मुख्यमंत्री म्हणून असणाऱ्या सर्व महत्त्वाच्या खात्यांचा प्रभार राज्यमंत्री म्हणून शरद पवारांकडे सोपविला.

गृह, सामान्य प्रशासन, राजशिष्टाचार आणि विधिमंडळाचं कामकाज अशा महत्त्वाच्या खात्यांचा कारभार हाताळण्याची संधी पवारांना मंत्रिपदाच्या पहिल्याच कारकिर्दीत मिळाली. वसंतराव नाईक यांनी आपल्याला कामाचं पूर्ण स्वातंत्र दिलं होतं असही पवारांनी या आत्मकथेत स्पष्ट केलंय. त्यामुळेच पवार हे यशवंतराव चव्हाणांना आपला गुरू मानतात. तर वसंतराव नाईक यांच्यामुळेच प्रशासन कसं हाताळावं याचे धडे मिळाले अशी कृतज्ञताही ते कायम व्यक्त करतात.

VIDEO मला आणि प्रणितीला भाजपची ऑफर होती - सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट

First published: March 27, 2019, 6:45 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading